बदली विरोधात संगमनेरचे ‘डीवायएसपी’ जाणार ‘मॅट’मध्ये? जिल्हा पोलीस दलातील मोठे फेरबदल दीर्घकाळ चर्चेत राहण्याचेही संकेत..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
जिल्हा पोलीस दलातील अधिकार्‍यांच्या ‘विभागीय’ बदल्या सध्या भलत्याच चर्चेत आहेत. जिल्ह्यातील काही पोलीस निरीक्षकांनी गेल्या वर्षभरापासून ‘ऐच्छिक’साठी मोठी ‘लॉबिंग’ केली होती. मात्र विशेष पोलीस महानिरीक्षकांनी ती मोडीत काढल्याने काहींचा अपेक्षा भंगही झाला आहे, तर काहींनी ‘वजन’ वापरुन जिल्ह्यातील कार्यकाळ वाढवून मिळण्यासाठी केलेल्या प्रयत्नांवरही पाणी फिरले आहे. मात्र या साफसफाईत कार्यकाळ आटोपण्यापूर्वीच ठोस कारण नसताना काही अधिकार्‍यांना नाहक बदलीला सामोरे जावे लागले असल्याचे बोलले जात आहे. त्यामागे राजकीय हस्तक्षेप असल्याचीही चर्चा असली तरीही यातून दुखावलेले अधिकारी आता थेट प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे (मॅट) जाण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे तब्बल आठ महिन्यांच्या विलंबाने बदल्यांची प्रक्रिया सुरू होवूनही जिल्ह्यातील बदल्या पुढील काहीकाळ चर्चेत राहणार आहेत.

राज्यातील प्रशासकीय बदल्यांमध्ये महसूल व पोलीस विभागातील बदल्या विशेष लक्ष्यवेधी ठरत असतात. अशा बदल्यांमध्ये सत्ताधारी गटाचा राजकीय हस्तक्षेपही असतोच हे अढळ सत्य कोणीही नाकारु शकत नाही. त्यामुळे यापूर्वी अनेकदा अन्यायकारक पद्धतीने आपली बदली झाली आहे असे समजून अनेक अधिकारी त्या विरोधात प्रशासकीय न्यायाधिकणाचे दरवाजे ठोठावित असतात व त्यातून यंत्रणेविरुद्ध आदेश आणून वरचढही ठरत असतात. संगमनेरात तब्बल 20 वर्षांपूर्वी पोलीस दलात असाच प्रकार घडला होता. मात्र तत्कालीन पोलीस निरीक्षक गोविंद पवार यांनी मॅटमधून निकाल आणीत येथेच शड्डू ठोकून आपला कार्यकाळ पूर्णही केला होता. त्यानंतरच्या काळात आजवर असा प्रकार पुन्हा समोर आला नसला तरी आज मात्र तशी शक्यता निर्माण झाली आहे.

नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.प्रताप दिघावकर यांनी विभागीय बदल्या करताना नाशिक विभागातून चौघा पोलीस निरीक्षकांना जिल्ह्यात पाठवले आहे. जिल्ह्यात एकूण 37 पोलीस निरीक्षक कार्यरत असून अतिरीक्त ठरलेल्या या चौघांमुळे जिल्ह्यातील पोलीस निरीक्षकांची संख्या आता 41 झाली आहे. जिल्ह्याबाहेरुन आलेल्या अधिकार्‍यांना स्वतंत्र पदभार देण्याचा बहुतेक यापूर्वीचा प्रघात असल्याने पोलीस ठाणी आणि तेथील प्रभारी अधिकार्‍यांचे नियोजन करताना जिल्हा पोलीस अधीक्षकांना मोठी कसरत करावी लागणार आहे. त्यातच सदरचे चारही निरीक्षक ‘विशेष पोलीस महानिरीक्षकां’कडून जिल्ह्यात दाखल झाल्याने त्यांची वर्णी नेमकी कुठे व कशी लागते हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.

एकीकडे जिल्ह्यातील बहुतेक ठिकाणच्या पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्यांची प्रक्रिया जवळपास पूर्ण झालेली असली तरी संगमनेर तालुक्यातील शहर, ग्रामीण, घारगाव व आश्वी येथील बदल्या अद्यापही खोळंबलेल्या आहेत. तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुनील पाटील यांच्या मुख्यालयात तडकाफडकी बदलीचे नाट्य घडल्यानंतरही ते संगमनेरात असल्याने अनेकांनी आश्चर्यही व्यक्त केले आहे. त्यामागील नेमक्या कारणांची स्पष्टता नसली तरी मुख्यालयाऐवजी त्यांना संगमनेर शहर अथवा घारगाव पोलीस ठाणे मिळण्याची आस लागली असून, मुख्यालयात हजर होण्याचे आदेश प्राप्त झाले तरी त्यांनी प्रयत्न सोडलेले नाहीत हे विशेष.

शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अभय परमार यांचाही संगमनेरातील कार्यकाळ आटोपला असून ते येथेच सहा महिने मुदतवाढ मिळण्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या (एल.सी.बी.) निरीक्षकपदी जाण्यासाठी सर्वाधिक इच्छुक आहेत. त्यासाठी गेल्या वर्षभरापासून त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठाही केली आहे. मध्यंतरी त्यांचे नाव मागे पडल्याचे दिसत असताना स्पर्धेतील अनेकजणांची बदली झाल्याने व एलसीबीचे निरीक्षकपद अद्यापही ‘रिक्त’ असल्याने त्यांच्या आशा आजही जिवंत आहेत. ‘गृह’ लाभलेली राष्ट्रवादी आणि जिल्ह्याचे स्थानिक कारभारी नामदार बाळासाहेब थोरात यांच्या होकाराशिवाय ते अशक्य असल्याने त्यांनी त्यादृष्टीनेही प्रयत्न सुरू केल्याची पोलीस वर्तुळात चर्चा आहे.

दुसरीकडे संगमनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित यांची जिल्हा मुख्यालयात अनपेक्षितपणे बदली करण्यात आली आहे. संगमनेरातील त्यांचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच त्यांची बदली झाल्याने आणि ती देखील मुख्यालयात करण्यात आल्याने त्यांच्याकडून या निर्णयाला विरोध होणे स्वाभाविक आहे. त्यामुळे रोशन पंडित नियमबाह्य पद्धतीने आपली बदली करण्यात आल्याचा मुद्दा घेवून प्रशासकीय न्यायाधिकारणाकडे गेल्यास त्याचे आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. त्यांच्या जागी बदली झालेले श्रीरामपूरचे उपविभागीय अधिकारी राहुल मदने शुक्रवारी रात्रीच संगमनेरात हजर झाले असून त्यांनी पदभार स्वीकारल्याचेही समजते. मात्र पंडित यांनी मॅटमध्ये जाण्याची भूमिका घेतल्यास त्यांचे पुढे काय? असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. त्यामुळे मोठ्या प्रतीक्षेनंतर सुरू झालेली बदल्यांची प्रक्रिया अशा विविध कारणांनी आणि राजकीय हस्तक्षेपातून दीर्घकाळ चालण्याचीही शक्यता निर्माण झाली आहे.


संगमनेरकरांना मोठ्या कालावधीनंतर धडाकेबाज उपविभागाीय पोलीस अधिकारी लाभले होते. पंधरा महिन्यांच्या आपल्या कार्यकाळात त्यांनी संगमनेरातील अनेक बेकायदा उद्योगांवर धाडी घालीत येथील गुन्हेगारी प्रवृत्तीवर धाक निर्माण केला होता. त्यामुळे त्यांच्या खात्यातच त्यांचे हितशत्रू निर्माण झाले होते. कर्तव्याप्रती स्वच्छ मानसिकता असलेला अधिकारी म्हणून त्यांनी अगदी सुरुवातीपासूनच आपली ओळख निर्माण केल्याने त्याचा फटका येथील पोलीस अधिकार्‍यांसह राजकीय हस्तकांनाही बसला. त्यामुळेच त्यांची मुदतीपूर्वीच थेट मुख्यालयात बदली झाल्याचे बोलले जाते. नियमानुसार एखाद्या अधिकार्‍याची मुदतीपूर्व बदली करण्यासाठी काहीतरी ठोस कारण असावे लागते. मात्र त्यांची बदली करताना त्याकडे दुर्लक्ष झाल्याने त्या विरोधात ते प्रशासकीय न्यायाधिकरणात जाणार असल्याचे समजते. याबाबत त्यांच्याकडून दुजोरा मिळवण्याचा प्रयत्न झाला, मात्र ते उपलब्ध होवू शकले नाहीत.

Visits: 12 Today: 1 Total: 115296

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *