ब्राह्मणगाव भांडमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ; चार लाखांचा ऐवज लांबविला राहुरी पोलिसांत अज्ञात चोरट्यांविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल; नागरिक भयभीत

नायक वृत्तसेवा, राहुरी
तालुक्यातील ब्राह्मणगाव भांड येथे गुरुवारी (ता.3) पहाटे साडेतीन वाजता तनपुरे साखर कारखान्याचे माजी संचालक रमेश नानासाहेब वारुळे यांच्या बंगल्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला. सोन्याचे दागिने व रोख रक्कम, असा 4 लाख 17 हजार 300 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला. वारुळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राहुरी पोलिसांत अज्ञात चोरट्यांविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, वारुळे यांच्या बंगल्याच्या मागील दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून तीन चोरट्यांनी आत प्रवेश केला. कपाट फोडून सामानाची उचकापाचक केली. यावेळी घरातील एक महिला जागी झाल्याने एका चोरट्याने तिला सत्तूरचा धाक दाखवला. चोरट्यांनी घरातील कपाट थेट शेतात नेऊन फेकून दिले.

या प्रकरणी वारुळे यांनी दिलेल्या फिर्यादीत, दोन लाख व साठ हजारांचे दोन चोकर हार, वीस हजारांची कर्णफुले, तीस हजारांचे एक तोळ्याचे मंगळसूत्र, वीस हजारांची अर्ध्या तोळ्याची अंगठी, नऊ हजारांची खड्याची अंगठी, असे सोन्याचे दागिने व लोखंडी कपाटातील दीड हजार, रवींद्र वारुळे यांच्या खिशातील सात हजार, रमेश वारुळे यांच्या खिशातील चार हजार 300 रुपये, वारुळे यांचे बंधू सुभाष वारुळे यांच्या घरातून 60 हजारांची प्रत्येकी एक तोळ्याची सोन्याची दोन मंगळसूत्रे व त्यांच्या खिशातील साडेपाच हजारांची रोकड चोरट्यांनी लंपास केल्याचे म्हटले आहे. दरम्यान, पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
