वीरगावमधील समृद्धीच्या ‘माझी आई’ निबंधाची मान्यवरांकडून दखल माजी आरोग्य मंत्री राजेश टोपेंसह लेखिका कुंभोजकरांनी केले कौतुक

नायक वृत्तसेवा, अकोले
तालुक्यातील वीरगाव जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनी समृद्धी आदमाने हिने ‘माझी आई’ विषयावर निबंध लिहिला होता. स्वतःच्या आईबद्दल लिहिताना तिने अक्षरशः हृदयस्थ भावना शब्दबद्ध केलेल्या होता. हा निबंध उपक्रमशील शिक्षक भाऊ चासकर यांनी समाज माध्यमांवर टाकला होता. तो माजी आरोग्य मंत्री तथा आमदार राजेश टोपे यांच्यासह लेखिका श्रद्धा कुंभोजकर यांना भावला. त्यांनी समृद्धीला लागोलाग पत्र पाठवून कौतुक करत भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तर अनेकांनी तिच्या बुद्धीमत्तेचे कौतुक करुन बक्षिसांचा वर्षाव केला आहे.

वीरगाव येथील मामा तुषार वाघ यांच्याकडे समृद्धी शिकायला आलेली आहे. ती गावातील मॉडेल स्कूल म्हणून लौकिक असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत सातवीच्या वर्गात सध्या शिकत आहे. तिला शिक्षकांनी माझी आई हा निबंध लिहायला सांगितला. तिने स्वहस्ताक्षरात हृदयस्थ भावनांची गुंफण करुन शब्दबद्ध केला. यामध्ये आईचे आजारपण, अपेक्षा, कष्ट व परिस्थिती असा सर्व बाजूंवर प्रकाश टाकलेला आहे. अगदी एखादा महाविद्यालयीन विद्यार्थी मांडणी करेल अशी मांडणी तिने निबंधात केलेली आहे.

हा निबंध शिक्षक भाऊ चासकर यांनी समाज माध्यमांवर टाकला. तो इतक्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला की माजी आरोग्य मंत्री तथा आमदार राजेश टोपे यांच्यासह पुणे विद्यापीठाच्या इतिहास विभागाच्या प्रमुख तथा लेखिका श्रद्धा कुंभोजकर यांना भावूक करुन गेला. माजी मंत्री टोपे यांनी समृद्धीला पत्र लिहून कौतुक करत भेटण्याची इच्छा व्यक्त केलीी आहे तर लेखिका कुंभोजकर यांनी पत्र पाठवून दोन पुस्तकेही भेट दिली आहे. याचबरोबर गावातीलच उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी संजय वाकचौरे शाळेत आले होते. त्यांनी समृद्धीचा निबंध वाचून एक हजार रुपये रोख बक्षीस देऊन कौतुक केले. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भीमाशंकर मालुंजकर, ज्ञानेश्वर खुळे, अंकुश थोरात आदी उपस्थित होते. समृद्धीने तिच्याबरोबर शाळेचे नाव झळकाविल्याबद्दल मुख्याध्यापक शैला भोईर, शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले आहे.
