उप-जिल्हा रुग्णालय दर्जावाढीचा प्रस्ताव तातडीने तयार करा ः थोरात
उप-जिल्हा रुग्णालय दर्जावाढीचा प्रस्ताव तातडीने तयार करा ः थोरात
संगमनेर पालिकेच्या कॉटेज रुग्णालयाचेही महिला रुग्णालयात होणार रुपांतर
नायक वृत्तसेवा, संगमनेर
येथील 30 खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे 50 खाटांच्या उप-जिल्हा रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धन करण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक असणारा प्रस्ताव सार्वजनिक आरोग्य विभागाने तातडीने तयार करावा, असे निर्देश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मंगळवारी (ता.3) दिले आहेत.
संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयाचा उप-जिल्हा रुग्णालय दर्जावाढ आणि कॉटेज रुग्णालयाचे महिला रुग्णालयात रुपांतर करणे याबाबतची आढावा बैठक मंगळवारी महसूल मंत्री थोरात यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, आमदार डॉ.सुधीर तांबे, आरोग्य विभागाच्या संचालिका डॉ.साधना तायडे यांच्यासह सार्वजनिक आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी मंत्री थोरात म्हणाले, ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची होत असलेली गर्दी लक्षात घेता या रुग्णालयाचे श्रेणीवर्धन तातडीने होणे आवश्यक आहे. संगमनेर तालुक्याचा असलेला मोठा विस्तार आणि वाढते शहरीकरण यामुळे येथील लोकसंख्या लक्षात घेता नागरिकांना चांगल्या दर्जाच्या वैद्यकीय सेवा उप-जिल्हा रुग्णालयात उपलब्ध होऊ शकतील. म्हणून उप-जिल्हा रुग्णालय दर्जावाढीबाबतचा प्रस्ताव तातडीने तयार करण्यात यावा, अशा सूचना थोरात यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.
शहरात 30 खाटांचे महिला रुग्णालय होणार…
महिलांसाठी स्वतंत्र रुग्णालयासाठी नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांनी सातत्याने विशेष पाठपुरावा केला असून संगमनेर नगरपरिषदेच्या अंतर्गत येणार्या कॉटेज रुग्णालयाचे रुपांतर महिला रुग्णालयात करण्याचा प्रस्ताव सार्वजनिक आरोग्य विभागास देण्यात आला आहे. या प्रस्तावाचा सार्वजनिक आरोग्य विभाग अभ्यास करुन येथे 30 खाटांचे महिला रुग्णालय तातडीने सुरु करण्याच्या कामाला गती दिली जाईल असे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी यावेळी सांगितले.