वारंघुशी दुर्घटनेतील तिसरा मृतदेह 36 तासांनी सापडला! राजूर पोलिसांचे शर्थीचे प्रयत्न; वाकी जलाशयाच्या फुगवट्यापर्यंत आला वाहत..
नायक वृत्तसेवा, अकोले
भंडारदर्याच्या परिसरात पर्यटनासाठी आलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील पर्यटकांच्या वाहनाला शुक्रवारी (ता.15) रात्री साडेआठच्या सुमारास वारंघुशीजवळ अपघात झाला होता. या अपघातात वाहनातील दोघांचा बुडून मृत्यू झाला व एकजण बचावला होता. तर हा अपघात घडल्यानंतर तो पाहण्यासाठी गेलेल्या एका 72 वर्षीय इसमाचाही तोल गेल्याने नदीपात्रात पडून ते बेपत्ता झाले होते. मात्र त्यांचा दोन दिवस संपूर्ण परिसर पिंजूनही त्यांचा ठावठिकाणा लागत नव्हता. गेल्या दोन दिवसांपासून पोलीस बेपत्ता झालेल्या ‘त्या’ इसमाचा शोध घेत असतांना रविवारी (ता.17) सकाळी त्यांच्या शोधकार्याला यश आले. वारंघुशीजवळच्या कृष्णवंतीच्या पात्रातून वाहत जावून सदर वृद्धाचा मृतदेह थेट वाकी जलाशयाच्या पाण्यात आढळला असून रविवारीच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.
गेल्या शुक्रवारी (ता.15) औरंगाबाद जिल्ह्यातील तिघेजण भंडारदरा धरणाच्या परिसरात आपल्या क्रेटा (क्र.एम.एच.20/ई.वाय.8887) या वाहनातून निसर्ग पर्यटनासाठी आले होते. दिवसभर धरणाच्या परिसरात निसर्ग सौंदर्य अनुभवल्यानंतर दुपारच्यावेळी ते सर्वजण कळसूबाईच्या दिशेने गेले. रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास तेथून माघारी येत असतांना वारंघुशी चौफुलीजवळील पेंडशेत फाट्यावरील अवघड वळण घेतांना चालकाचा अंदाज चुकल्याने त्यांचे वाहन थेट प्रवरेची उपनदी असलेल्या कृष्णवंती नदीच्या पात्रात जावून कोसळले. हा प्रकार घडला त्यावेळी वाकी येथे पाहुणा म्हणून आलेल्या तुकाराम रामदास सांगरे (वय 72, रा.नवीन सिडको, जि.नाशिक) हे अपघात पाहण्यासाठी खाली उतरत असतांना त्यांचा तोल जावून ते नदी पात्रात पडले व वेगवान प्रवाहासोबत वाहून गेले.
या अपघातात वाहनातील अॅड.आशिष प्रभाकर पालोदकर (वय 33, रा.खडकेश्वर, औरंगाबाद) व रमाकांत प्रभाकर देशमुख (वय 35, व्यवसाय : शेती, रा.सार्थनगर, औरंगाबाद) या दोघा तरुणांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. तर, अॅड.अनंता रामराव मगर (वय 32, रा.समर्थ नगर, जि.औरंगाबाद) हे बुडालेल्या वाहनाची मागची काच फोडून बाहेर पडल्याने बचावले. त्याच रात्री राजूर पोलिसांनी बुडालेले वाहन बाहेर काढल्याने मृत्युमुखी पडलेल्या दोघाही तरुणांचे मृतदेह वाहनासोबतच बाहेर काढण्यात आले होते, मात्र अपघात पाहण्यासाठी गेलेले तुकाराम सांगरे मात्र सापडले नाहीत.
त्यामुळे शनिवारी (ता.16) सकाळपासूनच राजूर पोलिसांनी पुन्हा शोध मोहीम सुरु केली. एकीकडे सतत कोसळणारा पाऊस आणि दुसरीकडे कृष्णावंतीसह आसपास वाहणार्या ओढ्यांमध्ये एकसारखी वाढणारी पाणीपातळी असे चित्र असतांनाही पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न सुरुच ठेवले. मात्र शनिवारी दिवसभर वारंघुशीपासून वाकी जलाशयापर्यंतचा परिसर पिंजूनही सांगरे यांचा शोध न लागल्याने सायंकाळी उशिराने अंधाराच्या कारणाने शोधकार्य थांबविण्यात आले. मात्र रविवारी (ता.17) सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास कोणातरी इसमाचा मृतदेह वाकी जलाशयाच्या फुगवट्यात तरंगत असल्याची माहिती राजूर पोलिसांना समजली.
त्यानुसार त्यांनी तत्काळ वाकी जलाशयाकडे धाव घेत सदरचा मृतदेह बाहेर काढला असता तो शुक्रवारी रात्री अपघात पाहण्यासाठी गेलेल्या तुकाराम रामदास सांगरे यांचाच असल्याची ओळख पटली. कायदेशीर सोपस्कार पूर्ण केल्यानंतर पोलिसांनी मयताचे शव त्यांच्या नातेवाईकांकडे सुपूर्द केले व सकाळीच वाकी परिसरात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. राजूर पोलिसांनी अथक प्रयत्न करुन तब्बल 36 तासांनंतर मयताचा मृतदेह शोधून काढला.