अकोलेनाका ‘जळीत’ प्रकरणी सर्व आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर! पोलिसांना न्यायालयाची चपराक; आरोपींनीच सादर केले सत्यतेचे पुरावे..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या महिन्यात अकोले नाक्यावर घडलेल्या जळीत प्रकरणी तेथीलच एकूण बारा जणांवर विविध गंभीर कलमान्वये गुन्हे दाखल झाले होते. यासर्व आरोपींनी आपला या प्रकरणाशी संबंध नसल्याचे सांगत संगमनेरच्या अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यावर अतिरीक्त जिल्हा न्यायाधीश प्रशांत कुलकर्णी यांच्यासमोर सविस्तर सुनावणी झाली असता न्यायालयाने सर्व आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर केला असून केवळ संध्या खरे यांना काही शर्थी घालण्यात आल्या आहेत. या निर्णयाने संगमनेर शहर पोलिसांना मोठी चपराक बसली असून आरोपींनीच या प्रकरणात आपला सहभाग नसल्याचे तांत्रिक पुरावे न्यायालयासमोर सादर केले होते हे विशेष.

गेल्या 25 एप्रिलरोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास अकोले नाका परिसरात मागील भांडणाच्या कारणातून सदरचे वाद उफाळले होते. यातील पहिली फिर्याद परिघा सहादू सूर्यवंशी यांनी दाखल केली होती. त्यानुसार बाळू उर्फ दीपक केशव रणशेवरे, योगेश मनोहर सूर्यवंशी, शिवानी योगेश सूर्यवंशी, सागर मनोहर सूर्यवंशी, मनोहर बाबुराव सूर्यवंशी, सचिन मनोहर सूर्यवंशी, साक्षी विनोद सूर्यवंशी, उमेश मनोहर सूर्यवंशी, स्वाती उमेश सूर्यवंशी, विनोद मनोहर सूर्यवंशी, संध्या विलास खरे व बाळासाहेब बाबुराव सूर्यवंशी हे गुन्हेगारी कृत्य करण्याच्या हेतूने फिर्यादीच्या घराजवळ जमले. त्यातील एकाने विटकरीचा तुकडा मारला, तर योगेश सूर्यवंशी याने त्यांच्या अंगावर पेट्रोल ओतले. एका आरोपीने काडीपेटीची काडी पेटवून त्यांच्या अंगावर फेकली. त्यामुळे पेटलेल्या फिर्यादीला वेदना असह्य झाल्याने त्यांनी जवळच उभ्या असलेल्या संध्या खरे या महिलेला मिठी मारली.

प्रत्यक्षात न्यायालयासमोर वस्तुस्थिती मांडतांना आरोपींच्यावतीने आरोपी क्रमांक 11 संध्या खरे वगळता घटनास्थळावर अन्य कोणताही आरोपी उपस्थित नसल्याचे सीसीटीव्ही फूटेज न्यायासमोर सादर करण्यात आले. वास्तविक फिर्यादीनेच संध्या खरे यांना काहीतरी हेतू ठेवून स्वतःच्या घरी बोलावले होते. यावेळी तक्रारदार महिलेने स्वतःच अंगावर पेट्रोल टाकून पेटवून घेतले व संध्या खरे यांनाही पेटवण्याचा प्रयत्न केला. मात्र कोणीतरी धावपळ करीत आग विझवली. या दरम्यान उर्वरीत सर्व 11 आरोपी आपापल्या कार्यस्थळी व्यस्त होते. मात्र संबंधित फिर्यादी आणि आरोपी यांच्यात पूर्वीपासून वेगवेगळे खटले सुरु असल्याने त्यातून ही खोटी तक्रार करुन त्यांना त्यात गोवण्यात आल्याचे आरोपींच्या वकीलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

बचाव पक्षाच्या वकीलांच्या युक्तिवादावर सरकारी पक्षाने आक्षेप घेत हत्येचा प्रयत्न (कलम 307) करणार्यास जन्मठेपेपर्यंत शिक्षा असल्याने आरोपींना अटकपूर्व जामीन मिळाल्यास ते पुन्हा अशाच घटना घडवतील व तक्रारदार आणि साक्षीदारांवर दबाव आणतील असा युक्तिवाद सादर केला. यावेळी बचावपक्षाने घटनेच्या दिवसाचे वस्तुनिष्ठ चित्रण असलेले सीसीटीव्ही फूटेज न्यायालयासमोर सादर केले. त्यावरुन आरोपी संध्या खरे यांना तक्रारदारानेच फोन करुन बोलावल्याचे दिसत असल्याचे निरीक्षण समोर आले. आरोपी क्रमांक दोन ते दहा हे समाजात प्रतिष्ठीत समजली जाणारी पात्रे असल्याचा युक्तिवादही यावेळी बचावपक्षाकडून करण्यात आला व घटनेच्यावेळी यातील कोणीही घटनास्थळी नव्हते याकडे न्यायालयाचे लक्ष्य वेधण्यात आले. केवळ आरोपींना त्रास देण्यासाठी या प्रकरणात त्यांचे नाव गोवण्यात आल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

यातील आरोपी मनोहर सूर्यवंशी हे घटनेच्यावेळी धुपे येथील जिल्हा परिषद शाळेत कर्तव्यावर हजर होते, तसे शाळेच्या मुख्याध्यापकांचे पत्र त्यांनी सादर केले. आरोपी क्रमांक बारा बाळासाहेब सूर्यवंशी सध्या डायलीसीसवर असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत, तसे वैद्यकीय प्रमाणपत्रही न्यायालयात सादर करण्यात आले. तर आरोपी क्रमांक चार सागर सूर्यवंशी शासकीय सेवेत उपअभियंता म्हणून खेड (जि.रत्नागिरी) येथे कर्तव्यावर हजर होते, तसे प्रतिज्ञापत्रही संबंधित विभागाकडून दाखल करण्यात आले होते. आरोपी क्रमांक 8 उमेश सूर्यवंशी व आरोपी क्रमांक 10 विनोद सूर्यवंशी हे दोघेही त्यावेळी एका व्यायामशाळेत असल्याचे व तेथून चहा घेण्यासाठी एका हॉटेलमध्ये गेल्याचे सीसीटीव्ही फूटेज न्यायालयात सादर करण्यात आले. यातील आरोपी क्रमांक सात साक्षी विनोद सूर्यवंशी व आरोपी क्रमांक 9 स्वाती उमेश सूर्यवंशी त्यावेळी खासगी कोचिंग वर्गाला हजर असल्याचे पुरावेही यावेळी न्यायालयासमोर मांडण्यात आले.

बचावपक्षाने न्यायालयासमोर ठेवलेले सीसीटीव्ही फूटेज व अन्य पुराव्यांची जिल्हा न्यायाधिश प्रशांत कुलकर्णी यांनी सरकारी वकीलांसह आरोपींच्या वकीलांसमवेत पडताळणी केली. त्यावरुन तक्रारदार महिलेने स्वतः अंगावर पेट्रोल ओतल्याचे दिसून आले, यावेळी तेथे हजर असलेल्या एका मुलीला या घटनेचे चित्रीकरण करण्यासही सांगण्यात आले, आरोपी क्रमांक 11 संध्या विलास खरे या घटनास्थळी उपस्थित होत्या, मात्र तक्रारदार महिलाच या संपूर्ण घटनेत अधिक आक्रमक होत्या, काही वेळातच संबंधित तपास अधिकारी घटनास्थळी पोहोचले, तेव्हाही तक्रारदारानेच स्वतः पेट्रोल ओतल्याचे सीसीटीव्ही फूटेजवरुन स्पष्ट होत असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले.

आरोपींनी त्यांच्या बचावात नोंदविलेल्या या तथ्यांचा विचार करता, कथित घटनेत वरील बाराही पैकी कोणत्याही आरोपींचा प्रथमदर्शनी सहभाग दिसत नसल्याचे महत्त्वपूर्ण निरीक्षणही न्यायालयाने यावेळी नोंदविले. त्यामुळे अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केलेल्या सर्व आरोपींना संरक्षण देणे योग्य आहे. असे सांगत न्यायालयाने उर्वरीत अकरा आरोपींना विनाशर्थ अटकपूर्व जामीन मंजूर केला, मात्र या प्रकरणाचा तपास अपूर्ण असल्याने घटनास्थळी हजर असलेल्या एकमेव आरोपी संध्या खरे यांना काही अटी व शर्थी घालतांना सर्व आरोपंीना अटक झाल्यास 15 हजार रुपयांच्या व्यक्तिगत जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. मात्र आरोपी क्रमांक 11 संध्या विलास खरे यांना तपासात सहकार्य करण्यासह आवश्यक असेल तेव्हा तपासी अधिकारी बोलवतील त्यावेळी हजर राहण्याचे आदेश देत सर्वच्या सर्व बाराही आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला. या निर्णयाने पोलिसांना मोठी चपराक बसली असून पोलिसांच्या कारभारावर पुन्हा एकदा चर्चांचे फड रंगू लागले आहेत.

सदरचे जळीतकांड घडत असतांना हा सगळा प्रकार तेथील सीसीटीव्ही कॅमेर्यामध्ये कैद होत होता, घटनेनंतर काही वेळातच त्यासह काहींनी मोबाईल केलेले छायाचित्रणही व्हायरल झाले होते. असे असतांनाही पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष करीत प्रत्यक्ष घटनास्थळी नसलेल्या एकूण अकरा आरोपींवर अतिशय गंभीर कलमान्वये गुन्हे दाखल केले. याबाबत माध्यमांमध्येही ‘त्या’ घटनेचे छायाचित्र प्रसिद्ध झाले होते. आता न्यायालयानेही त्याच फूटेजच्या आधारावर व सादर झालेल्या कागदपत्रांवर सर्वच्या सर्व आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर केल्याने संगमनेर शहर पोलिसांच्या कामाचे वाभाडे निघाले आहेत.

