संगमनेरात आढळला गुटख्याचा छुपा कारखाना! घरातच सुरु होता उद्योग; पोलिसांचा टपरीसह घरावरही छापा..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
राज्यात उत्पादन, साठवणूक, वितरण व विक्री करण्यास मनाई असलेला गुटखा कशा पद्धतीने तस्करीतून सर्वत्र पोहोचतो याची विविध उदाहरणे रोजच समोर येत असताना संगमनेरात आता चक्क गुटख्याचा गुप्त कारखाना आढळला आहे. शहर पोलिसांना याबाबतची माहिती प्राप्त झाल्यानंतर त्यांनी बसस्थानकासमोरील पान टपरीसह शिवाजीनगरमधील एका घरावर छापा घालीत गुटख्याचा हा गोरखधंदा उघडकीस आणला असून या कारवाईत पोलिसांनी सुमारे दोन लाख तीस हजार रुपयांच्या मुद्देमालासह प्रवीण शंकर बत्तुल या गुटखा उत्पादक पानटपरी चालकास अटक केली आहे. धक्कादायक म्हणजे पोलिसांनी घातलेल्या छाप्यात आरोपीच्या ताब्यातून मोठ्या प्रमाणात हुक्क्यासाठी लागणारे साहित्यही जप्त करण्यात आल्याने आरोपीच्या काळ्या धंद्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे.


याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरची कारवाई मंगळवारी (ता.11) रात्री साडेनऊच्या सुमारास वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाबाहेर असलेल्या ‘लक्ष्मी पान’ या ठिकाणावर करण्यात आली. शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक समीर बारवकर यांना याबाबतची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे उपनिरीक्षक श्रीकांत सावंत यांना कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार सावंत यांनी हवालदार सातपुते, महिला हवालदार डुंबरे, थोरात, पोलीस शिपाई मुकरे, नागरे, उंडे, खुळे, पांडे, आगलावे यांच्यासह वरील ठिकाणी छापा घातला.


या कारवाईत त्याच्या पानटपरीची झडती घेतली असता पोलिसांना गुटख्यासह (खर्रा) हुक्का ओढण्यासाठी लागणार्‍या वेगवेगळ्या प्रकारच्या सुगंधीत तंबाखू, हुक्क्याचे भांडे, कोळशाची पाकिटं, हुक्क्यासाठी लागणारे पाईप असा विविध प्रकारचा जवळपास एक लाख 10 हजार 497 रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. सदरील पानटपरीत गोदामासारखा भरलेला माल पाहून पोलिसांचा संशय बळावल्याने त्यांनी आरोपी प्रवीण शंकर बत्तुल (वय 34, रा.जनतानगर) याला ताब्यात घेत त्याच्या शिवाजीनगर येथील त्याच्या घरावर छापा घातला.


इथवरच्या कारवाईत पोलिसांना आरोपीच्या घरातून हुक्का व गुटख्याचा साठा हाती लागण्याची अपेक्षा असताना समोरील दृष्य पाहून पोलिसांनाही मोठा धक्का बसला. अतिशय दाट लोकवस्तीच्या या परिसरात आरोपीने बिनधास्तपणे गुटख्याचा मिनी कारखानाच थाटल्याचे पोलिसांना आढळून आल्यानंतर संपूर्ण घराची झडती घेतली असता घरात वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलेल्या तयार गुटख्याच्या (खर्रा) वेगवेगळ्या वजनाच्या पुड्या, गुटख्यासाठी लागणारी कुटलेली सुपारी, तंबाखू व अन्य कच्चे साहित्य, विविध आकार-प्रकारच्या मशिन व अन्य साहित्य आणि जवळपास साडेनऊ हजारांची रोकड असा एकूण एक लाख 18 हजार 310 रुपयांचा मुद्देमाल हाती लागला.


या दोन्ही ठिकाणच्या छाप्यात शहर पोलिसांनी गुटखा, हुक्का, बंदी असलेली सुगंधीत तंबाखू, हुक्क्यासाठीचे साहित्य, गुटखा (खर्रा) तयार करण्यासाठी लागणारी यंत्रसामग्री, कच्चामाल, तयारमाल, विक्रीसाठी तयार असलेल्या वेगवेगळ्या आकाराच्या पुड्या असा एकूण 2 लाख 28 हजार 807 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल रामकिसन मुकरे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन प्रवीण शंकर बत्तुल (वय 34, रा.जनतानगर) याच्या विरोधात भारतीय न्यायसंहितेच्या विविध कलमांसह अन्नसुरक्षा व मानके अधिनियमातील विविध तरतुदींनुसार गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली आहे. या कारवाईने संगमनेरातील अवैध धंद्यांचे वाढते स्तोम उघड होण्यासह चक्क गुटखा (खर्रा) तयार करण्याचा छोटेखानी कारखाना पहिल्यांदाच उघड झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

Visits: 63 Today: 1 Total: 1099330

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *