चौकावर अधिकार गाजवण्यासाठी ‘थोरात-विखे’ गट भिडले! माजीमंत्री थोरातांच्या गावातील प्रकार; चुलतभावासह दोन्हीकडील चाळीसजणांवर गुन्हा..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
एकीकडे जिल्हा बँकेच्या राजकारणात थोरात-विखेंची सहमती एक्सप्रेस जोरात असताना दुसरीकडे ऐन निवडणुकीच्या पूर्वसंध्येलाच माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या गृहगावी दोन्ही गटांचे समर्थक परस्परांशी भिडल्याचा विरोधाभासी प्रकार रविवारी घडला. पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या शिर्डी मतदारसंघात मोडणार्‍या जोर्वे गावात घडलेल्या या घटनेत राज्यमार्गाच्या अखत्यारित असलेल्या चौकात बेकायदा ‘खांब’ उभारण्यावरुन दोन गट एकमेकांच्या समोर आले. मात्र वेळीच दाखल झालेल्या तालुका पोलिसांनी हस्तक्षेप करीत दोन्हीकडील मंडळींना वेगळे केल्याने अनर्थ टळला. सार्वजनिक बांधकाम विभागाने बळाचा वापर करुन सायंकाळी ‘तो’ खांब हटवल्यानंतर तणाव निवळला. याप्रकरणी बेकायदा जमाव जमवून दंगल घडवणे व पोलिसांच्या प्रतिबंधात्मक आदेशाकडे दुर्लक्ष करुन कायदा मोडल्याप्रकरणी थोरात यांच्या चुलतभावासह दोन्ही बाजूच्या 42 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने बँकेच्या निवडणुकीत नेत्यांचे मनोमिलन झाले, पण कार्यकर्त्यांचेही झाले का? अशी शंकाही निर्माण केली आहे.


याबाबत तालुका पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरचा प्रकार रविवारी (ता.1) सकाळी घडला. जोर्वेगावातून जाणार्‍या राज्यमार्गावरील चौकाच्या मध्यभागी लोखंडी खांब उभा करुन त्यावर आपल्या गटाचा भगवा ध्वज फडकावण्यासाठी गेल्याकाही महिन्यांपासून माजीमंत्री बाळासाहेब थोरात व पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या समर्थकांमध्ये संघर्ष सुरु आहे. त्यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होण्याची शक्यता असल्याने तालुका निरीक्षक प्रवीण साळुंखे यांनी मध्यंतरी दोन्ही बाजूच्या मंडळींना पोलीस ठाण्यात बोलावून सदरील चौक राज्यमार्गाच्या अखत्यारित असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय कोणतेही गैरकृत्य करु नये अशी स्पष्ट सूचनाही दिली होती.


मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत रविवारी थोरात यांच्या सर्मथकांनी जोर्वेगावातील मुख्य चौकाच्या मधोमध प्लास्टिकच्या ड्रमचा वापर करुन 30 फूट उंचीचा लोखंडी खांब उभा केला व त्यावर भगवा ध्वज फडकावत एकाप्रकारे चौकावर आपले अधिराज्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराची गावात चर्चा सुरु झाल्यानंतर विखे समर्थकांनीही ‘त्या’ चौकाकडे धाव घेतली. त्यावेळी दुसर्‍या बाजूचे समर्थकही मोठ्या प्रमाणात असल्याने दोन्ही गट एकमेकांच्या समोर येवून घोषणाबाजी आणि समर्थनाचे बॅनर झळकू लागले. त्यातून गावातील वातावरण तणावपूर्ण बनल्याने तालुका पोलिसांनी फौजफाट्यासह जोर्वेगावात धाव घेतली.


त्यावेळी दोन्ही बाजूच्या मंडळीत घोषणाबाजी सुरु असल्याचे चित्र होते. पोलिसांना पाहताच एकमेकांना चेव यावा त्याप्रमाणे दोन्हीगट एकमेकांवर तावातावाने धावून जाण्याचा देखावा करु लागले. मात्र पोलिसांनी सामंजस्यातून दोन्हीकडील मंडळींना बाजूला केले, मात्र त्यानंतरही वाद शमत नसल्याने अखेर सायंकाळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता के.बी.गुंजाळ यांनी पोलीस बळाचा वापर करुन जेसीबीच्या सहाय्याने बेकायदा उभारलेला लोखंडी खांब काढून त्यामुळे झालेला खड्डा बुजवला. त्यानंतर जोर्वेत दिवसभर निर्माण झालेला तणाव हळुहळु निवळू लागला.


याप्रकरणी रात्री उशिराने पोलीस हेड काँन्स्टेबल अमित महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन तालुका पोलिसांनी माजीमंत्री थोरात यांचे चुतल बंधू इंद्रजीत पंडितराव थोरात यांच्यासह त्यांच्या गटाच्या सुरेश जगन्नाथ थोरात, शरद नारायण थोरात, संजय निवृत्ती थोरात, राजेंद्र श्रीपत थोरात, वसंत मुरलीधर बोरकर, अक्षय गणपत दिघे, रमेश बाळासाहेब दिघे, मुकेश विठ्ठल काकड, सत्यजीत प्रकाश थोरात, हर्षल निवृत्ती काकड, विठ्ठल नानासाहेब काकड, भाऊसाहेब बाबुराव दिघे, अभिषेक शरद थोरात, बादशहा रामकृष्ण बोरकर, अमित भास्कर थोरात, पूंजा यादव दिघे, कैलास पुंडलीक इंगळे, किसन हिरामन खैरे, दिगंबर नामदेव इंगळे, राहुल रविंद्र बोरकर व अनिल बाळासाहेब दिघे (सर्व रा.जोर्वे) अशा 22 जणांसह,


पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या समर्थक गटातील गोकूळ गणपत दिघे, नितीन सखाराम दिघे, विशाल भास्कर थोरात, वसंत उर्फ सचिन रामभाऊ दिघे, शरद गणपत दिघे, बाळासाहेब विठोबा जोर्वेकर, अनिकेत भारत जोर्वेकर, मयूर नामदेव गाडेकर, बाबासाहेब शिवाजी थोरात, रविंद्र नामदेव गाडेकर, बाळासाहेब कारभारी दिघे, दिलीप विठ्ठल काकड, प्रकाश वसंत काकड, गणेश बंडोपंत काकड, नंदू कारभारी थोरात, बाळासाहेब राधू इंगळे, मच्छिंद्र अंबादास पिंगळे, जितेंद्र कैलास दिघे, नवनाथ उर्फ भावड्या गंगाधर बलसाने व पंढरीनाथ दादाभाऊ बलसाने या 20 जणांसह एकूण 42 जणांवर बेकायदा जमाव जमवून दंगल घडवणे, प्रशासकीय आदेशाचा भंग करणे आणि मुंबई पोलीस अधिनियमनाचे उल्लंघन केल्याप्रकरणी भारतीय न्यायसंहितेचे कलम 189 (2), 191 (2), 194 (2) सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37 (1) (3) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


यावेळी तालुका निरीक्षक प्रवीण साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक विकास काळे, उपनिरीक्षक सचिन भाबड, सुकदेव खेमनर, हेड काँन्स्टेबल अमित महाजन, जानकीराम खेमनर, राजेंद्र घोलप, पोलीस नाईक धनंजय महाले, पोलीस काँन्स्टेबल, प्रदीप बडे, प्रमोद चव्हाण, चालक शांताराम झोडगे आदींनी जोर्वे गावात चोख बंदोबस्त ठेवला होता.


अहिल्यानगर जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेच्या यंदाच्या निवडणुकीसाठी माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपली पारंपरिक राजकीय कटुता विसरुन पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे सहमतीचा हात वाढवला आणि त्यांनीही त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला. नव्याने आकाराला आलेल्या या राजकीय सूत्राने दोन्ही दिग्गजांच्या भोवतीच असणार्‍या जिल्ह्यातील सहकाराच्या राजकारणातून बँकेची निवडणूक ‘बिनविरोध‘ होईल असे चित्रही निर्माण झाले होते. मात्र ऐनवेळी प्रा.राम शिंदे, खासदार नीलेश लंके यांनी सहमतीच्या गाडीत बसण्यास नकार दिल्याने दुष्काळात बँकेच्या निवडणुकीचा धूरळा उडण्याची स्थितीही दिसू लागली. त्याला शिंदेसेनेचीही साथ मिळाल्याने विखे-थोरातांच्या प्रयत्नातून 21 जागांमधील 11 जागा बिनविरोध झाल्या, मात्र शेवटी 10 जागांवर आज मतदान होतच आहे.


सामान्यतः अशक्य वाटणारं ‘विखे-थोरातां’चं मनोमिलन राजकारणात काहीही अशक्य नसल्याचे अधोरेखीत करीत असताना त्याच बँकेच्या निवडणुकीच्या पूर्वसंध्येला जोर्वे या थोरातांच्या मूळगावी त्यांच्याच सख्ख्या चुलतभावाच्या नेतृत्वाखाली विखे समर्थक गटाशी झालेला हा संघर्ष विरोधाभास निर्माण करणारा आहे. या घटनेने जिल्हा बँकेच्या राजकारणात नेत्यांचे मनोमिलन झाले असले तरीही कार्यकर्त्यांना हा निर्णय खरोखरी मनापासून रुचलाय का? अशी शंका निर्माण केली आहे.


एकमेकांमधील संघर्ष थांबतो, कटकटी बंद होतात त्यामुळे आम्ही एकत्र आल्याचा कार्यकर्त्यांना आनंदच झाला पाहिजे. राजकारण आणि सहकार हे दोन वेगळे विषय आहेत. राजकारणात तात्विक मतभेद असावेत मात्र व्यक्तिद्वेष असू नये अशी आमची नेहमी भूमिका राहीली आहे. सगळ्यांनीच ती पाळली तर, राज्यात सध्या ज्या पद्धतीने राजकारणाची पातळी घसरली आहे, रसातळाला गेली आहे त्यावर आपल्या जिल्ह्याने राज्याला काहीतरी वेगळी दिशा दाखवावी यासाठी सहकारात सहमतीचा प्रयोग केला आहे, त्यातून चांगलंच घडवण्याचा हेतू आहे.
बाळासाहेब थोरात
माजीमंत्री, संगमनेर विधानसभा

Visits: 4 Today: 4 Total: 2274687

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *