लव्ह जिहादच्या आरोपीनंतर आता घारगावचा बलात्कारीही गायब! पोलिसांच्या तपास पद्धतीवर प्रश्नचिन्ह; महिना उलटूनही ठावठिकाणा लागेना..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
दोन वर्षांपूर्वी घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दित घडलेल्या ‘लव्ह जिहाद’ प्रकरणातील सूत्रधारासह प्रकरणात सहाय्यभूत ठरलेल्या चौघांचा शोध व कारवाईची प्रक्रिया पूर्ण झाली. मात्र इतका मोठा कालावधी उलटल्यानंतरही घारगाव पोलीस आजही मुख्य आरोपीपर्यंत पोहोचू शकलेले नाहीत. अशातच आता गेल्या महिन्यात घडलेल्या सामुहीक बलात्कार प्रकरणातील एक आरोपीही पोलिसांच्या हाती तुर्या ठेवून गायब झाला असून गुन्हा दाखल होवून महिना उलटत असतानाही पोलीस त्याचा शोध घेवू शकले नाहीत. त्यामुळे घारगाव पोलिसांच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. विशेष म्हणजे सध्या या पोलीस ठाण्याचा कार्यभार पूर्वी गुन्हेशाखेत ‘धाक’ निर्माण करणार्या सहाय्यक पोलीस निरीक्षकांकडे आहे. त्यामुळे त्यांच्याकडून आरोपीच्या मुसक्या आवळल्या जातील अशी अपेक्षा असताना ती देखील फोल ठरली आहे.

एकामागून एक गुन्हेगारी घटना, फोफावलेले अवैध व्यवसाय आणि प्रचंड हप्तेखोरी यामुळे पठारभागाला अडचणीचे भासू लागलेले घारगाव पोलीस ठाणे गेल्याकाही महिन्यात पूर्वपदावर येत असल्याचे चित्र दिसत होते, मात्र पोट भरण्याच्या नावाखाली राजस्थानातून घारगावात आलेल्या एका पाणीपुरीवाल्यासह ‘जिहादी’ मानसिकतेच्या एका बेकरीवाल्याने संगनमताने परिसरातील एका 26 वर्षीय विवाहितेला नोकरीचे आमीष दाखवून आळीपाळीने सामुहीक बलात्कार केला. 15 सप्टेंबररोजी घारगावातील मुंढे कॉम्प्लेक्समध्ये घडलेल्या या घटनेचा गुन्हा मात्र 15 दिवसांनी दाखल झाला.

याप्रकरणातील पीडितेने संगमनेरातील काही हिंदुत्त्ववादी कार्यकर्त्यांच्या मदतीने 30 सप्टेंबररोजी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी अत्याचार, धमकी आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये घारगावात भोलेशंकर पाणीपुरी
नावाने हातगाडी लावणार्या गणेश प्रजापतीसह त्याच्या हातगाडीजवळच बेकरीची टपरी चालवणारा व कथीत नारायणगावचा रहिवासी असलेला मात्र आजवर त्याचा कोणताही थांगपत्ता न लागलेल्या सैफुल्ला अबुतय्यब शेख हे दोन्ही आरोपी पसार झाले होते. या घटनेने संगमनेर तालुक्याचे आणि विशेषतः पठारभागाचे वातावरण बिघडलेले असताना पोलिसांनी थेट राजस्थानात धडक मारुन अत्याचारानंतर आपल्या मूळगावी गेलेल्या गणेश प्रजापतीच्या मुसक्या आवळल्या.

मात्र या घटनेला आता दीड महिना तर, गुन्हा दाखल होवून महिना उलटत असतानाही गेल्याकाही वर्षांपासून राजरोसपणे घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दित चक्क बसस्थानकाजवळच बेकरीचे दुकान थाटणार्या आणि आसपासच्या नागरिकांना आपण
मूळ नारायणगावचे असल्याची बतावणी करणार्या सैफुल्ला शेखचा कोणत्याही प्रकारचा मागमूस लावण्यात पोलीस अद्यापही अपयशीच आहेत. विशेष म्हणजे गुन्हा दाखल झाल्यानंतर घारगाव पोलिसांनी बेकरीवाल्या सैफुल्लाच्या नारायणगावमधील कथीत पत्त्यावर वारंवार छापेही घातले, मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही. त्यावरुन हा आरोपी खरोखरी भारतीय होता की घुसखोर? अशाही शंका उपस्थित होत आहेत.

दोन वर्षांपूर्वी घारगाव पोलीस ठाण्यात तालुक्यातील बहुधा पहिलाच ‘लव्ह जिहाद’चा गुन्हा दाखल झाला होता. त्या प्रकरणात पठारभागातील राष्ट्रवादीचा पदाधिकारी म्हणून ओळख असलेल्या युसुफ दादा चौगुले याने शादाब तांबोळी या म्होर्याचा वापर करुन लव्ह जिहादचे षडयंत्र घडवले होते. मात्र हा प्रकार समोर आल्यानंतर संपूर्ण तालुक्यात तणाव निर्माण झाल्याने पोलिसांनी
वेगाने तपासाची चक्रे फिरवून पीडितेला हजर करण्यास भाग पाडले. या संपूर्ण घटनाक्रमात पीडितेला अमानुष त्रास दिला गेल्याने तिची मानसिक स्थिती ढासळली होती, त्यामुळे पंधरा दिवसांच्या उपचारानंतर तिने तक्रार दाखल करताच घारगाव पोलिसांनी युसुफ चौगुलेसह त्यानंतर मुंबईतील एकासह अन्य दोघांना अटक केली होती. यातील दोघांना महिनाभरात जामीन झाल्यानंतर चालूवर्षी फेब्रुवारीमध्ये सूत्रधार युसुफ चौगुले यालाही सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला होता.

मात्र महिनाभरातच युसुफ चौगुलेमधला जिहादी जागा झाल्याने त्याने मध्यप्रदेशात जावून बेकायदा शस्त्र खरेदी केली, त्याचा वापर करुन तो समाजात अशांतता निर्माण करण्याची योजना आखत असतानाच मध्यप्रदेश पोलिसांनी तिकडेच त्याच्या नांग्या
ठेचून काढल्या. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाकडून मिळालेला जामीनही अवघ्या महिन्यातच रद्द झाला आणि सुटका होवून गजाबाहेर आलेला चौगुले आता संपूर्ण ट्रायलसाठी पुन्हा कारागृहात गेला. मात्र त्या उपरांतही प्रत्यक्ष मुलीला फसवून पळवून नेणारा शादाब तांबोळी, त्याला प्रत्येकवेळी साथ देणारा कुणाल शिरोळे आणि अयाज पठाण हे तिघे अद्यापही पोलिसांना सापडलेले नाहीत.

त्यांच्या शोधासाठी पोलिसांनी उत्तरप्रदेश, अजमेर, दिल्ली, आसाम, बिहार अशा अनेक ठिकाणी छापेमारी केली, मात्र त्याचा कोणताच उपयोग झाला नाही. अखेर पसार असलेले तिनही आरोपी नेपाळमार्गे पाकिस्तानात पळून गेल्याची आवई उठवून घारगाव पोलिसांनी ‘त्या’ प्रकरणाचा तपास थांबवला. त्यामुळे ‘लव्ह जिहाद’चा विषय विस्मृतीत गेला असतानाच महिनाभरापूर्वी
घारगावात घडलेल्या अत्याचार प्रकरणातही परप्रांतीय जिहादी आढळून आल्याने संगमनेरचे वातावरण पुन्हा तापले असून आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांवरील दबावही वाढत आहे, मात्र पसार झालेला सैफुल्ला शेख कोठेच आढळत नसल्याने आणि त्याची माहितीही मिळत नसल्याने तो भारतीय होता का? अशाही शंका उपस्थित होत आहेत. त्यातून घारगाव पोलिसांच्या तपास पद्धतीवरही प्रश्न उपस्थित झाले असून गुन्हे शाखेत ‘धाक’ निर्माण करणार्या अधिकार्यालाही काहीच करता येत नसल्याने आश्चर्य निर्माण झाले आहे.

तालुक्याचा विस्तार पाहता दीड दशकांपूर्वी 46 गावांच्या पठारभागासाठी घारगाव पोलीस ठाण्याची निर्मिती झाली आणि एका प्रभारी अधिकार्यासह दोन सहाय्यक अधिकारी व 26 कर्मचारी अशा मनुष्यबळासह तेथील कामकाज सुरु झाले. गेल्या 15 वर्षात या पोलीस ठाण्यात येवून गेलेल्या एकाही पोलीस अधिकार्याला विशेष काहीच करुन
दाखवता आले नाही. निष्क्रियतेची अखंड श्रृंखला जोपासणार्या या पोलीस ठाण्याच्या प्रभारी पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे यांची बदली झाल्यानंतर त्यांच्याजागी नवीन नियुक्तिच नसल्याने सध्या पठारभागाच्या सुरक्षेची जबाबदारी सहाय्यक निरीक्षक हेमंत थोरात यांच्याकडे आहे. यापूर्वी स्थानिक गुन्हे शाखेत एकमेकांना वरचढ ठरण्याच्या भूमिकेत त्यांनी जिल्ह्यातील गुन्हेगारांवर ‘धाक’ही निर्माण केला होता, त्याचा पठारभागाला उपयोग होईल असे वाटत असताना ती अपेक्षाही आता जवळजवळ फोल ठरल्याचे दिसू लागले आहे.

