भाजप तालुकाध्यक्षांच्या पुतण्याला भररस्त्यात बेदम मारहाण! घारगावमध्ये पत्रकाराची ‘दबंगगिरी’; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
शब्दांच्या माध्यमातून अन्यायाला वाचा फोडणारी लेखणी जेव्हा हातात कायदा घेते, तेव्हा समाजाची दिशा नेमकी कुठे चालली आहे, असा गंभीर प्रश्न निर्माण होतो. संगमनेर तालुक्यात पत्रकारितेचा एक वेगळा आणि संयमी इतिहास असताना, घारगाव परिसरात एका पत्रकाराने आपल्या सहकार्‍यांसह भाजपच्या माजी तालुकाध्यक्षांच्या पुतण्यावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली असून पठारभागात उलटसुलट चर्चा सुरु आहे. या प्रकरणी जखमी तरुणाच्या फिर्यादीवरुन घारगाव पोलिसांनी पत्रकार गणेश आहेरसह पाचजणांवर गुन्हा दाखल केला आहे.


याबाबत घारगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष काशिनाथ पावसे यांचे पुतणे विजय सदाशिव पावसे (रा.वय 30, हिवरगाव पावसा) हे शुक्रवारी (ता.24) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास आपली मालवाहू चारचाकी वाहन घेऊन संगमनेर-पुणे महामार्गावरुन जात होते. घारगाव येथील लक्ष्मी हॉटेलजवळ गाडी वळवत असताना रस्त्याने जाणार्‍या दोघांना त्यांच्या वाहनाचा ‘कट’ लागल्याच्या संशयावरुन वादाची ठिणगी पडली. त्यावेळी विजय पावसे यांनी वाद टाळण्यासाठी तेथून निघून जाणे पसंत केले.


मात्र, हा वाद तिथेच संपला नाही. विजय पावसे कुरकुंडी फाट्याजवळ पोहोचले असता, दोन मोटारसायकलवरुन आलेल्या पाच जणांनी त्यांची गाडी अडवली व ‘तू लक्ष्मी हॉटेलजवळ का थांबला नाहीस?’ असा जाब विचारत त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. या टोळक्यातील एकाने माझे नाव गणेश आहेर असून मी पत्रकार आहे, अशी ओळख सांगत थेट विजय पावसे यांच्यावर हात उचलला. त्यानंतर राजवर्धन पिसाळ आणि इतर तीन अनोळखी व्यक्तींनी पावसे यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. केवळ मारहाण करुन हे आरोपी थांबले नाहीत, तर गणेश आहेर याने विजय पावसे यांच्या गळ्यातील दोन लाख रुपये किमतीची दोन तोळ्यांची सोनसाखळी आणि राजवर्धन पिसाळ याने खिशातील 30 हजार रुपयांची रोकड जबरदस्तीने काढून घेतल्याची तक्रार फिर्यादीत करण्यात आली आहे. ‘तु पुन्हा या भागात आलास, तर तुझे पाय तोडून टाकू’ अशी धमकीही यावेळी देण्यात आल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे.


या घटनेनंतर परिसरात काहीकाळ दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. घारगाव पोलिसांनी याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम 119 (2), 189 (2), 191 (2), 115 (2), 352 आणि 351 (2) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. हेड कॉन्स्टेबल राजेंद्र कोंडे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. घारगावमध्ये घडलेले हे प्रकरण वरकरणी रस्ते अपघाताच्या वादातून झाल्याचे दिसत असले, तरी एखाद्या पत्रकाराने अशा प्रकारे गुन्हेगारी प्रवृत्तीचे प्रदर्शन करण्यामागे जुने वैमनस्य अथवा अन्य काही कारण आहे का? याचा शोध घेण्याची गरज आहे. या प्रकाराने तालुक्यात खळबळ उडाली असून पठारभागात उलटसुलट चर्चांनाही उधाण आले आहे.


या प्रकरणात आरोपी म्हणून समोर आलेल्या पत्रकार गणेश आहेर बाबत पठारभागात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले असून अवैध व्यावसायिक, वाळू तस्कर यांच्याशी हितसंबंध जोपासण्यासाठीच या महाशयांनी पत्रकारितेचा बुरखा पांघरल्याचे बोलले जात आहे. या महाभागाने पत्रकारितेचा रुबाब झाडीत घारगाव पोलिसांवरही ‘धाक’ निर्माण केल्याची चर्चा असून प्रत्यक्षात सक्रिय पत्रकारितेत नसतानाही अन्य माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या पठारभागातील बातम्या सोशल माध्यमात शेअर करीत तो या बातम्या आपलेच परिश्रम असल्याचे भासवून यंत्रणांवर दबाव निर्माण करायचा अशाही चर्चा सोशल माध्यमात सुरु आहेत. घारगाव पोलिसांनीही या प्रकरणाचा प्रामाणिकपणे सखोल तपास करुन सत्य समोर आणण्याची गरज आहे.

Visits: 2 Today: 2 Total: 1750361

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *