आदिवासी युवानेते मारुती मेंगाळ राष्ट्रवादीच्या वाटेवर मत विभाजन टाळण्यासाठी विरोधी पक्षनेते अजित पवारांचे प्रयत्न
नायक वृत्तसेवा, अकोले
आदिवासी युवानेते मारुती मेंगाळ यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची अकोले तालुक्यात जोरदार चर्चा आहे. आदिवासी समाजाचे युवानेते तथा माजी उपसभापती मारुती मेंगाळ यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश होणार असल्याची माहिती खात्रीलाय सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला मोठी ताकद मिळणार आहे.
मारुती मेंगाळ यांच्या अलीकडेच विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याशी दोन ते तीन बैठका या संदर्भात पार पडल्या असून जवळजवळ हा प्रवेश निश्चित मानला जात आहे. मेंगाळ हे ठाकर समाजाचे युवा नेते असून त्यांनी ठाकर समाजात युवा व ज्येष्ठ वर्गाचे संघटन मोठ्या प्रमाणात केले आहे. सध्या मेंगाळ हे शिवसेनेमध्ये आहेत. ते अकोले पंचायत समितीचे उपसभापती होते. त्यांनी आपल्या उपसभापती पदाच्या कार्यकालात अकोलेमध्ये मोठ्या प्रमाणात कामे कली. अत्याचारग्रस्त कुटुंब, सामाजिक प्रश्नांसाठी मेंगाळ यांनी आक्रमक आंदोलने केली आहेत. मेंगाळ यांचे सर्वपक्षीय नेते मंडळीशी देखील सुसंवाद आहे. याचबरोबर तालुक्यात त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे.
अकोले तालुक्यातील बहुजन नेत्याने हा प्रवेश व्हावा म्हणून प्रयत्न केले. पक्षाला ठाकर समाजातील मोठ्या युवानेत्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मताचे कसे विभाजन होते, हे पवार यांना पटवून दिल्याची माहिती आहे. पवार हे नेहमी बेरजेचे राजकारण करत असतात. अजित पवार यांनीही अकोले तालुक्यातील भविष्यातील राजकारणात मत विभाजन टाळण्यासाठी सर्व शक्ती एकत्र आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या प्रवेशासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पारनेरचे आमदार नीलेश लंके, जुन्नरचे आमदार अतुल बेणके, आमदार दरोडा हे अनेक दिवसांपासून मेंगाळ यांच्या संपर्कात होते, अशीही माहिती आहे. आमदार डॉ. किरण लहामटे, ज्येष्ठ नेते अशोक भांगरे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मेंगाळ यांच्या पक्ष प्रवेशामुळे मोठी ताकद अकोले तालुक्यात मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. भविष्यात विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती व इतर स्थानिक स्वराज्य संस्था या निवडणुकांमध्ये फायदा होणार आहे.