शेवगावमध्ये महागाई विरोधात भाकपची निदर्शने इंधनासह जीवनावश्यक वस्तूंची महागाई कमी करण्याची मागणी
नायक वृत्तसेवा, शेवगाव
भारतीय कम्युनिस्ट पक्ष व डाव्या पक्षांनी देशभर पुकारलेल्या आंदोलनाला शेवगाव येथे चांगला प्रतिसाद लाभला. भारतीय कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेच्यावतीने पेट्रोल, डिझेल गॅससह जीवनावश्यक वस्तूंची महागाई कमी करण्यात यावी. यासह विविध मागण्यांसाठी केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यात आली.
भारतीय कम्युनिस्ट पक्षासह डाव्या पक्षांनी केंद्र सरकारच्या जनविरोधी धोरणाविरोधात सर्वसामान्य जनतेला भेडसावणार्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी देशव्यापी आंदोलन पुकारले आहे. त्यासंदर्भात शेवगाव येथील बसस्थानकासमोरील क्रांती चौकात राज्य सहसचिव अॅड. सुभाष लांडे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी (ता.31) निदर्शने करण्यात आली.
यावेळी लांडे म्हणाले, की केंद्र सरकारच्या जनविरोधी धोरणामुळे देशातील वाढती बेरोजगारी व महागाईमुळे गोरगरीब जनता त्रस्त आहे. जनतेमध्ये फूट पाडण्यासाठी भावनिक प्रश्न निर्माण केले जात आहेत. या प्रश्नावर जनआंदोलन होऊ नये, यासाठी तरुणांची माथी भडकविण्याचे काम सुरू आहे. जनतेने अशा फूट पाडणार्या शक्तींपासून सावध राहून आपल्या मुख्य प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जनचळवळी उभ्या कराव्यात. संजय नांगरे, किसान सभेचे तालुकाध्यक्ष बबन पवार, जिल्हा उपाध्यक्ष बापूराव राशीनकर, बाजार समितीचे अशोक नजन, दत्तात्रय आरे, आत्माराम देवढे, कारभारी वीर, वैभव शिंदे, गहिनीनाथ आव्हाड, मुरलीधर काळे, शिवाजी वीर, राजेंद्र घनवट आदिंनी सहभाग घेतला.