माजी शहराध्यक्षांकडून खासदार सदाशिव लोखंडेंचे शरसंधान! एक हजार कोटींचा निधी चर्चेत; सहाय्यकाद्वारा टक्केवारीवरुनही केला घणाघात..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
शिर्डी लोकसभा मतदार संघाची निवडणूक अगदी दोन दिवसांवर येवून ठेपलेली असताना शिवसेनेच्या (शिंदेगट) माजी शहराध्यक्षांनी विद्यमान खासदार आणि महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्यावर शरसंधान साधले असून अनेक गंभीर आरोपही केले आहेत. त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या मजकुरातून दोनवेळा मोदींच्या करिष्म्यावर निवडून आलेल्या खासदारांनी पक्षाऐवजी केवळ आपलाच विकास केल्याची जोरदार टीकाही केली असून दहा वर्षात मतदार संघासाठी आलेल्या एक हजार कोटी रुपयांचा हिशोब देण्याची मागणीही केली आहे. याशिवाय या कालावधीत खासदारांनी सुरु केलेल्या डझनभर कंपन्या, खानापूरातील रुग्णालय, नाफेडमधील कांदा खरेदी अशा अनेक विषयांना स्पर्श करीत शेवटी त्यांनी हिंदूत्त्ववादाची भावना चेतवून त्या द्वारे जनतेचा पैसा ओरबाडला जात असल्याची घणाघाती टीकाही केली. स्वच्छ प्रतिमेचा कार्यकर्ता अशी ओळख असलेल्या माजी शहरप्रमुख सोमनाथ कानकाटे यांनी केलेले आरोप खासदार लोखंडे कशा पद्धतीने खोडतात हे पाहणं आता औत्सुक्याचे ठरणार आहे. मात्र त्यांच्या या आरोपांनी विरोधकांना आयते कोलीत मिळाले असून शिर्डीच्या प्रचारात आता नव्या मुद्द्यांचा समावेश झाला आहे.
खासदार सदाशिव लोखंडे यांनी प्रत्येक विधानसभा मतदार संघात दोन भाटांची नेमणूक केली असून त्यांच्या भाटगिरीवर स्वतःला मिरवत त्यांनी शिर्डी लोकसभा मतदार संघात गटबाजीला प्रोत्साहन देत पक्ष खिळखिळा केल्याचा आरोप करुन गेल्याच महिन्यात सोमनाथ कानकाटे यांनी शिवसेनेच्या (शिंदेगट) शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर गुरुवारी (ता.9) त्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे आपल्या मनातील सल बोलून दाखवली असून खासदार लोखंडे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी पाठवलेल्या मजकुरात ते म्हणतात; गेल्या 25 ते 30 वर्षांपासून शिवसेनेचे काम करीत असताना अनेक चढउतारांचा सामना केला. सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या संस्कारानुसार पक्षात चुकीचे काही घडतं असल्यास त्याचे समर्थन केले जावू शकत नाही. त्यामुळे पक्षातील चुकीच्या गोष्टींवर यापूर्वीही आपण वेळोवेळी बोटं ठेवले आहे.
खासदार लोखंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करिष्म्यावर दोनवेळा विजय मिळवला. गेल्या दहा वर्षात केंद्र सरकारकडून मोठ्या प्रमाणात निधी मिळाला. मात्र या कालावधीत त्या निधीचा वापर करुन संघटनेला बळ देण्याचे काम कधीही घडले नाही. त्यामुळे स्थानिक पातळीवर शिवसेनेत कधीही एकसंघता दिसून आली नाही. गेल्या दोन वर्षाच्या काळात महाराष्ट्राला सामान्य शेतकरी कुटुंबातील एकनाथ शिंदे यांच्या रुपाने कर्तृत्त्ववान मुख्यमंत्री लाभला. दिवसातील 18 ते 20 तास काम करणार्या मुख्यमंत्र्यांनी सामान्य माणूस, मजूर, शेतकरी, कष्टकरी, व्यापारी यांच्यासाठी असंख्य योजनाही आणल्या आणि त्यासाठी भरघोस निधीही दिला. त्यातून मतदार संघातील विविध कामे पूर्ण होवून पक्षात चैतन्य निर्माण करणं शक्य असताना खासदार लोखंडे यांनी मात्र त्याचा कसा वापर केला हे आजवर समजले नाही.
शिर्डी लोकसभा मतदार संघातील प्रत्येक तालुक्यात खासदारांनी आपली ‘लॉबी’ निर्माण केली. त्यातून त्यांच्या विश्वासातील माणसांच्या हाती निधीचा पैसा गेला आणि फस्त झाल्याचा गंभीर आरोपही कानकाटे यांनी केला. यासर्व पार्श्वभूमीवर पक्षातंर्गत अनिश्चितता निर्माण होवून पक्षात गटबाजी वाढली याला जबाबदार कोण याचेही उत्तर पक्षप्रमुखांनी शोधण्याची गरज असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. पक्षाच्या जीवावर पदं मिळतात, पैसा कमवता येतो. मात्र तो पक्षही जगला पाहिजे, वाढला पाहिजे याचा मात्र कधीही विचार झाला नाही. दोनवेळा मोदी लाटेवर स्वार झालेल्या खासदारांनी दहा वर्षात कोणतंही कामं केलं नाही, आता तिसर्यांदा तेच पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मात्र आता ते मतदारांना काय सांगणार? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
मागील दशकात शिर्डी मतदार संघात एक हजार कोटीहून अधिक निधी आला, त्याचा हिशोब पक्षाने घेण्याची गरज असल्याचे सांगताना त्यातून खासदारांनी अनेक ठिकाणी जमिनी घेतल्या, वेगवेगळ्या बारा कंपन्यांची नोंदणीही केली, वेगवेगळे उद्योग सुरु केले, खानापूरमध्ये शंभर खाटांच्या अद्ययावत खासगी रुग्णालयाचे कामही सुरु आहे, राज्यातील सात मोठ्या शहरांमध्ये होलसेल जेनरिक औषधांची दुकाने सुरु केली, नाफेड मार्फत कांदा खरेदीचे काम सामान्य कार्यकर्त्यांला देणं अपेक्षित असताना त्यांनी त्यावरही डल्ला मारला व स्वतःच्या मुलाच्या नावाने कांद्याचे कामही घेतले. याशिवाय खासदारांनी आपल्या खासगी स्वीय्य सहाय्यकाच्या माध्यमातून मतदार संघातील प्रत्येक शासकीय कामातून दहा टक्के कमिशन मिळवल्याचा घणाघाती आरोपही कानकाटे यांनी केला आहे.
खासदार व त्यांच्या बगलबच्च्यांनी मतदार संघातील प्रत्येक तालुक्यातील दोन-चार भाटांची नेमणूक केली आहे. त्यांच्या मार्फत स्वतःची स्तुती करवून घेत भ्रष्टाचार दडपला जात आहे आणि विरोधी गटाच्या उमेदवाराचे मात्र त्यावरुनच शरसंधान केले जात आहे. दहा वर्षांची संपूर्ण कारकीर्द काळवंडलेली असताना हे सर्व प्रकार जेव्हा चव्हाट्यावर येतील तेव्हा पक्षाची अवस्था कशी असेल याचाही विचार पक्षश्रेष्ठींनी करण्याची गरज असल्याचे माजी शहरप्रमुख सोमनाथ कानकाटे यांनी आपल्या प्रसिद्धीपत्रकातून सांगितले आहे. त्यांच्या या गंभीर आरोपांनंतर शिर्डीच्या निवडणुकीचा नूर पालटण्याची शक्यता असून विरोधकांनाही आयते कोलीत हाती लागले आहे.
पक्षाने आपल्यालाच उमेदवारी द्यावी यासाठी खासदार सदाशिव लोखंडे यांनी शिर्डी लोकसभा मतदार संघात गटबाजीला खतपाणी घातले. त्यामुळे सच्चे शिवसैनिक दुखावले गेल्याने गेल्या सहा महिन्यांच्या कालावधीत जिल्हाप्रमुखांसह अनेक तालुका व शहर प्रमुखांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले होते. ‘गायब’ खासदार अशी ओळख असलेल्या लोखंडे यांच्याबाबत मतदारांमध्येही मोठी नाराजी असल्याचे भाजपच्या अंतर्गत सर्वेक्षणातून समोर आले होते. मात्र सरतेशेवटी भाटांच्या जीवावर त्यांनी उमेदवारी पदरात पाडण्यात यश मिळवले, मात्र आता स्वपक्षातील एका स्वच्छ प्रतिमेच्या माजी शहराध्यक्षांनी त्यांचे शरसंधान केल्याने त्याला ते कशापद्धतीने सामोरे जातात याकडे आता शिर्डीचे लक्ष लागले आहे. मात्र सोमनाथ कानकाटे यांच्या या ‘बॉम्ब’ने विरोधकांना ऐन निवडणुकीच्या तोंडावर मोठा मुद्दा हाती लागला आहे हे मात्र खरे.