संगमनेरच्या बजरंगदलाची पालिका निवडणुकीशी फारकत! महायुतीच्या सूत्रधारांवर गंभीर आरोप; काही प्रभागात विरोधकांचा प्रचार..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
तब्बल नऊ वर्षांनंतर होत असलेल्या संगमनेर नगरपालिकेच्या निवडणुकीत महायुतीच्या गटात विविध नाट्यमोडी घडत असून तिकिट वाटपातील अंतर्गत धुसफूसही आता ठळकपणे समोर येत आहे. मागील विधानसभेला अडीच हजारांचा टप्पा गाठतानाही दमछाक झालेल्या राष्ट्रवादीने यापूर्वीच दोन्ही मित्र पक्षांना कात्रजचा घाट दाखवत तिसरा वाटा गुडूप केल्याने गोंधळ झाला होता. राष्ट्रवादीच्या या भूमिकेतून काही प्रभागांमध्ये महायुतीच्याच वाटेत कांटे विखुरले गेले असताना आता त्यात विधानसभा निवडणुकीच्या विजयात मोठा वाटा असलेल्या बजरंगदलाची नाराजी जोडली गेली आहे. तिकिट वाटपातील मागणी व आक्षेपांना कोणतेच स्थान दिले गेले नसल्याने बजरंगदलातील मोठा वर्ग दुखावला गेला असून स्थानिक मतदार शिव्या घालीत असलेल्या काहींना विरोध डावलून उमेदवारी दिल्याने महायुतीने हातानेच पायावर धोंडा पाडल्याचा गंभीर आरोपही केला जात आहे. यासर्व घडामोडींचा परिणाम बजरंगदलाच्या अनेक कार्यकर्त्यांनी विरोधी उमेदवारांचा प्रचारही सुरु केल्याचे बघायला मिळत आहे.


पालिका निवडणुकांच्या मतदानाची तारीख जशी जवळ येत आहे, तशा राजकीय घडामोडींनाही वेग आला असून एकमेकांचे राजकीय उणेदुणे काढण्यासह घटक असलेल्यांमधील अंतर्गत धुसफूसही आता उफाळून बाहेर पडत असल्याचे दिसत आहे. यावेळच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काहीतरी गडबड करण्याच्या विचारात असल्याचे हेरुन माजी खासदार डॉ.सुजय विखे-पाटील यांनी अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार यांचे कान टोचले होते. मात्र त्या उपरांतही त्यांनी ऐनवेळी घालायचा तो गोंधळ घालून नगराध्यक्षपदासह थेट दहा जागांवर दावा ठोकला होता. ऐनवेळी त्यातील नगराध्यक्षासह एका महिला उमेदवाराची माघार घडवून नऊ ठिकाणी राष्ट्रवादीने आपले उमेदवार उभे केले आहेत. विशेष म्हणजे मागील एका विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराला संपूर्ण मतदारसंघातून अवघी 2302 मते मिळाली होती. तरीही या पक्षाने तब्बल नऊ ठिकाणी आट्टाहासाने उमेदवार उभे करुन त्यातील सहा जागांवर महायुतीच्या उमेदवारांसमोरच आव्हान उभे केले आहे.


राष्ट्रवादीने अतिरीक्त उमेदवारी दिलेल्या सहा प्रभागांमध्ये चार ठिकाणी शिवसेना तर, दोन ठिकाणी भाजपचे उमेदवार रिंगणात आहेत. अशावेळी राष्ट्रवादीची भूमिका या प्रभागातील महायुतीच्याच उमेदवारांना अडचणीची ठरणार आहे. त्यामुळे या प्रभागांमध्ये यापूर्वीच नाराजी निर्माण होवून अनेक कार्यकर्त्यांनी निवडणुकीपासून अलिप्त राहण्यासह विरोधी उमेदवाराच्या प्रचाराचाही पर्याय निवडल्याने महायुतीत अंतर्गत धुसफूस होती. त्यात आता विधानसभा निवडणुकीच्या यशात मोठा वाटा असलेल्या बजरंगदलाची नाराजीही ठळकपणे समोर येवू लागली आहे. त्यामागील कारणांचा कानोसा घेण्याचा प्रयत्न केला असता काही प्रभागांमध्ये बजरंग दलाच्या स्थानिक आणि प्रभावी कार्यकर्त्यांना उमेदवारी देण्याच्या आग्रहासह काही नावांना आक्षेप घेतला गेला होता. मात्र त्याकडे गांभीर्याने बघितले गेले नाही.


त्याचा परिणाम चुकीच्या उमेदवारांना उमेदवारी देण्यासाठी समर्पित कार्यकर्तेच दुखावले गेल्याने बजरंगदलाने आपली खद्खद् व्यक्त करताना पालिका निवडणुकीतूनच फारकत घेतली आहे. कार्यकर्त्यांना मनाप्रमाणे करण्याची मोकळीक मिळाल्याने बहुतेकांनी प्रभागातील विरोधीगटाकडून उभ्या असलेल्या उमेदवारांचा प्रचारही सुरु केला आहे. त्याचा मोठा फटका महायुतीला बसण्याची शक्यता असून या प्रकारांमधून महायुतीत सर्वकाही आलबेल नसल्याचेही दिसून येत आहे. ऐन निवडणुकीच्या काळात समोर येत असलेला हा विस्कळीतपणा मतदारांवरही प्रभाव टाकणारा आहे.


निवडणुकांच्या नियोजनात अव्वल मानल्या जाणार्‍या स्थानिक भाजपने निवडणुकीची सुरुवातीची सूत्रे हाती घेत नियोजनबद्ध सुरुवात केली खरी, मात्र सुकाणू समितीमधील काही धूर्त सदस्यांनी ऐनवेळी त्यात मनमानी कालवल्याने संपूर्ण व्यवस्थाच धुमील झाली. या विसंवादाचा फटका पूर्ण 30 जागांवर पक्षचिन्हासह उमेदवारही न देता येण्यात झाला. तब्बल सहा प्रभागांमध्ये मित्रपक्ष म्हणवणार्‍या राष्ट्रवादीनेच आव्हान उभे केले. तर, बजरंगदलासारख्या व्यापक युवक संघटनेच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने मोठी युवाशक्ति निवडणुकीपासून दूर झाली. यासर्व गोष्टी महायुतीमधील विस्कळीतपणा उघड करणार्‍या असून त्यांचा विपरित परिणाम मतदारांवर होत असल्याचेही दिसून येत आहे.

Visits: 92 Today: 1 Total: 1100460

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *