‘चोर-चोर मावसभाऊ, सारे मिळून वाटून खाऊ’! स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टींची भाजपासह महाआघाडीवर जोरदार टीका

नायक वृत्तसेवा, अकोले
भाजप व महाआघाडी म्हणजे ‘चोर-चोर मावसभाऊ, सारे मिळून वाटून खाऊ.’ देशातील मंत्र्यांचे राज्य सरकार, तर केंद्रातील सरकार राज्यातील उपमुख्यमंत्र्यांचे पितळ उघडे पाडत आहे. त्यामुळे शेतकर्‍याला वार्‍यावर सोडून त्यांचे हे उद्योग सुरू आहेत, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली.

अकोले तालुक्यातील गणोरे येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आयोजित केलेल्या जागर एफआरपीचा व आरधाना शक्तीपीठाची यात्रा बुधवारी (ता.13) गणोरे येथे आली होती. या शेतकरी मेळाव्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले, निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकरी एका बाजूने अस्मानी, तर केंद्र व राज्य सरकारच्या धोरणामुळे सुलतानी संकटात सापडला आहे. कोल्हापूर, सांगली भागात उसाला तीन हजार दोनशे रुपये भाव मिळत असताना तुमच्याकडे 1700 ते 2100 रुपये, असा दर दिला जात आहे. याला तुम्हीच जबाबदार आहात. केंद्र सरकारने पूर्वीचा ‘एफआरपी’चे पैसे एकर कमी देण्याचा निर्णय बदलून आता त्याचे तीन तुकडे पाडून कारखानदारांना एकप्रकारे पळवाट दिली आहे. आघाडी सरकार शेवटचा तुकडा एक वर्षानी मिळावा, यासाठी साथ देत आहे. शेतकर्‍यांना लढाई लढावी लागणार आहे. यावेळी हवामानतज्ज्ञ पंजाबराव डख, दीपक कर्पे, सुरेश नवले आदिंनी मनोगत व्यक्त केले.

प्रारंभी शेतकरी संघटनेचे युवा अध्यक्ष शुभम आंबरे यांनी स्वागत केले. अध्यक्षस्थानी दत्तात्रय आंबरे होते, पंचायत समिती सदस्य नामदेव आंबरे, सरपंच संतोष आंबरे, किशोर आहेर, दीपक कर्पे, शेतकरी संघटनेचे उत्तर जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे, देवठाणचे सरपंच केशव बोडके, डोंगरगावचे सरपंच बाबासाहेब उगले, सुरेश नवले, चंद्रकांत नेहे, प्रकाश मालुंजकर, सुनील पुंडे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सुशांत आरोटे यांनी केले. सूत्रसंचालन अमोल उगले यांनी केले. तर शुभम आंबरे यांनी आभार मानले.

Visits: 18 Today: 1 Total: 116355

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *