संगमनेरातील ‘एटीएम’ फोडीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता! माळीवाडा व लालतारा वसाहतीतल्या दोघांसह गुंजाळवाडीतील एकजण ताब्यात..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
मागील काही वर्षांपासून जिल्ह्यातील विविध ठिकाणी एटीएम फोडीच्या अनेक घटना समोर येवून त्यातून कोट्यावधी रुपयांची लुट झाली. संगमनेरातही गेल्या चार-पाच वर्षात एकामागून एक दिड डझनाहून अधिक घटनांमध्ये विविध बँकांचे एटीएम फोडण्याच्या घटना समोर आल्या होत्या. मात्र अशा प्रकारचे गुन्हे करणार्या टोळ्या परप्रांतीय असल्याचे काही प्रकारातून समोर आल्याने पोलिसांच्या तपासाला दिशा मिळत नव्हती. मात्र स्थानिक पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण टीमने स्थापना होताच सक्रीय होत एटीएम चोरीच्या प्रकरणांचा छडा लावण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले असून या प्रकरणात शहरातील दोघांसह गुंजाळवाडीतून एकाला ताब्यात घेतले आहे. प्राथमिक माहितीनुसार त्यांनी आपल्या अन्य साथीदारांसह शहरातील तीन ठिकाणचे एटीएम फोडल्याचा संशय असून पोलीस त्यादृष्टीने सखोल तपास करीत आहेत.
गेल्या काही वर्षात सुरक्षा रक्षकाविना असलेले बँकांचे एटीएम सेंटर्स लक्ष्य करीत गुन्हेगारांच्या टोळ्यांनी कोट्यावधी रुपयांची लुट केली. संगमनेरात चार वर्षांपूर्वी आलेले हे लोण आता सर्वत्र पसरले आहे. सुरुवातीला चोरट्यांनी एटीएम फोडण्यासाठी गॅसकटरचा वापर करुन नाशिक रोडवरील ह्यिाद्री महाविद्यालय, मालदाड रोड, घुलेवाडी परिसर व अध्यापक महाविद्यालयाजवळील एटीएम फोडून आजवर कोट्यावधी रुपये लंपास केले होते. त्यासर्व प्रकरणांच्या तपासात अशा प्रकारचे कृत्य करणार्या टोळ्या हरयाणा-राजस्थान सीमावर्ती भागातील असल्याचे समोर आल्याने त्यानंतरच्या घटनाही अशाच टोळ्यांकडून झाल्याचे समजून त्यांचा तपास एकप्रकारे ठप्प झाला होता.
त्यातच यापूर्वी शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी म्हणून रुजू असलेल्या अधिकार्यांच्या निष्क्रीयतेमुळे त्यांच्या येथील कारकीर्दीत पुन्हा एकदा नाशिकरोड, दिल्ली नाका, घुलेवाडी व समनापूर या भागात एटीएम फोडीच्या घटना घडू लागल्या. मात्र निष्क्रीय अधिकार्यामुळे पोलिसांची क्रयशक्तीच क्षीण झाल्याने त्यांच्या कारकीर्दीत एटीएम फोडी दूरच शहराच्या कायदा व सुव्यस्थेचेही बारा वाजले होते. मात्र आता त्यांची येथून बदली झाली असून त्यांच्या जागी प्रभारी पदभार घेणार्या पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले यांनी स्थानिक पोलिसांची गुन्हे प्रकटीकरण शाखा (डीबी) पुन्हा सुरु करुन मोठ्या आणि प्रलंबित गुन्ह्यांची उकल करण्यास सुरुवात केली आहे.
त्यांच्या या प्रयत्नांना क्षमता असूनही केवळ निष्क्रीय अधिकार्यामुळे अकार्यक्षम होवू पाहणार्या शहर पोलीस ठाण्यातील कर्मचार्यांनीही साथ दिली असून डीबी शाखा कार्यान्वीत होताच संगमनेरातील एटीएम फोडीच्या साखळी घटनांवर लक्ष्य केंद्रीत करण्यात आले आहे. त्यातूनच शहरातील अनिकेत गजानन मंडलीक (वय 19, रा.माळीवाडा) व सर्फराज राजू शेख (वय 20, रा.लालतारा वसाहत) या दोघांसह गुंजाळवाडी शिवारातील लक्ष्मीनगरमध्ये राहणार्या पोपट गणेश खरात (वय 22) या तिघांना ताब्यात घेण्यात आले असून शहरातील तीन वेगवेगळ्या ठिकाणच्या एटीएम फोडीच्या प्रकरणांमध्ये त्यांचा समावेश असल्याचा पोलिसांना संशय आहे. यासोबतच एटीएम फोडण्याचे प्रकार दोघा-तिघांचा नसल्याने या प्रकारात आणखी काही जणांचा सहभाग असण्याची दाट शक्यता असून त्यासाठी ताब्यात घेण्यात आलेल्यांकडे चौकशीसह संशय असलेल्या घटनांचे सीसीटीव्ही फूटेज वारंवार तपासून आरोपींची ओळख स्पष्ट करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. यातून लवकरच संगमनेरातील एटीएम फोडीचे रॅकेट समोर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.