पाथर्डी आगाराच्या बसचालकाची संगमनेरात आत्महत्या! बसमध्येच घेतला गळफास; मृत्यूपूर्व चिठ्ठीत देणीदारांची यादी


नायक वृत्तसेवा, संगमनेर
राज्य परिवहन महामंडळाच्या पाथर्डी आगारातील बसचालकाने संगमनेर मुक्कामी असलेल्या आपल्या ताब्यातील बसमध्येच गळफास घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज भल्या सकाळी संगमनेरात घडली. सुभाष तेलोरे असे आत्महत्या केलेल्या बसचालकाचे नाव आहे. त्यांनी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत सहा जणांकडून त्यांनी जवळपास साडेसहा लाख रुपयांची उसनवारी केल्याचे आढळून आले असून ‘त्या’ सर्वांचे पैसे परत करण्याची सूचनाही त्यांनी आपल्या कुटुंबियांना केली आहे. आज सकाळी सहाच्या सुमारास सदरची घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरु करण्यात आला आहे.

राज्यातील सतत तोट्यात असलेल्या महामंडळांपैकी एक असलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे नाव अग्रभागी आहे. महामंडळाच्या कर्मचार्‍यांना असलेले तुटपुंजे पगार, त्यातही ते वेळेवर मिळत नसल्याने अनेक कर्मचार्‍यांचे आर्थिक गणित कोलमडून त्यांच्यावर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. आज सकाळी संगमनेरात घडलेला प्रकारही त्यातूनच घडल्याचाही संशय असून त्या दृष्टीने पोलिसांचा तपास सुरु आहे.

सोमवारी रात्री नऊच्या सुमारास पाथर्डी आगाराची ‘पाथर्डी-नाशिक’ (क्र,एम.एच.14/बी.टी.4887) नेहमीप्रमाणे संगमनेर आगारात पोहोचली. यावेळी बसमधील डिझेल संपल्याने बसचालकाने इंधन भरण्यासाठी बस आगारात नेली असता डिझेल शिल्लक नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्याचवेळी पाथर्डी आगाराची आणखी एक बस संगमनेर स्थानकात आली, मात्र त्या बससाठीही आवश्यक असलेले डिझेल उपलब्धच नसल्याने या दोन्ही बसमधून नाशिककडे जाणार्‍या प्रवाशांना अन्य बसेसमध्ये बसवून या दोन्ही बस आगाराच्या बाह्य बाजूस उभ्या करण्यात आल्या.

या दोन्ही बससच्या चालक व वाहकांनी एकत्रित जेवण करुन ते आपापल्या बसमध्ये झोपीही गेले. आज (ता.21) पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास दोन्ही बसमधील चौघेही झोपेतून उठले व त्यांनी हातपाय धुवून आपल्या नित्यक्रमाला सुरुवात केेली. यावेळी उर्वरीत तिघांची नजर चुकवून सुभाष तेलोरे आपल्या ताब्यातील बसमध्ये चढले आणि त्यांनी सोबत आणलेल्या दोरीच्या सहाय्याने बसच्या आंतील लोखंडी पाईपला गळफास घेवून आपले जीवन संपविले. या दरम्यान सदर बसचा वाहक बसजवळ पोहोचला, मात्र चालक दिसत नसल्याने त्याने आजूबाजूला शोध घेण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांनी बसमध्ये पाहीले असता त्यांना जबर धक्का बसला.

काही क्षणांपूर्वी सोबत असलेला, आपल्याशी बोलणारा आपणा सहकारी कर्मचारी असा अचानक गळफास कसा घेवू शकतो या विचाराने त्यांचा अक्षरशः थरकाप उडाला. त्याने ओरडाओरड केल्यानंतर अन्या कर्मचार्‍यांसह काही प्रवासीही तेथे धावले. घडल्या प्रकाराबाबत शहर पोलिसांना माहिती देण्यात आल्यानंतर सकाळी साडेसातच्या सुमारास त्यांचा मृतदेह बसबाहेर काढण्यात आला. यावेळी पोलिसांना एक चिठ्ठीही आढळून आली. या चिठ्ठीत सुभाष तेलोरे यांनी सहा जणांची नावे लिहिली असून त्यांना देणी असलेली रक्कमही त्या त्या नावांपुढे नमूद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या सर्वांशी प्रेमाने बालावे, त्यांना उलटसुलट काहीही बोलू नये असे स्पष्टपणे त्यांनी नमूद केले असून महामंडळाचे पैसे येताच त्या सर्वांचे पैसे परत करावेत असेही त्यांनी सांगितले आहे.

याशिवाय अतिशय तोकड्या शब्दात त्यांनी ‘तुम्ही दोघा भावांनी एकविचाराने रहावे, माझा अंत्यविधी अमूक ठिकाणी करावा. मी तुम्हांला त्रास होवू देणार नाही, सदैव तुमच्या पाठिशी राहील’ असा मजकूर लिहून ठेवला आहे. त्यावरुन त्यांच्या पाठीमागे दोन मुले व पत्नी असा संसार असल्याचा अंदाज येतो. या घटनेने जिल्ह्यातील महामंडळाच्या कर्मचार्‍यांमधून हळहळ व्यक्त केली जात असून मयत तेलोरे अतिशय चांगल्या स्वभावाचे चालक असल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणी शहर पोलिसांच्या दप्तरी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

राज्य परिवहन महामंडळातील चालक व वाहक अतिशय प्रमाणिकपणे सेवा बजावित असतात. मात्र तरीही सतत तोट्यात असलेल्या महामंडळाकडून त्यांची सतत उपेक्षा होत असते. अन्य विभागांच्या तुलनेत अगदीच तुटपुंजे पगार, त्यातही ते कधीही वेळेवर मिळत नसल्याने अनेक चालक-वाहक कर्जबाजारी झाले आहेत. या प्रकरणातून ही गोष्ट स्पष्टपणे अधोरेखीत झाली असून शासनाच्या ती लक्षात येण्यासाठी एका सद्गृहस्थ असलेल्या बसचालकाला आपला बळी द्यावा लागला आहे.

Visits: 87 Today: 1 Total: 1112534

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *