पहिल्या महिन्याचे मानधन ‘स्नेहालय’ला! डॉ.सुजय विखे पाटील यांचा आदर्श निर्णय; प्रत्येक महिन्याचे मानधन सेवाभावी संस्थांना..

नायक वृत्तसेवा, अहिल्यानगर
सार्वजनिक पद, त्यातून मिळणारे मानधन आणि त्याचा वैयक्तिक लाभ घेण्याऐवजी सामाजिक कार्यासाठी त्याचा विनियोग करण्याचा निर्णय घेत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ.सुजय विखे पाटील यांनी सामाजिक बांधिलकीचा नवा आदर्श निर्माण केला आहे. अध्यक्षपदाच्या पहिल्याच महिन्यात मिळणारे संपूर्ण मानधन त्यांनी अहिल्यानगरच्या ‘स्नेहालय’ या सेवाभावी संस्थेला देण्याचा निर्णय घेतला आहे. एवढेच नव्हे, तर यापुढे दर महिन्याला मिळणारे मानधन जिल्ह्यातील वेगवेगळ्या सामाजिक संस्थांना देण्याचा संकल्पही त्यांनी केला आहे. त्यांच्या या निर्णयाचे जिल्ह्यातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातून कौतुक होत आहे.

जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतरच्या पहिल्याच संचालक मंडळ बैठकीत बँकेने दुष्काळग्रस्त शेतकर्यांसाठी एककोटी रुपयांची मदत जाहीर केली होती, त्यानंतर लागलीच डॉ.विखे पाटील यांनी घेतलेल्या या निर्णयाची राजकीय क्षेत्रात चर्चा सुरु झाली आहे. सहकार क्षेत्रातील महत्त्वपूर्ण जबाबदारी सांभाळताना सामाजिक क्षेत्रातील संस्थांच्या कार्यालाही आर्थिक बळ मिळावे, हा त्यांच्या निर्णयामागील उद्देश असल्याचे त्यांच्या समर्थकांकडून सांगितले जात आहे. पहिल्याच महिन्याच्या मानधनासाठी त्यांनी स्नेहालय संस्थेची निवड केली आहे.

स्नेहालय ही संस्था गेल्या अनेक वर्षांपासून समाजातील वंचित, निराधार आणि गरजू घटकांसाठी विविध सामाजिक उपक्रम राबवित आहे. समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर राहिलेल्या घटकांना आधार देण्याबरोबरच त्यांच्या पुनर्वसनासाठीही संस्थेचे काम सुरु आहे. अशा संस्थांना आर्थिक मदत मिळाल्यास त्यांच्या सामाजिक कार्याला अधिक बळ मिळू शकते, या भावनेतून डॉ.विखे पाटील यांनी आपल्या पहिल्या महिन्याचे मानधन संस्थेला देण्याचा निर्णय घेतला आहे.

विशेष म्हणजे, हा निर्णय केवळ पहिल्या महिन्यापुरता मर्यादित नसणार आहे. अध्यक्षपदाच्या माध्यमातून दर महिन्याला मिळणारे मानधन जिल्ह्यातील वेगवेगळ्या सामाजिक आणि सेवाभावी संस्थांना देण्याचा त्यांचा मानस आहे. त्यामुळे जिल्ह्यातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या संस्थांना मदतीचा हात मिळणार आहे.

सार्वजनिक पदावर काम करताना मिळणार्या मानधनाचा उपयोग समाजातील गरजू घटकांच्या हितासाठी व्हावा, ही त्यांची भूमिका या निर्णयातून पुढे आली आहे. सहकार क्षेत्राच्या जबाबदारीबरोबरच सामाजिक संस्थांच्या कार्याची दखल घेण्याचा हा उपक्रम निश्चितच लक्षवेधी ठरला आहे. पहिल्या महिन्याच्या मानधनातून स्नेहालयला मिळणारा आधार आणि पुढील काळात वेगवेगळ्या संस्थांना मिळणारी मदत, यामुळे डॉ.सुजय विखे पाटील यांच्या या निर्णयाला सामाजिक बांधिलकीचा वेगळा आयामही प्राप्त झाला आहे.

