दिलासा.! आज संगमनेर शहरातील रुग्णसंख्या शून्य..!! ग्रामीण भागातील संक्रमण मात्र कायम, आजही सापडले 32 रुग्ण..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या सात महिन्यांपासून संगमनेरकरांच्या मागे लागलेल्या कोविडच्या विषाणूंंनी आज मात्र संगमनेर शहराला मोठा दिलासा दिला आहे. आज शहरातील 14 जणांच्या रॅपिड अँटीजेन चाचण्या करण्यात आल्या, मात्र त्यातून शहराती सर्व संशयितांचे निष्कर्ष निगेटिव प्राप्त झाले आहेत. तर ग्रामीण भागातील 32 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले असून ग्रामीण भागातील संक्रमण मात्र अद्यापही कायम असल्याचे दिसून येत आहे. स्थानिक प्रशासनाने आज शहरासह तालुक्यातील एकूण 149 जणांची रॅपिड अँटीजेन चाचणी केली. त्यातील 29 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर 120 जणांचे अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. शासकीय प्रयोगशाळेकडूनही तिघांचे अहवालही पॉझिटिव्ह प्राप्त झाल्याने तालुक्याची एकूण रुग्ण संख्या 4 हजार 339 वर पोहोचली आहे.
जुलैमध्ये संगमनेर तालुक्यात कोविड संक्रमणाचा उद्रेक झाला होता. त्यावेळी तालुक्याच्या भेटीवर आलेले पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यातील संक्रमण आटोक्यात येईल असा अंदाज वर्तविला होता. दैनिक नायकनेही संगमनेरातील कोविड बाधितांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांकडून विविध प्रकारची माहिती संकलित करुन संगमनेर तालुक्याची रुग्णसंख्या साडेचार हजारांपर्यंत पोहोचेल असा अंदाज वर्तविला होता, आजच्या स्थितीत तो तंतोतंत खरा ठरत असल्याचे समोर आलेल्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. आज कोविडचे संक्रमण आटोक्यात आल्याचे दृष्य दिसत असले तरीही त्यामुळे कोरोना संपला असे समजून येणाऱ्या पंधरवड्यातील दिवाळी सण मोठ्या धुमधडाक्यात साजरा होण्याची शक्यता आहे.
राज्यातील वैद्यकीय क्षेत्रातील मोठ्या जाणकारांनी कोविडची दुसरी लाट येण्याची शक्यताही वर्तविली आहे. त्यामुळे कोविड संसर्गाची गती कमी झाली असली, तरीही तो संपलेला नाही याचे भान ठेवण्याची गरज आहे. त्यामुळे नागरिकांनी यापुढेही काळजी घेण्याची गरज आहे. जोपर्यंत या महामारीवरील लस उपलब्ध होत नाही, तोपर्यंत प्रत्येक नागरिकाला सामाजिक अंतराचे पालन आणि मुख्य पट्टी वापरावीच लागेल. अन्यथा या महामारीचा विषाणू कधीही कोणालाही विळखा घालू शकतो याचे प्रत्येकाने स्मरण ठेवण्याची गरज आहे. आजच्या अहवालातून शहरी रुग्णसंख्या शून्य तर ग्रामीण भागातील रुग्ण संख्येत बत्तीस बाधितांची भर पडली आहे. आज केलेल्या एकूण चाचण्यातून पॉझिटिव्ह येण्याचा दर 20.13 टक्के कायम असल्याने तालुक्यात रुग्ण समोर येण्याची गती कमी झालेली नाही हे लक्षात घेण्याची गरज आहे.
आज प्राप्त झालेल्या अहवालातून रायतेवाडी येथील 77 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 16 वर्षीय मुलगा, घारगाव येथील 65 वर्षीय महिलेसह 45 व 44 वर्षीय तरुण, कुरकुंडी येथील 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 65, 35 व 18 वर्षीय महिला, राजापूर येथील 65 व 52 वर्षीय इसमांंसह 63 व 45 वर्षीय महिला, उंबरी बाळापूर येथील 29 वर्षीय तरुणासह 25 व 24 वर्षीय महिला, सादतपुर येथील 35 वर्षीय तरुणासह 54, 32 व 26 वर्षीय महिला, आश्वी बुद्रुक येथील 60 वर्षीय महिला,
जोर्वे येथील 95 वर्षीय वयोवृद्ध इसमासह 80 वर्षीय महिला, साकुर येथील 50 वर्षीय इसमासह 45 व 23 वर्षीय महिला, घुलेवाडी येथील 63 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 38 व 31 वर्षीय तरुण, कनोली येथील 63 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, पिंपळगाव कोंझिरा येथील 29 वर्षीय तरुण व वरुडी पठार येथील 64 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला कोविडचे संक्रमण झाल्याचे समोर आले आहे. ग्रामीण भागाच्या रुग्ण संख्येत 32 रुग्णांची भर पडल्याने ग्रामीण रुग्णसंख्या 3 हजार 151 वर पोहोचली आहे. तर तालुक्याची एकूण रुग्णसंख्या 4 हजार 339 वर पोहोचली आहे.