अफगाणी धर्मगुरू हत्या प्रकरणातील तीन आरोपींना ठोकल्या बेड्या राहुरी पोलिसांची कारवाई; दोन गावठी कट्टे व 5 जिवंत काडतुसेही जप्त

नायक वृत्तसेवा, राहुरी
नाशिक जिल्ह्यातील येवला येथे 5 जुलैला मध्यरात्री अफगाणी धर्मगुरू जरीफबाबाची हत्या झाली होती. सेवेकर्यांनीच त्यांची हत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले होते. त्यानंतर जरीफबाबाचे सोशल मीडियावर विविध व्हिडीओ असल्याचे समोर आले होते. त्यातून त्याने कोट्यवधी रुपयांची संपत्ती जमवली होती. मूळचा अफगाणी असलेल्या या बाबाला भारतात संपत्ती नावावर कारणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांनी विश्वासू व्यक्तींच्या नावावर ठिकठिकाणी कोट्यवधी रुपयांची संपत्ती घेतली होती. हा अफगाणी सुफी भारतात एकटाच आला नव्हता. त्याने अफगाणीस्थानातून एका महिलेला देखील सोबत आणल्याचे तपासात समोर आले होते. ही महिला गरोदर असल्याने थोड्याच दिवसांत तिला बाळ होणार होते आणि ते भारतात जन्मल्यावर त्याच्या नावावर ही सगळी संपत्ती अफगाणीबाबा करणार अशी भीती त्याच्या विश्वासू व्यक्तींना होती. त्यांनीच बाबाच्या हत्येचा कट रचला होता.

येवल्यात बाबा बँकेतून पैसे काढायला आल्याची माहिती त्यांना होती. बाबाची त्यांच्याच सेवेकर्यांनी सहकार्यांच्या मदतीने हत्या केली. सुरवातीला ही हत्या धार्मिक वादातून झाल्याची चर्चा पसरली. मात्र नाशिक ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणाचा मोठ्या शिताफीने तपास करत याप्रकरणी चार संशयित आरोपींना अटक केली. आरोपींनी या हत्येच्या गुन्ह्याची कबुली दिली आणि हत्या प्रॉपर्टीसाठी झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी या प्रकरणी गफार खान, गणेश झिंजाट, रवींद्र तोरे, पवन आहेर या आरोपींना अटक केली. तर मुख्य आरोपी संतोष ब्राह्मणे हा फरार असल्याने येवला पोलीस त्याचा कसून शोध घेत होते.

अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी हद्दीत असणार्या एका हॉटेलवर 3 ऑगस्टला रात्री 10 वाजेच्या सुमारास तीन तरुण जेवण करण्यासाठी आले होते. यातील दोन तरुणांकडे गावठी कट्टे असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक सचिन नार्हेडा यांना खबर्यांमार्फत मिळाली. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करून नार्हेडा हे संबंधित हॉटेलच्या बाहेर पोहचले. यावेळी साध्या वेशातील पोलिसांनी ग्राहक बनून हॉटेलमध्ये प्रवेश केला आणि आरोपींना काही कळण्याच्या आत मोठ्या शिताफीने त्यांच्या मुसक्या आवळल्या. यावेळी आरोपींकडून दोन गावठी कट्ट्यांसह 5 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. आरोपींची चौकशी केली असता संतोष ब्राह्मणे (रा. कोपरगाव) हा येवला येथील अफगाणी सुफी धर्मगुरूच्या हत्याकांडातील मुख्य आरोपी असल्याचे समोर आले. राहुरी पोलिसांनी ब्राम्हणे याच्यासह गोपाल बोरगुळे आणि विशाल पिंगळे या त्याच्या दोन साथीदारांना देखील अटक केली आहे. राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सचिन नार्हेडा हे घटनेचा पुढील तपास करत आहेत. संतोष ब्राम्हणे हा अफगाणी बाबाच्या हत्येचा मुख्य आरोपी असल्याने राहुरी पोलिसांच्या तपासानंतर त्याला येवला पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.
