‘अखेर’ निमगावच्या मुन्नाभाईसह दोघे गजाआड! वैद्यकीय पदवी नसतांनाही ‘अॅलोपॅथी’ उपचार; गुन्हा टाळण्यासाठी दबावतंत्राचाही वापर..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
मानवी शरीरावर कोणत्याही प्रकारचे औषधी उपचार करण्याची पात्रता नसतानाही चक्क बनावट नावाने रुग्णांवर ‘अॅलोपॅथी’ उपचार करणारा खोटा दवाखाना रविवारी तालुका वैद्यकीय अधिकार्यांनी उघडा पाडला. धक्कादायक म्हणजे या प्रकरणात रंगेहाथ पकडलेल्या मुन्नाभाई शैलेश कडलग याच्यावर यापूर्वी कोविड काळातही कारवाई झाली होती. त्यानंतरही त्याने यंत्रणांना चकवा देण्यासाठी तत्कालीन तालुका आरोग्य अधिकार्यांच्या पाठबळावर एका ‘बी.ए.एम.एस’ पदवीधारकाच्या नावाचा वापर करुन बिनबोभाटपणे आपला वैद्यकीय धंदा सुरु ठेवला होता. मात्र भ्रष्टाचाराने बरबटलेल्या ‘त्या’ अधिकार्याचे निलंबन होताच तालुक्याचा आरोग्य विभाग सक्रिय झाला आणि निमगाव भोजापूरमधील रुग्णांच्या जीवाशी राजरोस खेळण्याचा हा धक्कादायक प्रकार उजेडात आला. संतापजनक म्हणजे या कारवाईनंतर गुन्हा दाखल होवू नये यासाठी आरोग्य विभागासह पोलिसांवर प्रचंड दबाव निर्माण केला गेला. या दरम्यान आरोपीच्या घराची झाडाझडती घेतानाही गैरप्रकार घडल्याची चर्चा आहे, मात्र त्याला दुजोरा शोधण्याचे काम सुरु आहे. ‘मुन्नाभाई’ असूनही त्याला वाचवण्यासाठी निर्माण झालेल्या वलयातूनच तालुका पोलिसांची भूमिका संशयीत झाली होती, मात्र दैनिक नायकने आपली सामाजिक बांधिलकी जोपासताना यंत्रणेचे कान उपटताच रात्री उशिराने पोलिसांनी निमगावमध्ये छापा घालून मुन्नाभाई शैलेश कडलगसह त्याला आपली पदवी देवून एकप्रकारे संगनमताने वैद्यकीय धंदा चालवणार्या डॉ.प्रवीण कवडे या दोघांनाही गजाआड घातले आहे.

संगमनेर तालुक्यातील ग्रामीणभागात राहणार्या नागरिकांचे आरोग्य चांगले रहावे यासाठी जिल्हा परिषदेकडून प्रत्येक तालुक्यात लोकसंख्येच्या प्रमाणात प्राथमिक आरोग्य केंद्र चालविली जातात. त्याचे नियंत्रण पंचायत समितीच्या आरोग्य विभागाकडे असते. तालुका आरोग्य अधिकारी या विभागाचे प्रमुख असतात. संगमनेर तालुक्यात अशाप्रकारची बारा प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. मात्र त्या उपरांतही या सुविधा तोकड्याच असल्याने आजही मोठ्या लोकसंख्येला वैद्यकीय उपचारांसाठी खासगी दवाखान्यांचा आधार घ्यावा लागतो. याचा गैरफायदा घेत अनेक भोंदूंनी ग्रामीण जनतेला आपण डॉक्टर असल्याचे भासवून जागोजागी उपचार केंद्र सुरु केले असून कोणतेही वैद्यकीय ज्ञान नसतानाही चक्क रुग्णांना ‘अॅलोपॅथी’ औषधे देवून त्यांच्या जीवाशी उघड खेळ सुरु केला आहे.

धक्कादायक म्हणजे गेल्या 25 वर्षांपूर्वी संगमनेर तालुक्यात वैद्यकीय अधिकारी म्हणून रुजू झालेल्या डॉ.सुरेश घोलप यांनी शासकीय सेवेतील आपली संपूर्ण कारकीर्द एकाच तालुक्यात आणि शहराभोवतीच्या आरोग्य केंद्रात घालवून ‘तालुका आरोग्य अधिकार्याचे सिंहासन’ मिळवले आणि त्यावरच गेल्या सात-आठ वर्षांपासून ते अक्षरशः चिकटून बसले होते. त्यांच्या संपूर्ण कारकीर्दीत त्यांच्यावर अनेकवेळा भ्रष्टाचार, शिस्तभंग, अनियमितता, मनमानी आणि लैंगिक छळासारखे गंभीर आरोप झाले, मात्र ‘लोटांगण’ वृत्तीचा अवलंब करुन प्रत्येकवेळी त्यांनी आपल्या डोक्यावरील ‘त्या’ छत्राचा भरवसा ढळू दिला नाही. त्यामुळे डॉ.घोलप म्हणजे तालुक्याच्या आरोग्य विभागातील ‘अजगर’ अशी त्यांची ओळख निर्माण झाली. त्यांच्याच कृपाशीर्वादातून तालुक्याची आरोग्य व्यवस्था पोखरली गेली असून शैलेश कडलग सारख्या मुन्नाभाईंनी त्यांच्याच पाठबळावर गावोगावी वैद्यकीय कत्तलखाने उघडले आहेत.

विशेष म्हणजे कोविड संक्रमणाच्या काळात संपूर्ण तालुक्यातील संक्रमण नियंत्रणात येत असतानाही निमगाव भोजापूर व परिसरातील काही गावांमधील रुग्णसंख्या कमी होत नसल्याने तत्कालीन प्रांताधिकारी डॉ.शशीकांत मंगरुळे यांचा संशय बळावला. त्यांनी 26 एप्रिल 2021 रोजी पंचायत समितीचे तत्कालीन गटविकास अधिकारी सुरेश शिंदे यांच्यासह तपासणी मोहीम राबवली असता हाच शैलेश किसनराव कडलग नावाचा कंपाऊंडर असलेला ‘मुन्नाभाई’ चक्क कोविड रुग्णांवर उपचार करताना रंगेहाथ आढळून आला होता. त्यावेळी खुद्द प्रांताधिकारी आणि गटविकास अधिकारी या दोघांनी आदेश दिल्यानंतरही तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.सुरेश घोलप यांनी या मुन्नाभाईवर गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली होती, त्यांनी कारवाईचा इशारा दिल्यानंतर तब्बल दुसर्या दिवशी या महाशयांनी पंचनाम्यासह अन्य सोपस्काराचे नाटक करुन त्याच्या खाल्ल्या मिठाची किंमत अदा केली.

पात्रता नसतानाही ‘डॉक्टर’ म्हणून मिळालेल्या सन्मानातून वैद्यकीय पेशाचे भूत अंगात संचारलेल्या या मुन्नाभाईला मात्र या ‘धंद्या’ शिवाय अन्य व्यवसायात ‘रस’ वाटत नसल्याने त्याने तालुका आरोग्य अधिकार्यांच्या आशीर्वादाने चक्क परिसरातील डॉ.प्रवीण गंगाधर कवडे या बी.ए.एम.एस पदवीधारकाच्या नावाचा आणि त्याच्या पदवीचा वापर करुन बाह्यरुग्ण विभागासह आंतररुग्ण विभाग (रुग्णालय) थाटले होते व तेथे डॉ.कवडे याच्या उपस्थितीशिवाय रुग्णांवर उपचार करीत होता. डॉ.घोलप या विभागाच्या प्रमुखपदी असेपर्यंत त्याचा हा धंदा बिनबोभाटपणे सुरु होता. या सगळ्या प्रकारातून ‘बेडूक’ झालेल्या तालुका आरोग्य अधिकार्यांना आपण ‘बैला’ एवढे मोठे झाल्याचा आभास झाल्याने ते थेट संगमनेरच्या लोकप्रतिनिधींनाच भिडले आणि त्यांच्या भ्रमाचा फूगा फूटला.

त्यांच्या जागी आलेल्या डॉ.शैलेश टावरे यांनी गेली अनेक वर्ष संगमनेरच्या आरोग्य विभागाच्या कामकाजात आलेली मरगळ झटकण्यास सुरुवात केली असून व्यवस्थेच्या जीवावर पोसलेल्या शैलेश कडलगसारख्या मुन्नाभाईंना शोधण्याचे आणि त्यांना थेट न्यायासनासमोर उभे करण्यास सुरुवात केली आहे. रविवारी त्यांचा पहिला दणका निमगाव भोजापूरमधील या जोडीला बसताच गुन्हा टाळण्यासाठी राजकीय, सामाजिक आणि आर्थिक तिनही प्रकारे दबावतंत्र सुरु झाले, मात्र तालुका आरोग्य अधिकार्यांनी त्याला भीक न घालता गुन्हा दाखल केला. त्यानंतर हा सेम दबाव पोलिसांकडे वळाला, त्यातूनच अटक टाळण्याचे प्रयत्न सुरु झाले. मात्र आरोपीकडून वारंवार एकच गुन्हा घडत असल्याने त्याच्या कृत्यातून एखाद्याचा जीव जाण्याची शक्यता गृहीत धरुन दैनिक नायकने आपली सामाजिक बांधिलकी जोपसताना या प्रकरणात पोलिसांना कारवाई करण्यास भाग पाडले आणि अखेर सोमवारी रात्री निमगाव भोजापूरचा मुन्नाभाई शैलेश किसनराव कडलग व त्याला आपले नाव आणि पदवी देवून हा बेकायदा व्यवसाय करण्यास सहाय्य करणार्या डॉ.प्रवीण गंगाधर कवडे या दोघांना अटक केली असून आज त्यांना न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.

संगमनेरच्या वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडवणार्या या अनोख्या गुन्ह्यात ‘निसर्गोपचारा’चे शिक्षण घेवून ‘डॉक्टर’ म्हणून मिरवणारा आरोपी शैलेश कडलगने दुसर्या गुन्ह्यातून वाचण्यासाठी चक्क ‘बी.ए.एम.एस’ पदवीधारक असलेल्या डॉ.प्रवीण कवडे यालाही आपल्यासोबत या गोरखधंद्यात जोडून घेतले. तत्कालीन तालुका वैद्यकीय अधिकार्यांच्या आशीर्वादाने हा वैद्यकीय कत्तलखाना बिनबोभाटपणे सुरु होता, मात्र ‘त्या‘ भ्रष्टाचारी अधिकार्याचे निलंबन होताच तालुक्यातील एक-एक मुन्नाभाई उघडे पडण्यास सुरुवात झाली असून निमगाव भोजापूरच्या माध्यमातून या साफसफाईला सुरुवात झाल्याचे आता दिसू लागले आहे. अशा प्रकरणात तत्कालीन तालुका आरोग्य अधिकार्यांनाही सहआरोपी करावे व त्यांच्या संपूर्ण मालमत्तेची चौकशी करावी अशी मागणीही आता होवू लागली आहे.

