केंद्र सरकारकडून सूडबुद्धीने गांधी परिवाराला त्रास ः आ. डॉ. तांबे केंद्रीय तपास यंत्रणांच्या गैरवापराबाबत संगमनेरात काँग्रेसचे आंदोलन
नायक वृत्तसेवा, संगमनेर
देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात आणि स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देश उभारणीमध्ये अत्यंत मोलाचे योगदान देणार्या गांधी कुटुंबाला सूडबुद्धीने जाणीवपूर्वक त्रास देण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत आहे. खासदार राहुल गांधी हे शूर योद्धे असून ते कधीही सरकारला शरण जाणार नाही. महागाई, बेरोजगारी, ढासळलेली अर्थव्यवस्था हे अपयश झाकण्यासाठी केंद्र सरकारकडून सूडबुद्धीने विरोधी पक्षांच्या नेत्यांवर ईडीच्या कारवाया होत असल्याची टीका नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले असून खासदार राहुल गांधी व खासदार सोनिया गांधी यांना ईडीने पाठवलेल्या नोटीस विरोधात संगमनेरमध्ये काँग्रेसच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले.
संगमनेर बसस्थानक येथे संगमनेर तालुका व शहर काँग्रेस समितीच्यावतीने खासदार राहुल गांधी व काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांना पाठविलेल्या ईडी नोटीसच्या निषेधार्थ धरणे आंदोलन झाले. यावेळी आमदार डॉ. सुधीर तांबे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबा ओहोळ, दुर्गा तांबे, कर्करोगतज्ज्ञ डॉ. जयश्री थोरात, शंकर खेमनर, लक्ष्मण कुटे, आर. एम. कातोरे, नवनाथ अरगडे, भाऊसाहेब कुटे, बाळासाहेब गायकवाड, अर्चना बालोडे, सुभाष सांगळे, आनंद वर्पे, जावेद शेख, गौरव डोंगरे, त्र्यंबक गडाख, मिलिंद कानवडे, सिद्धाराम दिड्डी, सोमेश्वर दिवटे, बाळासाहेब पवार, किशोर टोकसे, सुनंदा जोर्वेकर, सोनाली शिंदे, नवनाथ आंधळे, अजय फटांगरे, माधव हासे आदिंसह काँग्रेसच्या सर्व सेलचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार डॉ. तांबे म्हणाले, स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देश उभारणीत गांधी व नेहरू कुटुंबाचे मोठे योगदान आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्वतःची सर्व संपत्ती देशाकरीता दान केली होती. स्वर्गीय इंदिरा गांधी व राजीव गांधी यांनी देशाच्या एकात्मतेसाठी प्राणांची आहुती दिली. मात्र त्याच परिवाराला टार्गेट करून सूडबुद्धीने खासदार सोनिया गांधी व राहुल गांधी यांना नोटिसा पाठविल्या जात आहे. सध्या देशात अत्यंत अस्थिरता निर्माण झाली आहे. महागाईने उच्चांक गाठला आहे. बेरोजगारी वाढली आहे. केंद्र सरकार सर्व पातळ्यांवर अपयशी ठरले असून हे अपयश झाकण्यासाठी सीबीआय व तत्सम केंद्रीय यंत्रणांचा वापर केंद्र सरकार करत आहे.
सध्या देशातील लोकशाही पूर्णपणे धोक्यात आली असून प्रत्येक काँग्रेसीने याविरुद्ध आवाज उठविण्यासाठी घरोघर जाऊन काँग्रेसचा विचार सांगितला पाहिजे. खासदार राहुल गांधी हे शूर योद्धे आहेत ते कधीही केंद्र सरकारच्या या कारवायांना शरण जाणार नाहीत. संपूर्ण देशामध्ये त्यांना पाठिंबा देण्यासाठी मोठे जनआंदोलन होत आहे. राज्यात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष एकवटला असून राज्यातील जनता काँग्रेसच्या पाठिशी उभी राहिली आहे. देश आणि लोकशाही वाचवायची असेल तर प्रत्येकाला मोदी सरकारच्या जुलमी हुकूमशाही विरुद्ध लढावे लागेल असेही ते म्हणाले.
यावेळी रामहरी कातोरे, प्रा. बाबा खरात, सुनीता कांदळकर, भास्कर शेरमाळे, सुभाष सांगळे, मिलिंद कानवडे, दत्तू कोकणे, गौरव डोंगरे, भारत मुंगसे, राजेंद्र कहांडळ, रावसाहेब कोटकर, के. के. थोरात, सुहास आहेर, गणेश गुंजाळ, सीताराम वर्पे, हैदर शेख, तालुका काँग्रेस, शहर काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी मोदी सरकार हाय हाय, केंद्र सरकार काँग्रेस से डरती है, ईडी को आगे करती है अशा प्रकारच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.