माजी विद्यार्थी हीच शाळेची ताकद : रहाणे दोन माजी विद्यार्थांकडून चंदनेश्वर विद्यालयास जिम साहित्य भेट

नायक वृत्तसेवा, संगमनेर
माजी विद्यार्थी हीच खर्‍या अर्थाने चंदनेश्वर विद्यालयाची ताकद आहे. त्यामुळे त्यांनी जी मदत केली आहे ती खर्‍या अर्थाने खूप मोठी आहे, असे गौरवोद्गार मंत्रालयातील जीवन प्राधिकरणाचे सचिव राजेंद्र रहाणे यांनी काढले.

संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी येथील चंदनेश्वर विद्यालयाचे माजी विद्यार्थी व ग्रामपंचायतीचे सदस्य अंकुश भाऊसाहेब रहाणे व बाबासाहेब आंबेडकर पतसंस्थेचे अध्यक्ष रवींद्र सोमनाथ रहाणे यांनी स्वखर्चातून तीन लाख रुपये किंमतीचे जिम साहित्य विद्यालयास दिले आहे. त्यामुळे त्यानिमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष आनंद कढणे, युवा उद्योजक रवींद्र ढेरंगे, उपाध्यक्ष रामदास रहाणे, खजिनदार विठ्ठल कढणे, सरपंच शंकर रहाणे, सामाजिक कार्यकर्ते रामभाऊ रहाणे, उपसरपंच भाऊराव रहाणे, पोलीस पाटील ज्ञानदेव रहाणे, रजिस्ट्रार एम. एम. फटांगरे, दूध संस्थेचे अध्यक्ष अनिल कढणे, आर. के. रहाणे, भाऊसाहेब रहाणे, रावसाहेब रहाणे, एस. पी. रहाणे, नरेंद्र रहाणे, प्राचार्य अशोक खेमनर आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना राजेंद्र रहाणे म्हणाले, शालेय शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांनी सरकारी नोकरीच्या पाठीमागे न जाता विविध व्यवसायातही उतरले पाहिजे. त्यासाठी जिद्द, चिकाटी आणि खूप मेहनत करण्याची तयारी असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर तुम्हाला उत्तम आरोग्य ठेवायचे असेल तर व्यायम खूप महत्त्वाचा आहे. तसेच तुम्हाला ज्या-ज्या क्षेत्राची आवड असेल त्या क्षेत्रात तुम्ही करिअर करा असा सल्लाही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. याप्रसंगी दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थांचाही सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन शिक्षक राजेंद्र डुबे यांनी केले तर आभार उपप्राचार्य के. जी. रहाणे यांनी मानले.

Visits: 90 Today: 3 Total: 1108241

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *