अंमली पदार्थांच्या पंक्ती उठवणार्‍या संन्यस्थाची लीला संपुष्टात! नागरिकांच्या तक्रारीनंतर प्रवराकाठावरील ‘पाठक धर्मशाळा’ पालिकेकडून जमीनदोस्त

नायक वृत्तसेवा, संगमनेर
अमृतवाहिनीच्या काठावरील पाठक धर्मशाळेवर बेकायदा कब्जा करुन तेथे अंमली पदार्थांच्या पंक्तीउठवणार्‍या कथीत संन्यस्थाची लीला पालिकेच्या अतिक्रमण विभागाने संपुष्टात आणली. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. मोडकळीस आलेल्या या वास्तूत संबंधिताने अंमली पदार्थ सेवनाचा अड्डाच निर्माण केला होता. त्यामुळे अनेक तरुणांना त्याचे व्यसन जडण्यासह वाळू तस्करांचाही अड्डा निर्माण झाल्याने या ठिकाणाबाबत अनेकांनी तक्रारी केल्या होत्या. पालिकेने त्याची दखल घेत अखेर ‘त्या’ कथित आश्रमावर जेसीबीचा पंजा फिरवला. या कारवाईने साईनगर, पंपींग स्टेशनसह परिसरातून समाधान व्यक्त होत आहे.

पुराणातील दंडकारण्याच्या वर्णनात अमृतवाहिनी प्रवेरचे स्थान अबाधित आहे. अगदी समुद्र मंथनापासून ते देशाच्या स्वातंत्र्य लढ्यापर्यंतच्या विविध रथी-महारर्थींनी या नदीचे पाणी पिवून ऐच्छिक उड्डाणे घेतली आहेत. गोदावरीच्या खोर्‍यातील या नदीचे पावित्र्य असाधारण असल्याने प्रागैतिहासापासून ऋषीमुनी आणि महान तपस्वी महापुरुषांचा संचार या भागात झाल्याचे असंख्य दाखलेही ग्रंथ, पुराण व इतिहासात सापडतात. अमृतवाहिनीच्या काठावरील भवानी बुवांचा आश्रम आणि त्यांची महती तर अवघ्या जिल्ह्याला ज्ञात आहे. नंतरच्या काळात गंगामाई परिसरात वास्तव्यास असलेले सीतारामदास महाराज, कमलदास महाराज आणि हनुमान टेकडीवरील बहिरेबाबा यांच्या वास्तव्याने या परिसरातील पावित्र्य कायम राहीले.

पूर्वी गावांना वेशी असत, तशा संगमनेरच्या चोहोबाजूच्या रस्त्यांना दारबंद वेशी होत्या. दिल्लीनाका (तीनबत्ती चौक), चंद्रशेखर चौक, अरगडे गल्ली व अकोले नाका याठिकाणी असलेल्या वेशींचे दरवाजे सूर्यास्तानंतर बंद केले जात. त्यानंतर संगमनेर शहरात येणार्‍यांना सूर्यादयापूर्वी गावात प्रवेश नसायचा. मात्र त्याचवेळी त्या पथिकांची गैरसोय होवू नये यासाठी वेशीबाहेरील मारुती मंदिरात अथवा प्रवरा काठावरील पाठक धर्मशाळा आणि साटम मठात रात्रभर त्यांच्या निवार्‍याची व्यवस्था असत. शहरातील माळीवाडा, अरगडे गल्ली आणि क्षत्रिय समाजाच्या दिल्लीनाक्यावरील मारुती मंदिरात तशी सोय असे. त्यासोबतच वरील दोन ठिकाणच्या मठांमध्येही सूर्यास्तानंतर येणार्‍यांना थांबता येई.

कालांतराने या गोष्टी पडद्याआड गेल्या, वेशीच्या बाहेर असणारी मंदिरंही गावात आली आणि मानवी वस्त्या तर त्याही पुढे कितीतरी अंतराने वाढल्या. कालौघात वेस ही संकल्पनाही इतिहास जमा झाली. आजच्या स्थितीत कधीकाळी वेशीवर असलेली ती मंदिरे आणि जीर्ण अवस्थेतील वरील दोन्ही मठ अस्तित्वात आहेत. मंदिरांमध्ये नागरिकांचा संचार आहे, मात्र पाठक धर्मशाळेची अवस्था ‘व्यसनी समुदायाचा अड्डा’ अशी बनली आहे.

गेल्या काही वर्षांपासून कोणा एका कथीत संन्यस्थाने या धर्मशाळेचा परस्पर ताबा घेवून तेथेच आपला मुक्काम थाटला होता. संबंधित इसम सुरुवातीला या परिसराची दररोज स्वच्छता करीत, त्याने त्या परिसरात काही झाडेही लावली. त्यामुळे पाहणार्‍याला त्याच्याविषयी सहानुभूती निर्माण झाली. मात्र त्यानंतर काही दिवसांतच त्याने धर्मशाळेच्या चारही बाजू झाकून या जागेवर जणू आपला हक्कच निर्माण करण्याचा प्रयत्न केला. हळूहळू येथे माणसांचा आणि त्यातही खास करुन तरुणांचा राबता वाढू लागला. अचानक वाढलेली येथील गर्दी कोणता धार्मिक उपदेश घेण्यासाठी नव्हे तर गांजा, चरस सारख्या अंमली पदार्थ्यांच्या सेवनासाठी होतेय हे समजायला या परिसरातील नागरिकांना वेळ लागला नाही.

त्यातच नदीपात्रातून वाळू वाहतूक करणार्‍यांनाही ही जागा आणि त्यातील बाबा जवळचे वाटू लागल्याने अडगळीत पडलेल्या धर्मशाळेतील माणसांची गर्दी दिवसोंदिवस वाढतच राहीली. त्यातून ही धर्मशाळा व्यसनाधीन लोकांचा अड्डाच बनू लागल्याने परिसरातील नागरिकांनी पालिकेकडे तक्रारी करण्यास सुरुवात केली. वाढत्या तक्रारी पाहून पालिकेनेही अतिक्रमण विभागाच्या माध्यमातून थेट कारवाईचा बडगा उगारीत अखेर कथीत संन्यस्थाच्या तावडीतून धर्मशाळा मोकळी करीत ती उध्वस्त केली.. त्यामुळे अनेक पालकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

अमृतवाहिनी प्रवरा व साई मंदिराच्या परिसरात नेहमीच संगमनेरकरांचा मोठा राबता असतो. याच परिसरात एक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयही असल्याने दिवसभर विद्यार्थ्यांचीही मोठी रेलचेल असते. या धर्मशाळामुळे अनेक चांगल्या कुटुंबातील तरुण मुले गांजा, चरस सारख्या अंमली पदार्थ्यांच्या आहारी जावू लागली होती. जागृक नागरिकांच्या तक्रारीनंतर पालिकेने वेळीच प्रवराकाठावरील ही धर्मशाळा उध्वस्त केल्याने परिसरातून समाधान व्यक्त होत आहे.

Visits: 46 Today: 2 Total: 394260

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *