शहरापाठोपाठ ग्रामीण क्षेत्रातील रुग्ण वाढीलाही लागली ओहोटी..! शहरातील अवघ्या तिघांसह तालुक्यातील रुग्ण संख्येत आज तीस जणांची भर..

नायक वृत्तसेवा, संगमनेर

रविवारी शहर आणि तालुका अशा दोन्ही ठिकाणांहून दररोजच्या सरासरीच्या मानाने कमी रुग्णसंख्या समोर आल्याने संगमनेरकरांना काहीसा दिलासा मिळाला होता. तीच शृंखला आजच्या सोमवारी ही कायम असल्याने संगमनेरातील कोविडच्या संक्रमणाला ओहोटी लागल्यागत वातावरण निर्माण झाले आहे. आज रॅपिड अँटीजेन चाचणीतून तालुक्यातील एकूण तीस जणांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले असून त्यात शहरातील अवघ्या तिघांचा समावेश आहे. आजच्या रुग्णवाढीने तालुक्यातील एकूण बाधितांची संख्या 3 हजार 455 वर पोहोचली आहे .

दररोज 50 च्या आसपास वाढणारी रुग्णसंख्या, अधूनमधून त्यात होणारी धक्कादायक वाढ आणि त्यात मध्येच येणारी एखाद्या मृत्यूची वेदनादायी वार्ता यामुळे सप्टेंबरच्या संपूर्ण महिन्यात धक्के देणाऱ्या कोविडच्या विषाणूंनी तालुक्याला धक्के देण्याचा प्रकार या महिन्यातही कायम ठेवला होता. 1 ऑक्टोबर रोजी 46, 2 ऑक्टोबर रोजी 51, 3 ऑक्टोबर रोजी 49 तर कालच्या रविवारी 29 रुग्ण समोर आल्यानंतर आता आजही रविवार प्रमाणेच अवघे 30 रुग्ण समोर आले आहेत. त्यातही शहरातील केवळ तिघांचे अहवाल संक्रमित प्राप्त झाल्याने शहरातील कोविडच्या प्रादुर्भावाला ओहोटी लागल्याचे स्पष्ट झाले आहे.

आज प्रशासनाने शहर व तालुक्यातील एकूण 660 जणांची रॅपिड अँटीजेन चाचणी केली. त्यातून 4.70 टक्के दराने शहरातील तिघे तर तालुक्यातील अवघे 27 अशा एकूण 30 जणांचे निष्कर्ष पॉझिटिव्ह तर तब्बल 630 जणांचे निष्कर्ष निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. दररोज मोठ्या रुग्णसंख्येचे धक्क्यामागून धक्का सहन करणाऱ्या संगमनेरकरांसाठी ही अत्यंत दिलासादायक वार्ता आहे. आज प्राप्त झालेल्या अहवालातून शहरातील सावतामाळी नगर परिसरातील 37 वर्षीय महिला, गोविंद नगर परिसरातील 71 वर्षीय ज्येष्ठ नागरिक व घोडेकर मळा परिसरातील 65 वर्षीय इसमाचा अहवाल आज पॉझिटिव्ह प्राप्त झाला. त्यासोबतच तालुक्यातील 27 जणांचे अहवालही आज पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्यात एकट्या गुंजाळवाडीतून सात तर प्रतापपूर मधून 5 रुग्ण समोर आले आहेत. गुंजाळवाडीतील 75, 65 व 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिकांसह 35, 30 व 23 वर्षीय तरुण तसेच, 80 वर्षीय वयोवृद्ध महिला, घुलेवाडी येथील 24 वर्षीय महिला, जोर्वे येथील 45 वर्षीय तरुण, अकलापुर येथील 74 वर्षीय महिला, साकुर मधील 54 वर्षीय इसमासह 48 वर्षीय महिला,

डेरेवाडी येथील 65 वर्षीय महिला, धांदरफळ बुद्रुक मधील 51 वर्षीय इसम, निमगाव जाळी येथील 55 वर्षीय इसमासह 34 वर्षीय महिला, रहिमपूर येथील 62 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, प्रतापपूर मधील 84, 79 व 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिकांसह 25 व 23 वर्षीय तरुण, चिंचपूर येथील 50 वर्षीय महिलेसह सात वर्षीय बालिका, नान्नज दुमाला येथील 38 वर्षीय महिला, तळेगाव दिघे येथील 17 वर्षीय तरुणी व सारोळे पठार येथील 40 वर्षीय तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. आज बाधितांच्या संख्येत तीस जणांची भर पडल्याने तालुक्यातील बाधितांचा आकडा 3 हजार 455 वर पोहोचला आहे.

गेल्या दोन एप्रिल पासून संगमनेर तालुक्यात सुरू झालेल्या कोविडच्या संक्रमणात आत्तापर्यंत संगमनेर शहरात 1 हजार 26 रुग्ण आढळून आले. त्यातील 950 रुग्णांनी आत्तापर्यंत उपचार पूर्ण करून घर गाठले आहे. तर 64 जणांवर सध्या उपचार सुरू असून, दुर्दैवाने शहरातील बारा जणांचा बळी गेला आहे. त्यासोबतच तालुक्यातील एकूण 143 गावांमध्ये कोविडचे संक्रमण पसरले असून आतापर्यंत ग्रामीण भागातील 2 हजार 426 जणांना संक्रमण झाले. त्यातील 2 हजार 186 रुग्णांनी उपचार पूर्ण केले, तर 214 जणांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. दुर्दैवाने तालुक्यातील तब्बल 26 जणांचा या महामारीने बळी घेतला आहे.

अहमदनगर जिल्ह्यात आज तब्बल १ हजार ३१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची जिल्ह्यातील एकूण संख्या ४२ हजार ४६४ झाली आहे. जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे सरासरी प्रमाणही आता ९०.६२ टक्के झाले आहे. गेल्या चोवीस तासांचा विचार करता जिल्ह्यात नव्याने ७५३ रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यात उपचार सुरु असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३ हजार ६५७ झाली आहे.

आज दिवसभरात शासकीय प्रयोगशाळेकडून २३८, खाजगी प्रयोगशाळेतून १९४ आणि रॅपिड अँटीजेन चाचणीतून ३२१ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले.

शासकीय प्रयोगशाळेकडून प्राप्त झालेल्या अहवालातून आज अहमदनगर महापालिका क्षेत्रातील ५७, अकोले ३५, जामखेड ०६, कर्जत ०२, कोपरगाव ०३, नगर ग्रामीण १०, नेवासा ०३, पारनेर १५, पाथर्डी २३, राहाता १०, राहुरी ०१, श्रीगोंदा ६६, लष्करी परिसर व लष्करी रुग्णालयातील प्रत्येकी एकाचा अहवाल पॉझिटिव प्राप्त झाला आहे.

आज खासगी प्रयोगशाळेतून  प्राप्त झालेल्या अहवालातून  जिल्हाभरातील १९४ रुग्णांची भर पडली. यामध्ये, अहमदनगर महापालिका क्षेत्रातील ७५, जामखेड ०८, कर्जत ०४, कोपरगाव ०२, नगर ग्रामीण १९, नेवासा ११, पारनेर ०७, पाथर्डी ०५, राहाता २५, राहुरी १२, शेवगाव ०६, श्रीगोंदा ०१, श्रीरामपूर ११ आणि लष्करी परिसरातील दोन रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यातील विविध तालुक्यात  आज करण्यात आलेल्या  रॅपिड अँटीजेन चाचणीत ३२१ जण बाधित आढळुन आले. यामध्ये, अहमदनगर महापालिका क्षेत्रातील २६, अकोले २१, जामखेड ४७, कर्जत ०९, कोपरगाव १२, नगर ग्रामीण ०८, नेवासा १८, पारनेर १५, पाथर्डी १९, राहाता २३, राहुरी ३२, संगमनेर ३०, शेवगाव १९, श्रीगोंदा ११, श्रीरामपूर २५, लष्करी परिसरातील ०५ रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यातील विविध तालुक्यातील १ हजार ३१ रुग्णांना आज बरे झाल्याने घरी सोडण्यात आले. त्यात अहमदनगर महापालिका क्षेत्रातील १७१, अकोले ६७, जामखेड ३९, कर्जत ४४, कोपरगाव ४३, नगर ग्रा. ६७, नेवासा ७१, पारनेर ५७, पाथर्डी ३३, राहाता ८४, राहुरी ६०, संगमनेर ९४, शेवगाव ४३, श्रीगोंदा ३३, श्रीरामपूर ११३, लष्करी परिसरातील ०९, लष्क्करी रुग्णालयातील ०३ रुग्णांचा समावेश आहे.

  • जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या : ४२ हजार ४६४..
  • जिल्ह्यातील उपचार सुरु असलेल्या रुग्णांची संख्या : ३ हजार ६५७..
  • जिल्ह्यात  आजवर झालेले  एकूण मृत्यू : ७३६..
  • जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या : ४६ हजार ८५७..
  • जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्ण संख्येने ओलांडला ४२ हजारांचा टप्पा..
  • आतापर्यंत जिल्ह्यातील ४२ हजार ४६४ रुग्ण बरे होऊन घरी परतले..
  • जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण पोहोचले ९०.६२ टक्क्यांवर..
  • जिल्ह्यातील  विविध तालुक्यातील तब्बल १ हजार ३१ रुग्णांना आज डिस्चार्ज तर ७५३ नव्या बाधितांची पडली भर..

Visits: 149 Today: 1 Total: 1108398

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *