प्रियकर सुटला अन् पतीच अडकला! ‘ब्रह्मा’ श्वानाने काढला संशयीताचा माग; मुलीच्या ‘फोन’ने दिली तपासाला दिशा..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर तालुक्यातील खंडेरायवाडी येथील मनीषा रामनाथ चाचण (वय 42) यांच्या निर्घृण खुनाच्या प्रकरणाने आता अनपेक्षित वळण घेतले आहे. कालपर्यंत जिच्या प्रेमसंबंधांमुळे तिच्या प्रियकराभोवती संशयाचे वर्तुळ घट्ट झाले होते, त्याच प्रकरणात पोलिसांनी आता तिच्याच पतीला अटक केली आहे. संशयित वनरक्षकाला ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर तांत्रिक विश्लेषणातून त्याचा या घटनेशी संबंध नसल्याचे स्पष्ट झाले. मात्र तपासाची दिशा सुरुवातीपासूनच अन्यत्र असल्याचे संकेत मिळत होते. अखेर घटनास्थळावरील पुरावे, मोबाईलचे लोकेशन, फोनवरील संभाषण आणि तपास श्वानाने दिलेला माग या सगळ्या धाग्यांची सांगड घालत घारगाव पोलिसांनी रामनाथ चाचण (वय 52) याला बेड्या ठोकल्या आहेत. या अटकेने पठारभागातील खुनाच्या घटनेला नवा आणि रहस्यमय ‘ट्विस्ट’ मिळाला असून तपासाबाबत उत्कंठा निर्माण झाली आहे.


मनीषा रामनाथ चाचण या विवाहित महिलेचे पिंपळगाव देपा येथील वनरक्षकासोबत गेल्या बारा वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याची माहिती या घटनेच्या तपासात पुढे आली आहे. कोविड संक्रमणाच्या काळात या संबंधांची कुणकुण लागल्यानंतर दोघांच्या कुटुंबात वाद होऊन दुरावा निर्माण झाला होता. मात्र अलीकडच्या काळात त्या दोघांमध्ये पुन्हा जवळीक वाढल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे खुनामागे प्रेमसंबंधांचे कारण असावे, असा प्राथमिक संशय व्यक्त होत होता. याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी ‘त्या’ वनरक्षकाला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. मात्र घटनेच्या दिवशी दुपारी साडेबारा ते सायंकाळी सातपर्यंत त्याच्या हालचालींचे तांत्रिक विश्लेषण केले असता तो प्रथम संगमनेरला आणि त्यानंतर थेट आपल्या गावी परतल्याचे स्पष्ट झाले. परिणामी त्याला सोडून देण्यात आले.


या तपासातील सर्वाधिक महत्त्वाचा धागा ठरला तो पोलिसांच्या ‘ब्रह्मा’ या तपास श्वानाने काढलेला माग. खुनासाठी वापरण्यात आलेल्या दगडावरील मानवी वासाचा माग घेत ब्रह्माने थेट मयतेचे घर गाठले. त्यामुळे तपासाची सुई घरातील व्यक्तींकडे वळली. पोलिसांनी मयतेचा भूतकाळ, तिचा दिनक्रम आणि घटनेच्या दिवशी घरातील प्रत्येकाच्या हालचालींची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. पती रामनाथ यालाही ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. सुरुवातीला त्याने आपला संबंध नसल्याचे सांगत उडवाउडवीची उत्तरे दिली, मात्र त्याच्या मोबाईलच्या तांत्रिक तपासातून पोलिसांच्या हाती काही महत्त्वाचे धागे लागले आहेत.


बुधवारी (ता.17) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास रामनाथ साकूर फाट्यावर गेला होता. तेथे सुमारे तासभर मद्यप्राशन केल्यानंतर एकच्या सुमारास तो पोस्टात गेल्याची माहिती समोर आली आहे. मात्र दुपारी एक ते दोन या संशयास्पद कालावधीत त्याचा मोबाईल ‘स्वीचऑफ’ होता. खंडेरायवाडीपासून अवघ्या पाच-सहा किलोमीटर अंतरावरील दरीत याच कालावधीत खुनाची घटना घडल्याचा पोलिसांचा संशय आहे. शवविच्छेदन अहवालातील मृत्यूची संभाव्य वेळही या संशयाला बळ देणारी आहे.


या प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेल्या मयतेच्या मुलीला दुपारी साडेतीन वाजता तिच्या आईच्या मोबाईलवरुन फोन गेला होता, मात्र तो उचलला गेला नाही. काही वेळाने मुलीने आईच्या मोबाईलवर पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता फोन एकदा वाजून कट झाला आणि त्यानंतर स्वीचऑफ झाला. त्यामुळे तिने वडील रामनाथ यांना फोन करुन ‘आई कुठे आहे? तिचा फोन स्वीचऑफ येतोय..’ अशी विचारणा केली. त्यावर रामनाथ यांनी मद्याच्या नशेतच ‘ती गेलेली आहे कुठेतरी, मिळून आलेली नाही..’ असे उत्तर दिल्याची माहिती तपासात समोर आली आहे.


विशेष म्हणजे मनीषा बेपत्ता झाल्याची चर्चा सायंकाळी पाचनंतर गावात सुरु झाली आणि त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. मग साडेतीनलाच पती रामनाथला पत्नी मिळून येत नसल्याची माहिती कशी होती?. एवढेच नव्हे तर बेपत्ता महिलेचा शोध सुरु असतानाच ‘ती दरीत पडल्याचे एका बुवाने आपल्याला सांगितले’ असेही त्याने काही ग्रामस्थांना सांगितल्याची माहिती पुढे आली आहे. प्रत्यक्षात शोध सुरु होण्यापूर्वीच ‘दरीचा उल्लेख होणे आणि मुलीच्या फोनवरील संभाषणातील वेळ यामुळे तपासाला वेगळीच दिशा मिळाली.


पोलिसांनी बेपत्ता मनीषाचा शोध घेत असताना दुपारी साडेतीनच्या सुमारास कन्हेर पोखरी परिसरातील मोबाईल लोकेशनही मिळवले होते. मात्र दुसर्‍या दिवशी सकाळी मयतेचा मोबाईल तिच्या मृतदेहाजवळ आढळून आला. त्यामुळे मोबाईल घटनास्थळी कसा पोहोचला हा प्रश्नही महत्वाची भूमिका बजावणार आहे. पोलिसांच्या संशयानुसार, खुनानंतर साकूर-कन्हेर पोखरी परिसरातून माघारी येताना रामनाथने पुन्हा घटनास्थळी जाऊन मोबाईल तेथे टाकला असावा. या सर्व बाबींची पडताळणी आता आरोपीच्या कोठडीतून होणार्‍या तपासाचा भाग आहे.


या प्रकरणात यापूर्वी दाखल असलेल्या अपहरणाच्या गुन्ह्यात आता खुनाच्या कलमाची वाढ करण्यात आली असून रामनाथ चाचण याला रात्री अटक करण्यात आली आहे. प्राथमिक चौकशीत त्याने गुन्हा अमान्य केला आहे. त्यामुळे आज न्यायालयात हजर करुन त्याची पोलीस कोठडी मिळवण्याची प्रक्रिया केली जाणार आहे. घारगावचे पोलीस निरीक्षक संदीप वराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरु आहे. कालपर्यंत प्रियकराभोवती फिरणारा संशयाचा फास आता पतीभोवती आवळला गेला असला, तरी खुनामागचे नेमके कारण, घटनास्थळावरील हालचाली, मुलीच्या फोनवर संपर्काचा प्रयत्न आणि मयतेच्या मोबाईलचा प्रवास यांची उत्तरे अद्याप मिळणे बाकी आहे. पोलिसांच्या हाती असलेल्या पुराव्यांची साखळी किती भक्कम ठरते आणि कोठडीतील चौकशीतून आणखी कोणते धक्कादायक तपशील समोर येतात, याकडे आता पठारभागासह संपूर्ण संगमनेर तालुक्याचे लक्ष लागले आहे.


घटनेच्या दिवशी दुपारी एक ते दोनच्या दरम्यान संशयीताचा मोबाईल स्वीचऑफ, त्यानंतर थेट साकूरमध्ये. साडेतीन वाजता मुलीला पत्नी बेपत्ता असल्याची माहिती, तिचा शोध लागण्यापूर्वीच ग्रामस्थांकडे ‘ती’ दरीत असल्याचा उल्लेख आणि खुनासाठी वापरलेल्या दगडाचा वास घेत घरापर्यंत पोहोचलेले तपासी ‘ब्रह्मा’ श्‍वान या घटनांची परस्पर सांगड घालत पोलिसांनी संशयित पतीपर्यंत मजल मारली आहे. मात्र संशय, तांत्रिक पुरावे आणि न्यायालयात सिद्ध होणारा गुन्हा या तीन स्वतंत्र गोष्टी आहेत. रामनाथ चाचण याच्यावरील आरोपांची सत्यता पुढील तपासातून होणारच आहे. प्रेमाच्या त्रिकोणातून निर्माण झालेल्या ज्वाळांनी एका विवाहितेचा अशाप्रकारे अंत केल्याने तालुक्यातून हळहळही व्यक्त होत आहे.

Visits: 13 Today: 13 Total: 2371576

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *