स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तरुण नेत्यांचा बोलबाला! संगमनेरात आजपासून बैठकांचे सत्र; सत्ताधार्यांसह विरोधकांकडून सक्षम उमेदवारांचा शोध..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
दिवाळीचा कालावधी संपताच राजकीय हालचालींनाही आता वेग येवू लागला असून सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन्ही बाजूने बैठकांचे सत्र सुरु झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर माजी खासदार डॉ.सुजय विखे-पाटील आज संगमनेरात गण व गटांसह पालिकेच्या प्रभागनिहाय कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. तर, आमदार सत्यजीत तांबे यांनीही यंदाच्या निवडणुकीची सूत्रे आपल्या हातात घेतली असून त्यांच्याकडूनही प्रभागनिहाय ‘प्रभावी’ उमेदवारांचा शोध सुरु झाला आहे. त्यातून पालिकेच्या निवडणुकीत प्राथमिक रंग भरण्यास सुरुवात झाली असून दोन्ही बाजूने झालेली इच्छुकांची भाऊगर्दी डोकेदुखी ठरणार आहे.

गेल्या प्रदीर्घ काळापासून खोळंबलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधील अडथळा बाजूला करताना सर्वोच्च न्यायालयाने पुढील वर्षीच्या 31 जानेवारीपूर्वी राज्यातील महापालिकांसह जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, नगर परिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाला दिले होते. त्या अनुषंगाने राज्य सरकारकडून गण व गटांसह पालिका हद्दित प्रभागरचनेची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता प्रारुप मतदारयाद्याही प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. त्यामुळे निवडणुकीचे वातावरणही तयार होवू लागले असून शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही ठिकाणी इच्छुकांची मोठी भाऊगर्दी होण्याचा अंदाज आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीत संगमनेरच्या महायुती उमेदवाराची जबाबदारी स्वीकारुन परिवर्तन घडवण्यात सिंहाचा वाटा उचलणार्या माजी खासदार डॉ.सुजय विखे-पाटील यांनी ‘स्थानिक’साठीही आघाडी घेतली असून त्यांनी आज (ता.31) संगमनेर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या गण व गटासह संगमनेर नगरपालिकेची निवडणूक लढवू इच्छिणार्या उमेदवारांची व कार्यकर्त्यांची बैठक बोलावली आहे. दुपारी साडेतीन वाजता जिल्हा परिषद व पंचायत समिती तर, सायंकाळी साडेपाच वाजता पालिकेच्या प्रभागनिहाय उमेदवार व कार्यकर्त्यांशी ते संवाद साधणार आहेत.

पालिकेतील सत्ताधारी गटाच्या निवडणुकीची सगळी सूत्रं यंदा आमदार सत्यजीत तांबे यांनी आपल्याकडे घेतली असून त्यांच्याकडून प्रभागनिहाय सूक्ष्म नियोजन केले जात आहे. सत्ताधारीगट या वेळची निवडणूक ‘महाविकास आघाडी’ला सोबत घेवून लढण्यास फारसा इच्छुक नसल्याचे प्राथमिक चित्र दिसत असून त्याला पर्याय म्हणून शहर विकास आघाडीची स्थापना करुन पक्षविरहित चिन्हांसह सत्ताधारी निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी शहरातील सर्वगट आणि प्रभावी व्यक्तिंशी संवाद सुरु केला असून त्यातून अनेक नावे पहिल्यांदाच समोर येण्याचीही शक्यता आहे.

आजच्या तयारी बैठकांच्या माध्यमातून डॉ.सुजय विखे-पाटील यांनी विधानसभेनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी सुरु केल्याने यावेळची स्थानिक निवडणूक दोघा तरुण नेत्यांच्या नेतृत्वाखाली लढवली जाणार असल्याचेही स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या निवडणुकांमधील चुरसही वाढणार आहे. मात्र तब्बल नऊ वर्षानंतर होणार्या पालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांसाठी दोन्ही बाजूने झालेली इच्छुकांची भाऊगर्दी सांभाळतांना आणि त्यातील बहुतेकांना थोपवताना दोन्ही तरुण नेत्यांचा कस लागणार हे मात्र निश्चित आहे.

जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपनेते, माजी खासदार डॉ.सुजय विखे-पाटील यांनी आघाडी घेतली असून आज (ता.31) संगमनेरात दोन स्वतंत्र बैठकांच्या माध्यमातून ते शहरी आणि ग्रामीण कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधणार आहेत. त्याचवेळी आमदार सत्यजीत तांबे यांनी नगरपालिका निवडणुकीची तयारी करताना ‘शहर विकास आघाडी’ची स्थापना करण्याचे नियोजन केल्याचे वृत्त असून त्यासाठी शहरातील प्रभावी आणि सक्षम उमेदवारांसह सर्वगटांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. सत्ताधारी आणि विरोधक अशा दोहींकडून निवडणूक पूर्व तयारीला वेग आल्याने आगामी काळातील दोन्ही निवडणुकांमध्ये रंगत भरण्यासही सुरुवात झाली आहे.

