पठारावरील आंबीखालसा बनले अपघातांचे ‘हॉटस्पॉट’! ठेकेदाराच्या चुका सामान्यांच्या जीवावर; आजही तीन वाहनांचा विचित्र अपघात..

नायक वृत्तसेवा, घारगाव
भ्रष्टाचारातून प्रलंबित कामांना तिलांजली मिळालेला पुणे-नाशिक महामार्ग सततच्या अपघातांमुळे नेहमीच चर्चेत असतो. सलग अपघातांची ही श्रृंखला खंडीत व्हावी व प्रवाशी आणि स्थानिक गावकर्‍यांचे जीव वाचावेत यासाठी वेळोवेळी आंदोलनेही झाली, मात्र त्यातून पोकळ आश्वासने सोडून काहीच साध्य होत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या महामार्गाची ‘मृत्यूघंटा’ ही जुनी ओळख आजही कायम आहे. त्यातच अगदी सुरुवातीपासूनच पठारभागातील आंबीखालसा फाटा अपघात प्रवण क्षेत्र म्हणून अधोरेखीत झाले असून अपघातांचा ‘हॉटस्पॉट’ म्हणून या परिसराची ओळख होवू लागली आहे. आज सकाळीही या भागात तीन वाहनांचा विचित्र अपघात होवून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र सामान्यांच्या जीव आणि त्यांच्या वित्ताशी काहीएक घेणंदेणं नसलेल्या ठेकेदार कंपनी आणि राजमार्ग प्राधिकरणाला त्याचे कोणतेही सोयरसुतक नसल्याचेही आता स्पष्टपणे समोर आले आहे.

सत्तर टक्के पूर्णत्वाच्या बोलीवर 2017 साली सुरु झालेला पुणे-नाशिक महामार्ग नूतनीकरणानंतरही आपली ‘मृत्यूघंटा’ ही जुनी ओळख पुसण्यात सपशेल अपयशी ठरला आहे. या महामार्गाची निर्मिती करणार्‍या ठेकेदार कंपनीने महामार्ग सुरु करतांना प्रलंबित कामे पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र कालाय तस्मै या उक्तीप्रमाणे कंपनीला त्याचा सोयीस्कर विसरही पडला आहे. त्यामुळे महामार्गाच्या संलग्न असलेले अनेक सर्व्हिस रस्ते, भूयारी मार्ग व पादचारी उड्डाणपुलासारख्या महत्त्वाच्या गोष्टी आजही अपूर्ण अवस्थेत आहेत. त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांनाच बसत असल्याने नूतनीकरण होवूनही या महामार्गावरील अपघांताची श्रृंखला खंडीत होवू शकलेली नाही.

तालुक्याच्या पठारभागातून जात पुणे जिल्ह्याला मिळणार्‍या या महामार्गावरील आंबीखालसा फाटा हे ठिकाण तर अतिशय घातक ठरले आहे. या भागातून जाणार्‍या रस्त्यावर अतितीव्र स्वरुपाचा उतार असल्याने अनाहुतपणे वाहनांचा वेग वाढतो व या परिसरात सतत अपघात होवून त्यातून अनेकांचे जीव गेले आहेत. येथील अपघातांची संख्या नियंत्रणात यावी यासाठी स्थानिक गावकर्‍यांनी वेळोवेळी आंदोलने केली, निवेदनांची आर्जवेही झाली. मात्र त्याचा कोणताही फायदा आजवर झाल्याचे ऐकिवात नाही. स्थानिक गावकर्‍यांच्या आंदोलनानंतर जागलेल्या ठेकेदार कंपनीने या भागात स्पीड ब्रेकर बसविले. मात्र त्यांचा आकार इतका मोठा आणि अशास्त्रीय आहे की त्यावर आदळूनच अनेक वाहनांचे अपघात झाले आहेत.


आंबीखालसा फाट्याहून दररोज हा महामार्ग ओलांडणार्‍यांची संख्याही खूप मोठी आहे. त्यातून अनेकवेळा भिषण अपघातही घडतात आणि त्यात निष्पाप नागरिकांचे बळीही जातात. ठेकेदार कंपनीने अर्धवट ठेवलेल्या अथवा प्रलंबित असलेल्या कामांमुळे या दुर्दैवी घटना घडतच आहेत. यामुळे व्यथीत झालेल्या आंबीखालसा ग्रामपंचायतीने तीन वर्षापूर्वी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाशी पत्रव्यवहारही केला होता. त्यातून या भागातील रस्ता निर्मिती करताना झालेल्या चुका आणि मूळ आराखड्यात असूनही प्रलंबित असलेल्या कामांचा ऊहापोह केला गेला होता.

त्यावर 6 ऑक्टोबर, 2018 रोजी प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक पी.जी.खोडस्कर यांनी आंबीखालसाच्या सरपंचांना उत्तर पाठविले. त्यात त्यांनी आंबीखालसा परिसरात अंडरपास (भूयारी मार्ग) तयार करण्याचा 16 कोटी 29 लाख रुपयांचा प्रस्ताव तयार असल्याचे सांगून त्याला मान्यता मिळताच तो आकाराला येईल असे गोड आश्वासन देत गावकर्‍यांची बोळवण केली. प्रत्यक्षात ‘त्या’ पत्ररुपी आश्वासनाला आता तीन वर्षांचा काळ लोटला आहे, मात्र जमीनीवर ना भूयारी मार्ग आहे, ना या भागात होणारे अपघात थांबले आहेत. त्यामुळे महामार्गाची निर्मिती करणार्‍या कंपनीसह भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणालाही सर्वसामान्य माणसांच्या जीवाचे व त्यांच्या वित्ताचे कोणतेही सोयरसुतक नसल्याचे आता ठळकपणे समोर आले असून महामार्ग प्राधिकरणच ठेकेदाराला वारंवार पाठिशी घालीत असल्याचे दिसत आहे.

आज सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास संगमनेरहून पुण्याकडे जाणार्‍या तीन वाहनांचा विचित्र अपघात होण्याची घटनाही समोर आली आहे. पुण्याच्या दिशेने निघालेल्या मालट्रकचे ब्रेक फेल झाल्याने तो पुढे चाललेल्या माल वाहतूक टेम्पोवर जावून आदळला, टेम्पोला अचानक बसलेल्या धडकीमुळे गडबडलेल्या टेम्पोचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले व त्याने त्याच्या पुढे चाललेल्या एका स्वीफ्ट डिझायर कारला पाठीमागून जोराची धडक देत तो थेट रस्ता दुभाजकावर चढला व मधोमध जावून बंद पडला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही, मात्र या तीनही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघातानंतर काहीकाळ पुण्याकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र महामार्ग पोलीस व घारगाव पोलिसांनी तत्काळ घटनास्थळाकडे धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनेतून ठेकेदार कंपनी आणि तिला पाठिशी घालणार्‍या राजमार्ग प्राधिकरणाची मात्र पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *