वळणचे सामाजिक कार्यकर्ते डॉ.विजय मकासरे यांच्याविरुद्ध राहुरी पोलिसांत गुन्हा

वळणचे सामाजिक कार्यकर्ते डॉ.विजय मकासरे यांच्याविरुद्ध राहुरी पोलिसांत गुन्हा
समन्स बजाविण्यासाठी आलेल्या श्रीरामपूरच्या पोलिसास अरेरावी व शिवीगाळ केल्याचा ठपका
नायक वृत्तसेवा, राहुरी
समन्स बजाविण्यासाठी आलेल्या श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यातील कर्मचार्‍यास अरेरावी व शिवीगाळ केल्याप्रकरणी राहुरी तालुक्यातील वळण येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ.विजय मकासरे यांच्याविरुद्ध राहुरी पोलिस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.

श्रीरामपूर पोलीस ठाण्यातील कर्मचारी संदीप कमलाकर कानडे यांनी मकासरे यांच्याविरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यामध्ये म्हंटले आहे की, रविवारी (ता. 18) सकाळी 10 वाजता मकासरे यांना समन्स बजाविण्यासाठी वळण येथील त्यांच्या घरी गेलो होतो. त्यावेळी मकासरे यांनी समन्स घेण्यास नकार देत अरेरावी केली. काही वेळाने समन्सवर सही करतानाही शिवीगाळ करीत सरकारी कामात अडथळा आणला.

श्रीरामपूर तालुक्यातील एकलहरे शिवारात पकडलेल्या 54 लाख रुपयांच्या गुटखा प्रकरणातील संशयित मुख्य आरोपींना पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट हे पाठिशी घालत असल्याचा आरोप करणारी तक्रार मकासरे यांनी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.प्रताप दिघावकर यांची भेट घेऊन केली होती. त्यानंतर डॉ.दिघावकर यांनी श्रीरामपूरच्या अप्पर पोलीस अधीक्षिका डॉ.दीपाली काळे यांना चौकशीचा आदेश दिला.

दरम्यान, बहुचर्चित गुटखा प्रकरणाचा पोलीस निरीक्षक बहिरट यांच्याकडील तपास काढून घेण्यात आला. विशेष म्हणजे, श्रीरामपूरचे विभागाचे पोलीस उपअधीक्षक राहुल मदने यांना डावलून हा तपास शिर्डीच्या पोलीस उपअधीक्षकांकडे सोपविण्यात आला. त्यानंतर दुसर्‍याच दिवशी मदने यांच्याच अधिपत्याखालील राहुरी पोलीस ठाण्यात मकासरे यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या या गुन्ह्याची पोलीस वर्तुळात राज्यभर चर्चा सुरू आहे.

पोलीस शिपाई संदीप कानडे यांनी आणलेल्या समन्सवर कोणताही वाद न करता सही करून दिली. त्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी माझ्याविरुद्ध कानडे यांच्या फिर्यादीनुसार, कोणतीही शहानिशा न करता राहुरी पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल झाल्याचे समजले. पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांच्याविरुद्ध तक्रार केल्याने माझे मानसिक खच्चीकरण करण्यासाठी हा खोटा गुन्हा दाखल केला आहे.
– डॉ. विजय मकासरे (सामाजिक कार्यकर्ते, वळण)

Visits: 98 Today: 2 Total: 1103573

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *