भगवद्गीता तणावातून मुक्त होण्याचा शाश्वत मार्ग : डॉ.संजय मालपाणी गीता जयंतीच्या निमित्ताने मानवी जीवनात गीतेचे महत्त्व सांगणार्‍या व्याख्यानाचे आयोजन

नायक वृत्तसेवा, संगमनेर
जीवनात सगळं काही ‘सेट’ आहे, परंतु माईंड मात्र ‘अपसेट’ आहे. त्यातूनच माणूस सातत्याने संकटं ओढावून घेतो. संकट नसेल तर मानसाला चैन पडत नाही. काहीच नसले की मनुष्य नानाविध उपद्व्याप करतोे आणि आपल्या जीवनात बैचेनी निर्माण करुन ताण-तणाव वाढवतो. या सर्वांचा शेवट अनेकविध रोग आणि आजारांमध्ये होतो. मग यावरील उपायांचा शोध घेतांना नानाविध युक्त्या वापरल्या जातात आणि त्यातून जीवनातला तणाव दूर करण्याचा प्रयत्न होतो, मात्र तो क्षणिक ठरतो. यातून मुक्त होण्याचे, आनंदी होण्याचे शाश्वत सूत्र केवळ श्रीमद्भगवद्गीतेत असल्याचे प्रतिपादन गीता विशारद् डॉ.संजय मालपाणी यांनी केले.

गीता जयंतीचे औचित्य साधून गीता परिवार, माहेश्वरी ज्युनिअर व सिनिअर महिला मंडळाने डॉ. संजय मालपाणी यांच्या ‘ताण-तणावातून मुक्ती, गीता सांगे युक्ती’ या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन केले होते, यावेळी ते बोलत होते. गीता परिवाराचे संगमनेर शाखाध्यक्ष कुंदन जेधे, माहेश्वरी सिनिअर महिला मंडळाच्या अध्यक्षा जयश्री मणियार, ज्युनिअर महिला मंडळाच्या अध्यक्षा सरला आसावा आदी यावेळी मंचावर उपस्थित होते.

आपल्या व्याख्यानात पुढे बोलतांना डॉ.मालपाणी म्हणाले की, स्वतः ओढावून घेतलेला मनातील तणाव दूर करण्यासाठी मनुष्य वेगवेगळ्या युक्त्या लढवत असतो. परंतु त्यातूनही घराघरात महाभारत घडते. छोट्या-छोट्या गोष्टीतून तणाव बरेही दूर करता येईल, मात्र तो दीर्घकाळ दूर होवू शकणार नाही. जीवनातील अशा ताण-तणावातून मुक्त होण्याचा शाश्वत मार्ग गीतेत सांगितला आहे. हा जगातील एकमेव असा ग्रंथ आहे जो जेथे खूप मोठ्या प्रमाणात तणाव असतो अशा रणांगणावर सांगितला गेल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

गीतेतील धर्माची संकल्पना स्पष्ट करतांना डॉ.मालपाणी म्हणाले की, कर्म हेच आपले धर्म असल्याची सरळ व्याख्या श्रीकृष्णाने भगवद्गीतेत सांगितली आहे. जे कर्म आत्म्यातून येते, जे बुद्धिने सांगितलेले आणि मनाने स्वीकारलेले असते ते सहज कर्म म्हणजेच मानसाचा धर्म आहे. आत्म्यातून आलेल्या कर्मात दोष असतील तरीही त्याचा त्याग करता कामा नये. मात्र जे करु नये, तेच करण्याचा मानसाचा अट्टाहास असतो आणि मग त्यातूनच तणावाचा सामना करावा लागतो. जो माणूस स्वीकृत कर्मात गती धारण करतो, त्याच्या जीवनातील तणाव कमी असतो. त्यामुळे आपल्या आवडीसाठी, आनंदासाठी प्रत्येकाने वेळ काढलाच पाहिजे असे ते म्हणाले.

आनंद हे असे अत्तर आहे, जे आपण लावले की त्याचा सुगंध सगळ्यांना येतो. आपल्या घरातील वातावरण सुगंधित ठेवायचे असेल तर प्रत्येकाने आनंदाचे अत्तर लावले पाहिजे. हे अत्तर कसे लावायचे आणि त्यातून आनंदीत कसे व्हायचे याचा मंत्र गीता सांगते. आर्थिक, पारिवारीक आणि आरोग्यविषयक दुखातून मुक्त होण्यासाठी आपले चित्त आनंदीत ठेवले पाहिजे. आपल्या आसपासचे दुःख आपण आत घेतले की जीवानातला तणाव वाढतो. सुख आणि दुःख या मानवी जीवनाच्या दोन बाजू आहेत. त्यातही सुख अधिक असतं आणि दुःख पांढर्‍या कागदावरील एखाद्या काळ्या ठिपक्यासारखे छोटेसे असते. मात्र आपली सवय कागद सोडून त्यावरील काळा ठिपका पाहण्याची आहे, तेथेच आपण कमी पडतो आणि दुःखी होतो.

सार्वजनिक पातळीवर वावरताना आपल्या आजुबाजूला असंख्य वैरी असतात, पण आपण आपल्या मनातून वैरत्त्वाची भावना काढून टाकली पाहिजे. ती एकदा काढली की मग आपले जीवन सार्थकी लागते, गीता आपल्या जीवनात येते असेही त्यांनी यावेळी बोलतांना सांगितले. आपल्या तासाभराच्या अभ्यासपूर्ण व्याख्यानात डॉ.संजय मालपाणी यांनी कुरुक्षेत्रात श्रीकृष्णाने अर्जुनाला केलेल्या उपदेशांचे विविध दाखले देत त्यांची आजच्या मानवी जीवनाशी सांगड घालतांना मानवी जीवनात गीतेचे अनन्य महत्त्व असल्याचेही यावेळी विशद् केले. माहेश्वरी ज्युनिअर महिला मंडळाच्या अध्यक्षा सरला आसावा यांनी स्वागत आणि प्रास्तविक केले. संगमनेर पुरोहित संघाचे अध्यक्ष भाऊ जाखडी यांनी परिचय करुन दिला. शोभा बाहेती व स्वप्नाली तापडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तर संजय करपे यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला संगमनेरातील गीताप्रेमींची मोठी उपस्थिती होती. गीता आरतीने या कार्यक्रमाची सांगता झाली.

Visits: 3 Today: 1 Total: 23105

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *