जिल्हा बँकेच्या आडून थोरातांची नवी राजकीय खेळी! जावयाच्या गळ्यात जिल्हा बँकेचे उपाध्यक्षपद; विखेंसोबतचे ‘मनोमिलन’ पुन्हा वर्चस्व मिळवणार..


श्याम तिवारी, संगमनेर
विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर राजकीय पीछेहाट झालेल्या माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे औचित्य साधून नवी राजकीय खेळी केली आहे. कधीकाळी एकमेकांचे कडवे राजकीय विरोधक असल्याची भूमिका बजावणार्‍या मात्र अंतर्गत राजकीय सख्य जोपासणार्‍या विखे-थोरात या दोन घराण्यांचे संपूर्ण जिल्ह्यात राजकीय साम्राज्य होते. मात्र पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या पक्षांतरानंतर माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी पहिल्यांदाच अलिखित राजकीय लक्ष्मणरेषा ओलांडल्याने दोघांमध्ये मोठी कटुता निर्माण झाली. त्याचा परिणाम एकमेकांच्या राजकीय संघर्षात त्यांच्या साम्राज्याला धक्केही बसू लागले होते. गणेश कारखान्यासह दक्षिणेतील लोकसभा निवडणुकीत विखेंनी तर, विधानसभा निवडणुकीत थोरातांनी त्याचा प्रत्यक्ष अनुभवही घेतला. या सगळ्यांचा राजकीय बोध घेत, राजकारणात कोणीही कोणाचा कायमचा शत्रू अथवा मित्र नसतो या तत्वाचा अवलंब करीत माजीमंत्र्यांनी एक पाऊल पुढे टाकले आणि विखे घराण्यातील चौथ्या राजकीय पिढीने त्यांच्या हाकेला प्रतिसाद देत थेट संगमनेर गाठले. वरकरणी जिल्हा बँकेवरील पारंपरिक वर्चस्वासाठी या दोन घराण्यांनी राजकीय कटुता विसर्जित केल्याची चर्चा असताना, दुसरीकडे डॉ.सुजय विखे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली आपल्या जावयाला संभाव्य उपाध्यक्षपदी बसवून थोरातांनी जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा सक्रिय होण्याचे संकेत दिले आहेत. जिल्हा बँकेच्या निवडणुकीतून या दोन राजकीय घराण्यांचे झालेले ‘मनोमिलन’ जिल्ह्याच्या राजकारणावर प्रभाव टाकणारे ठरणार असून थोरातांनी एका दगडात अनेक पक्षी पाडल्याचीही चर्चा आहे.


साखरसम्राटांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणार्‍या अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकारणात विखे-थोरात या दोन राजकीय घराण्यांचे दीर्घकाळापासून वर्चस्व राहिले आहे. एकाच राजकीय पक्षात असताना जिल्ह्यावरील राजकीय पकड घट्ट करण्याच्या प्रयत्नात निर्माण झालेल्या वर्चस्ववादातून दिवंगत नेते बाळासाहेब विखे-पाटील यांच्यापासून या दोन्ही घराण्यांमध्ये राजकीय वितुष्ट आहे. मात्र या दोघांनी कधीही एकमेकांचा प्रभाव असलेल्या संस्थांमध्ये नाहक राजकीय ताकद लावून निर्णय पालटण्याचे प्रयत्न केले नाहीत. ही अलिखित लक्ष्मणरेषा परंपरेने पुढे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनीही जोपासली. वरकरणी दोघांमधून विस्तवही जात नसतं, एकमेकांवर राजकीय आसूड ओढण्याची एकही संधी सोडली जात नसतं, प्रत्यक्षात मात्र हा विरोध जिल्ह्याबाहेरचाच असायचा. त्यामुळे परास्परांचे राजकीय विरोधक असले तरीही दोघांमध्ये ‘राजकीय संख्य’ असल्याच्या शंकाही काल-परवापर्यंत उघडपणे बोलल्या जायच्या.


मात्र गेल्या दशकांत देशातील राजकारणात नरेंद्र मोदी आणि राज्याच्या राजकारणात देवेंद्र फडणवीस यांची ‘एन्ट्री’ झाल्यानंतर विखे पाटलांनी वाहत्या प्रवाहासोबत जाण्याचे ठरवून विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद असतानाही पक्षांतर करुन भाजपमध्ये प्रवेश केला. दीर्घकाळानंतर या दोन्ही नेत्यांचे पक्ष वेगळे झाल्याने जिल्ह्यासह राज्यातील राजकारणातही त्याचे पडसाद दिसू लागले. त्यानंतरच्या काळात महाविकास आघाडीची स्थापना, महसूलमंत्रीपद, पुन्हा सत्तांतर, महसूलमंत्रीपद अशा कितीतरी सलग घटनांनी जिल्ह्यातील राजकारणही ढवळून निघालं आणि या दोन राजकीय घराण्यांमधील आरोप-प्रत्यारोपांनाही धार चढत राहीली. याच दरम्यान विखेंच्या प्रभावाखाली मात्र बंदावस्थेत असलेल्या गणेश साखर कारखान्याची निवडणूक जाहीर झाली. थोरातांनी विखेंचे राजकीय विरोधक विवेक कोल्हे यांच्या सोबतीने मोट बांधली आणि कारखाना ताब्यात घेतला. या निवडणुकीत माजीमंत्र्यांनी अपेक्षित यशही मिळवलं आणि विखेंना राजकीय चपराकही दिली, मात्र अनपेक्षितपणे त्यांनी आजवर पाळली गेलेली राजकीय लक्ष्मणरेषा ओलांडली.


गणेश कारखान्याच्या निवडणुकीने या दोन्ही घराण्यांमधील राजकीय कटुता शिगेला पोहोचवली असतानाच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी थेट डॉ.सुजय विखे-पाटील यांच्या विरोधात दंड थोपटून शरद पवार गटाचे उमेदवार नीलेश लंके यांच्या विजयासाठी संपूर्ण ताकद पणाला लावली आणि डॉ.विखेंचा पराभव घडवून आणला. त्याचा वचपा काढण्यासाठी डॉ.सुजय विखे-पाटलांनी विधानसभा निवडणुकीत आपली संपूर्ण ताकद संगमनेर मतदारसंघावर केंद्रीत करुन जिल्हा परिषदेच्या गटनिहाय जाहीर सभांचा धडाका लावून वातावरण तापवण्यास सुरुवात केली. थोरातांनीही आपला मतदारसंघ कन्येच्या भरवशावर सोडून थेट राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार प्रतिभा घोगरे यांच्या प्रचाराची सूत्रे हातात घेवून थेट आव्हान देण्याचा प्रयत्न केला. या संघर्षाचा परिणाम माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांचा पराभव होण्यात झाला.


याशिवाय संगमनेर कारखान्याच्या निवडणुकीतही विखे-पाटलांकडून थेट हस्तक्षेपाची तयारी सुरु झाली होती. मात्र ऐनवेळी पदवीधरच्या आमदारांनी मध्यस्थी करुन मुख्यमंत्र्यांकरवी त्याला ‘ब्रेक’ लावल्याने या दोन घराण्यांमधील राजकीय संघर्षाची अंतिम पातळी टळली, मात्र त्यातून दोघांमध्ये राजकीय मवाळपणाही जन्माला आला आणि एकमेकांच्या राजकीय संघर्षात आपले सहकार साम्राज्य धोक्यात आणण्यापेक्षा ‘एकमेका साहाय्य करु, अवघे धरु सुपंथ..’ या सूत्राने नवी राजकीय खेळीही आकाराला आली. त्यासाठी माजीमंत्र्यांनीच एक पाऊल पुढे टाकतं जिल्ह्यातील सर्व प्रभावशाली नेत्यांना एका छताखाली आणले. अर्थात या बैठकीला सभापती प्रा.राम शिंदे आणि खासदार नीलेश लंकेंनी अनुपस्थिती दाखवली. मात्र या बैठकीतून जिल्ह्यात थोरात-विखेंच्या सहमतीचे नवे राजकारण आकाराला आले आहे.


पराभवानंतर काहीशा राजकीय पीछेहाटीचा अनुभव घेणार्‍या माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी जिल्हा बँकेच्या राजकारणात विखे-थोरात घराण्याचे वर्चस्व राहील अशी खेळी करताना त्यांचे जावयी व तालुका दूध संघाचे चेअरमन रणजीतसिंह देशमुख यांना संघाचा राजीनामा देवून जिल्हा बँकेचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सांगितले. या निवडणुकीसाठी ठरलेल्या सहकार सूत्रानुसार बँकेचे अध्यक्षपद डॉ.सुजय विखे-पाटील यांच्याकडे तर, उपाध्यक्षपद रणजीतसिंह देशमुख यांच्याकडे ठेवले जाईल असे सांगितले जाते. त्यामुळे जावयाच्या माध्यमातून सासरे जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा एकदा सक्रिय होणार असल्याचे चित्र निर्माण झाले असून सोयर्‍याधायर्‍यांच्या गोतावळ्यात तरुणाईच्या हाती सत्तेचा भाव दाखवून त्यांनी एकाच दगडात अनेक पक्षीही पाडले आहेत. जिल्ह्याच्या या बदलेल्या राजकारणाचे नवे रंग या पुढील काळात हमखास बघायला मिळू शकतात.


माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी राजकीय कटुता बाजूला ठेवून जिल्हा बँकेच्या माध्यमातून जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा एकदा दमदार एन्ट्री केल्याचे राजकीय विश्‍लेषकांचे मतं आहे. सहकाराच्या जाळ्यात विणलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रत्येक सहकारी संस्थेचा धागा जोडलेल्या या मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून जिल्ह्याच्या राजकारणावर थेट नियंत्रण मिळवण्याचा त्यामागील हेतू आहे. त्यासाठी सहमतीची एक्सप्रेस रुळावर आणण्यात आली असून त्यात जिल्ह्यातील बहुतेक पुढारी बसले आहेत. थोरातांचे जावयी रणजीतसिंह देशमुख यांनीही आपली उमेदवारी दाखल केली आहे. तत्पूर्वी त्यांनी तालुका दूध संघाच्या चेअरमनपदाचा राजीनामा दिल्याने जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षपदाचे प्रबळ दावेदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे, तर अध्यक्षपदी डॉ.सुजय विखे-पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाचा कार्यकाळ पाहता हे दोन्ही तरुण नेते एकमेकांशी संलग्न राहूनच कामकाज करणार असल्याने त्याचे प्रतिबिंब जिल्ह्याच्या राजकारणावरही ठळकपणे उमटण्याची दाट शक्यता आहे.

Visits: 2 Today: 2 Total: 2181740

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *