ऐन दिवाळीच्या दिवशी चोरट्याचा पार्श्वनाथ मंदिरात डल्ला! भरदिवसा अर्धाकिलो चांदीच्या वस्तू लांबवल्या; संगमनेरच्या गजबजलेल्या लोकवस्तीतला प्रकार..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
सर्वसामान्य माणसाच्या घरात अथवा दुकानांमध्ये होणार्या चोरीच्या घटना नियमित असतानाच आता या प्रकारांचे लोण हजारोंच्या श्रद्धास्थानांकडेही वळू लागल्याचे चित्र संगमनेरातून समोर आले आहे. ऐन दिवाळीच्या दिवशी घडलेल्या या घटनेत दर्शनाच्या बहाण्याने भरदिवसा मंदिरात प्रवेश करुन एकाने शहरातील अतिशय दाट लोकवस्तीत असलेल्या जैनसमाजाच्या पार्श्वनाथ मंदिरातून तब्बल 250 ग्रॅम वजनाच्या चांदीच्या कळसासह 200 ग्रॅम वजनाचे धार्मिक प्रतिक असलेली चांदीची वस्तू लांबवली. हा संपूर्ण प्रकार मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेर्यांमध्येही कैद झाला. धक्कादायक म्हणजे या चोरट्याचा मंदिरात वावर असताना काही भाविकही तेथे उपस्थित असल्याचे दिसते. त्या उपरांतही त्याने चलाखीने मंदिरातील स्वाध्यायकक्षात प्रवेश करुन दोन्ही वस्तू लांबवल्या. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध घेतला खरा, मात्र त्याने अद्यापही कळस चोरल्याची कबुली दिली नसल्याची माहिती आहे. या घटनेने संगमनेरात खळबळ उडाली असून चोरट्यांपासून आता श्रद्धास्थानेही सुरक्षित नसल्याचे चित्र दिसू लागले आहे.

गेल्या रविवारी (ता.8) उघड झालेल्या या प्रकारणाची फिर्याद मंगळवारी दाखल झाली. बाजारपेठेतील अतिशय दाट लोकवस्तीत असलेल्या जैन समाजाच्या पार्श्वनाथ मंदिरात सदरचा प्रकार घडला. या परिसरात जैन धर्माचे 23 वे तीर्थकर भगवान पार्श्वनाथांना समर्पित मंदिर आहे. सत्य, अहिंसा, अस्तेय आणि अपरिग्रह या तत्त्वांचा प्रसार करणारे तीर्थकर म्हणून त्यांना पूजले जाते. दरवर्षी पर्युषण पर्व, महावीर जयंती, भगवान पार्श्वनाथांचा जन्मोत्सव आणि निर्वाण कल्याणक दिनी या मंदिरात विशेष अभिषेक, पूजा व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन होते. संगमनेरात मोठ्या प्रमाणात विस्तारलेल्या आणि शहराच्या जडणघडणीपासून विकासातही महत्वाचे योगदान देणार्या जैन समाजातील अबालवृद्ध या कार्यक्रमांमध्ये सहभागी होतात. अतिशय जुन्या असलेल्या या मंदिराच्या नावावरुनच बाजारपेठेतील या मोठ्या भागाला ‘पार्श्वनाथ गल्ली’ म्हणून ओळखले जाते. त्याच मंदिरात चोरीची ही घटना घडली आहे.

रविवारी सकाळी दहाच्या सुमारास मंदिराचे पूजारी सुरसिंह मकवाना यांनी दिवाळीसाठी चांदीच्या वस्तू धुवून त्या स्वाध्याय कक्षात वाळण्यासाठी ठेवल्या होत्या. या दरम्यान मंदिरात शहरातील भाविकांचा नियमित वावर होता. सकाळी साडेअकराच्या सुमारास संशयीताने मंदिरात प्रवेश केला. त्यावेळी मंदिरात इतरही माणसं असल्याने त्याने अतिशय चालाखीने दर्शनाचा बहाणा करुन चोरण्यासाठीचा ऐवज हुडकून काढला. मंदिरातील विविध तीर्थकरांच्या प्रतिमांसमोर हात जोडण्याचा बहाणा करुन त्याने मंदिरातील एकूण उपस्थितीचा आढावा घेतला आणि काही क्षणातच तेथून थेट स्वाध्याय कक्षात घुसून वाळत घातलेल्या चांदीच्या वस्तूंमधील 250 ग्रॅम वजनाचा कळस आणि 200 ग्रॅम वजनाची चांदीच्या बैलाची धार्मिक प्रतिकृती आपल्या शर्टमध्ये कोंबून तेथून पोबारा केल्याचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेर्याने टीपला.

मंदिरातच असलेल्या या स्वाध्यायकक्षाकडे दिवसभर कोणीही फिरकलं नाही. मात्र सायंकाळी साडेसहाच्या सुमारास पूजारी पुन्हा त्या वस्तू गोळा करण्यासाठी तेथे गेले असता त्यात वरील दोन्ही वस्तू कमी असल्याचे आढळले. याबाबत त्यांनी मंदिराच्या विश्वस्तांना कळवल्यानंतर विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष सचिन शहा, सदस्य वैभव शहा, सिद्धार्थ ओहरा, सागर ओहरा, विनीत मेहता, संजय भाईशा यांनी मंदिरात धाव घेत सीसीटीव्ही चित्रण पडताळले असता त्यात सकाळी साडेअकराच्या सुमारास ‘त्या’ अनोळखी व्यक्तिने दर्शनाच्या बहाण्याने चोरी केल्याचे उघड झाले. याबाबत मंगळवारी (ता.10) शहर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. उपलब्ध सीसीटीव्हीच्या विश्लेषणावरुन पोलिसांनी चोरट्याचा माग काढीत ज्ञानेश्वर वनसराम सगर (रा.सुकेवाडी) याला ताब्यात घेवून चौकशी केली असता त्याने 200 ग्रॅम वजनाचा बैल चोरल्याची कबुली दिली, मात्र कळस चोरल्याचे अद्याप मान्य केलेले नाही. सध्या तो पोलीस कोठडीत असून त्याच्याकडून गायब ऐवजाचा शोध घेतला जात आहे.

सध्या राज्यात दुष्काळसदृष्य स्थिती निर्माण होत असताना अशाप्रकारच्या घटनांमध्येही वाढ होवू लागल्याने आणि चोरट्यांकडून दिवसाढवळ्या वर्दळीची श्रद्धास्थानेही लक्ष्य केली जावू लागल्याने सर्वसामान्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेत पोलिसांनी तत्काळ कारवाई करताना आरोपीला अटक करुन त्याच्या ताब्यातून निम्मा मुद्देमाल हस्तगत केला असला तरीही अवघ्या दोन दिवसात त्याने निम्मा मुद्देमाल गायबही केल्याने त्याचा शोध तपासाच्या केंद्रस्थानी आहे, सध्या चांदीच्या किंमतीने गाठलेली उंची पाहता चोरट्याकडून त्याची सहीसलामत रिकव्हरी उत्सुकतेचा विषय ठरणार आहे.

सध्याच्या दुष्काळसदृष्य स्थितीत अशाप्रकारच्या घटनांमध्ये वाढ होण्याची भीती निर्माण झाली असून आज (ता.13) पहाटे घुलेवाडी शिवारातील मालपाणी नगरच्या परिसरात एका प्राध्यापकाच्या बंगल्याचे लोखंडी ग्रील तोडण्याचा प्रयत्न झाल्याची घटनाही समोर आली आहे. या प्रकारात चोरट्यांचा प्रयत्न फसला असला तरी चौघा सशस्त्र चोरट्यांकडून जवळपास तासभर सुरु असलेल्या या प्रयत्नाने मालपाणीनगरसह आसपासच्या उपनगरांमध्ये भीती निर्माण झाली आहे. पोलिसांनी रात्रीच्या गस्तीसह जागोजागी नाकाबंदीचा प्रयोग करुन भयभीत नागरिकांना दिलासा देण्याची गरज आहे.

