सोनगाव जिल्हा बँक शाखेतील सोन्याच्या दागिन्यांची सत्यता पडताळणी सुरू!
सोनगाव जिल्हा बँक शाखेतील सोन्याच्या दागिन्यांची सत्यता पडताळणी सुरू!
सराफ व कर्जदारांनी हातमिळवणी करून बनावट दागिने गहाण ठेवल्याचा संशय
नायक वृत्तसेवा, राहुरी
अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या राहुरी तालुक्यातील सोनगाव शाखेत सोनेतारण केलेल्या 191 कर्जदारांच्या सुमारे तीन कोटी रुपये कर्जाच्या सोन्याच्या दागिन्यांची सत्यता पडताळणी सुरू झाली आहे. सराफ व कर्जदारांनी हातमिळवणी करून बनावट दागिने गहाण ठेवल्याचा संशय आहे. मंगळवारपर्यंत (ता.10) पोलीस बंदोबस्तात बँकेचे व सहकार खात्याचे अधिकारी, कर्जदार व पंचांसमक्ष सोन्याच्या दागिन्यांची सत्यता पडताळणी सुरू राहणार आहे. त्यासाठी कर्जदारांना वकिलांतर्फे नोटिसा बजावल्या आहेत. त्यामुळे बनावट सोने ठेवलेल्या काही कर्जदारांचे धाबे दणाणले आहेत.

राहुरी येथे जिल्हा बँकेच्या विकास अधिकारी कार्यालयात सात वेगवेगळ्या तारखांना कर्जदारांना त्यांच्या सोन्याच्या पडताळणीसाठी बोलविण्यात आले आहे. सोने खरे निघाले. तर, कर्जाची व्याजासह रक्कम भरून किंवा सोन्याचा लिलाव करून, कर्ज वसुली केली जाणार आहे. बनावट सोने निघाल्यास, सोनगाव शाखेचे सराफ व कर्जदार यांच्यावर फौजदरी गुन्हे दाखल केले जाणार आहेत. सोने पडताळणीच्या दिलेल्या तारखेला कर्जदार गैरहजर राहिल्यास, त्यांच्या अपरोक्ष पंचांसमक्ष सोन्याची पडताळणी केली जात आहे.

दरम्यान, आजपर्यंत तीन तारखांना काही कर्जदारांच्या सोन्याची पडताळणी झाली आहे. त्यात मोठ्या प्रमाणात सोन्याचे दागिने बनावट असल्याचे निदर्शनास आल्याचे खात्रीलायक समजते. परंतु, पडताळणीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत बँकेचे अधिकारी गोपनीयता बाळगत आहेत. दरम्यान, सोनगाव-सात्रळ येथील काही प्रतिष्ठित परागंदा झाल्याची चर्चा सुरू आहे.

याबाबतमाध्यमांशी बोलताना कर्जदार मीना मधुकर वाकचौरे (रा.धानोरे) म्हणाल्या, आमच्या कुटुंबातील मधुकर भाऊसाहेब वाकचौरे (रुपये 2 लाख 42 हजार 922), भाऊसाहेब बाबुराव वाकचौरे (2 लाख 33 हजार 461), इंदुबाई भाऊसाहेब वाकचौरे (48 हजार 636) व माझ्या नावावर (1 लाख 97 हजार 702) सोनेतारण कर्ज थकबाकीची वकीलाची नोटीस मिळाली. 1997 साली एका प्रतिष्ठित व्यक्तीने बँकेत बोलावून आमच्या सह्या घेतल्या. त्यांनीच पैसे घेतले. मी शेतमजुरी करते. पतीचा सलूनचा व्यवसाय असून हातावर काम करणारे आहोत. एवढे मोठे सोने आमचे नाही. कर्जाची रक्कमही आमच्या हाती मिळाली नाही. आता सोनार व पैसे घेतलेली व्यक्ती एकमेकांवर ढकलीत आहेत. आमच्या अज्ञानपणाचा गैरफायदा घेऊन आमची फसवणूक झाली आहे. त्याची लेखी तक्रार गृह खात्याचे सचिव यांच्याकडे केली असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हा बँकेने ‘स्ट्राँगरूम’ केलेल्या शाखांमध्ये सोनेतारण कर्ज देण्याचा निर्णय सहा वर्षांपूर्वी घेतला. इतर बँकांपेक्षा कमी व्याजदरात सोनेतारण कर्ज मिळू लागल्याने कर्जदारांचा ओढा वाढला. मागील वर्षी श्रीरामपूर येथे टाऊन व शिवाजी रोड शाखांमध्ये बनावट सोनेतारण कर्ज प्रकरणे झाल्याचे आढळले. त्यावेळी बँकेतर्फे संबंधित कर्जदार व सराफ यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले. नंतर जिल्हा बँकेत विश्वासार्हता कमी झाल्याने सोनेतारण कर्जदारांची संख्या घटली आहे.
जिल्हा सहकारी बँकेच्या सोनगाव शाखेतील सोनेतारण कर्ज प्रकरणी गहाण सोन्याच्या दागिन्यांची सत्यता पडताळणी सुरू आहे. बँकेने जिल्हा उपनिबंधक यांना पंच म्हणून प्रतिनिधी पाठविण्याची विनंती केली. त्यानुसार राहुरी कार्यालयातील कर्मचार्यांची नेमणूक केली आहे.
– दीपक नागरगोजे (सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, राहुरी)


