शहरातील ओढ्यांचे खोलीकरण व रुंदीकरण गरजेचे ः वाघ
शहरातील ओढ्यांचे खोलीकरण व रुंदीकरण गरजेचे ः वाघ
नायक वृत्तसेवा, नेवासा
शहर व परिसरात नुकत्याच झालेल्या पावसामुळे ओढ्यांचे पाणी शहरातील मारुती नगर, रामकृष्ण नगर व चक्रनारायण वसाहतीत घुसले. त्याला या परिसरात असलेले अरुंद ओढे हेच मूळ कारण असून पुन्हा अशी परिस्थिती उद्भवू नये; यासाठी या ओढ्यांचे खोलीकरण व रुंदीकरण करून संरक्षक भिंत उभी करणे हाच पर्याय असल्याचे अभियंता नगरसेवक सुनील वाघ यांनी या भागाची पाहणी केल्यानंतर सांगितले.
नेवासा शहरातील संत ज्ञानेश्वर महाराज मंदीर रस्त्यावर असलेल्या रामकृष्ण नगर, चक्रनारायण वसाहत तसेच मारुती नगर याठिकाणी जाऊन नगरसेवक वाघ यांनी पाहणी केली असता तेथील उषा टॉकीजच्या मागे असलेल्या मळ्याकडे जाणार्या ओढ्यावर कमी उंचीचा पूल आहे तेथे काट्या व झुडूंपामुळे पाणी अडले होते. तसेच खुपटीकडे जाणार्या रस्त्यावर डॉ. खंडाळे यांच्या वीटभट्टीजवळ असलेल्या ओढ्यावर जो पूल आहे तेथेही पूर्णतः पाणी तुंबले होते. हाच पाण्याचा तुंब उलट्या प्रवाहाने रामकृष्ण नगर व चक्रनारायण वसाहतीत घुसला. त्यामुळेच या भागातील रहिवाशांच्या घरात पाणी शिरले. यामुळे मोठे नुकसान होऊन रहिवाशांना अचानक आलेल्या पाण्यामुळे अख्खी रात्र जागून काढावी लागली. ही समस्या कायमस्वरूपी दूर करायची असेल तर ओढ्यावरील पुलांची उंची वाढविणे, अंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण करणे आणि भुयारी गटारीतून जाणारे पाणी नदीपात्रात न सोडता त्याकरीता एसटीपी प्रकल्प तयार करणे हाच पर्याय असून याबाबत लोकप्रतिनिधींनी लक्ष घालावे अशी मागणी अभियंता नगरसेवक सुनील वाघ यांनी केली आहे.