संगमनेर तालुक्यातील पठारभागात विवाहितेच्या मृत्यूचे गूढ! प्रेमसंबंधातून प्रकार घडल्याचा संशय; संशयीत वनरक्षक पोलिसांच्या ताब्यात..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर तालुक्यातील पठारभाग पुन्हा एकदा खुनाच्या घटनेने हादरला आहे. जनावरे चारण्यासाठी घराबाहेर पडलेल्या 42 वर्षीय विवाहितेचा दुसर्या दिवशी रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह आढळल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. मनीषा रामनाथ चाचण (रा.खंडेरायवाडी) असे मृत महिलेचे नाव असून, तिचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. मात्र, पोलिसांनी केलेल्या तांत्रिक तपासात तिच्या संपर्कात असलेल्या पिंपळगाव देपा येथील 45 वर्षीय व्यक्तीला संशयावरुन ताब्यात घेण्यात आले आहे. विशेष म्हणजे, संशयित इसम वनरक्षक म्हणून कार्यरत असल्याची माहिती आहे. मयत महिलेसाबत त्याचे कथित प्रेमसंबंध असल्याचीही चर्चा असून, त्यातूनच हा जीवघेणा प्रकार घडला असावा असा संशय आहे, पोलिसांकडूनही त्याच दिशेने तपास सुरु आहे. मात्र मयत महिलेच्या मृत्यूमागे संशयीताचा हात असल्याबाबत पोलिसांच्या हाती काहीही ठोस लागलेले नाही.

याबाबत घारगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार खंडेरायवाडी येथील मनीषा चाचण (वय 42) ही विवाहिता बुधवारी (ता.18) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास नेहमीप्रमाणे गायी चारण्यासाठी गावालगत वनविभागाच्या हद्दीतील डोंगररानात गेली होती. मात्र, सायंकाळ उलटूनही ती घरी परतली नाही. सुरुवातीला तिच्या पतीने नेहमीच्या परिसरात शोध घेतला. मात्र, बराच वेळ होऊनही तिचा ठावठिकाणा लागत नसल्याने पतीसह ग्रामस्थांची चिंता वाढली. गावातील नागरिकांनी आसपासच्या डोंगरदर्या, जंगल परिसर आणि जनावरे चारण्याच्या ठिकाणी जावूनही शोध घेतला, परंतु मनीषाचा कुठेही मागमूस लागला नाही. अखेर याबाबत घारगाव पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर सायंकाळी पोलिसांनी बेपत्ता महिलेचा शोध घेण्यास सुरुवात केली.

पोलिसांनी तपासाची दिशा ठरविताना मनीषाच्या मोबाईलचा मागोवा घेतला असता तांत्रिक विश्लेषणातून दुपारी साडेतीनच्या सुमारास तिचा मोबाईल बंद झाला. त्यावेळी मोबाईलचे शेवटचे लोकेशन कन्हेर पोखरी शिवारातील डोंगररानात असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिसांचा संशय या परिसरावर केंद्रित झाला. ग्रामस्थांच्या मदतीने पोलिसांनी संपूर्ण परिसर पिंजून काढला. डोंगरदर्या, निर्जन ठिकाणं आणि जंगलाच्या परिसरात शोधमोहीम राबविण्यात आली. मात्र, रात्री उशिरापर्यंत मनीषाचा शोध लागला नाही. मोबाईल बंद होण्याची वेळ आणि त्याचे शेवटचे लोकेशन यामुळे या प्रकरणातील ‘गूढ’ अधिकच वाढले.

आज (ता.19) सकाळी कन्हेर पोखरी शिवारातील डोंगराच्या दरीत एका महिलेचा मृतदेह असल्याची माहिती मिळताच घारगाव पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाची पाहणी केल्यानंतर बेपत्ता मनीषा चाचण हिची ओळख पटली. विशेष म्हणजे, मृतदेहाच्या बाजूलाच तिचा मोबाईलही बंद अवस्थेत आढळून आला. बुधवारी दुपारी घरातून बाहेर पडलेली विवाहिता अचानक बेपत्ता होते आणि गुरुवारी सकाळी तिचा मृतदेह त्याच परिसरातील दरीत आढळतो, हा घटनाक्रम अनेक प्रश्न उपस्थित करणारा आहे. तिचा मृत्यू दरीत पडल्याने झाला की तिचा आधीच काही घातपात करुन तिला दरीत ढकलण्यात आले याचा पोलीस तपासातूनच उलगडा होणार आहे.

या प्रकरणात पोलिसांनी मयतेच्या मोबाईलमधील संपर्क आणि उपलब्ध तांत्रिक माहितीच्या आधारे तपासाची चक्रे फिरविली. घरातून निघाल्यानंतर मनीषाने कोणाशी संपर्क साधला, तिच्याशी कोणाचे संभाषण झाले आणि तिच्या शेवटच्या लोकेशनशी कोणाचा संबंध आला, याची पडताळणी करण्यात आली. त्यातून पिंपळगाव देपा येथील एका 45 वर्षीय व्यक्तीचे नाव समोर आले. त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली आहे. संशयीत व्यक्ती वनविभागात वनरक्षक म्हणून कार्यरत असल्याची माहिती आहे. मयत महिला आणि त्याच्यात कथित प्रेमसंबंध असल्याचीही परिसरात चर्चा असून, या संबंधातूनच वाद निर्माण झाला असावा व सदरील प्रकार घडला असावा असा संशय आहे.

मात्र, एखाद्या संशयिताला ताब्यात घेतले म्हणजे त्यानेच गुन्हा केला असा त्याचा अर्थ होत नाही. पोलिसांनी त्याच्याकडे केलेल्या प्राथमिक चौकशीसह घटनास्थळावरुन प्राप्त पुराव्यांचा आधार घेतला असता अद्याप संशयीताचा या प्रकरणाशी थेट संबंध आल्याचे स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे त्याच्या चौकशीतून नेमके काय निष्पन्न होते, याकडे लक्ष लागले आहे. मोबाईलमधील संभाषण, संपर्कांचे तपशील, घटनास्थळावरील परिस्थिती आणि इतर उपलब्ध पुरावे या सर्व बाबींची सांगड घातल्यानंतरच या प्रकरणातील वास्तव समोर येणार आहे.

मनीषा चाचण ही विवाहिता बेपत्ता झाल्यानंतर बुधवारीच घारगाव पोलीस ठाण्यात अपहरण झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, गुरुवारी तिचा मृतदेह आढळल्याने तपासाचे स्वरुप बदलले आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी साकूर ग्रामीण रुग्णालयात पाठविला आहे. शवविच्छेदन अहवालातून मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्यास मदत होणार आहे. शरीरावरील जखमा, मृत्यूची वेळ आणि अन्य वैद्यकीय निष्कर्ष या प्रकरणात निर्णायक ठरु शकतात. त्यानुसार दाखल गुन्ह्याचे स्वरुपही बदलण्याची दाट शक्यता आहे.

एका विवाहितेचा संशयास्पद मृत्यू आणि त्यानंतर समोर आलेला कथित प्रेमसंबंधांचा धागा यामुळे या कन्हेर पोखरीतील या घटनेला वेगळे वळण मिळाले आहे. जनावरे चारण्यासाठी घराबाहेर पडलेली मनीषा चाचण ही 42 वर्षीय महिला पुन्हा घरी परतलीच नाही. मोबाईलचे शेवटचे लोकेशन कन्हेर पोखरीच्या डोंगररानात मिळाले आणि दुसर्याच दिवशी त्याच परिसरातील दरीत तिचा रक्तबंबाळ मृतदेह आढळला. पोलिसांनी तांत्रिक तपासातून संशयित वनरक्षकाला ताब्यात घेतले असले, तरी या मृत्यूमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्रेमसंबंधातून घातपात झाला की मृत्यूमागे अन्य काही कारण आहे, यामागील स्पष्टता शवविच्छेदन अहवाल आणि पोलिसांच्या तपासातूनच येणार आहे.

