संगमनेरचे विद्यार्थी देशाचा नावलौकिक वाढवतील ः मालपाणी उच्च शिक्षणासाठी विदेशात जाणार्या विद्यार्थ्यांचा संगमनेर मर्चंट बँकेतर्फे सत्कार

नायक वृत्तसेवा, संगमनेर
उच्च शिक्षणासाठी विदेशामध्ये जात असलेले संगमनेरचे विद्यार्थी आपल्या चमकदार कामगिरीने जगामध्ये देशाचा नावलौकिक नक्कीच वाढवतील, असा आत्मविश्वास उद्योगपती राजेश मालपाणी यांनी व्यक्त केला.

संगमनेर मर्चंटस बँकेच्यावतीने अमेरिका आणि इंग्लंड या देशांमध्ये उच्च शिक्षणासाठी जात असलेल्या दहा विद्यार्थ्यांचा सत्कार आणि निरोप समारंभ बँकेच्या स्वामी विवेकानंद सभागृहात संपन्न झाला. याप्रसंगी मालपाणी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून मालपाणी उद्योग समूहाचे संचालक जय मनीष मालपाणी, स्किनवेस्ट या ब्युटी ब्रँडच्या प्रणेत्या दिव्या मालपाणी, बँकेचे चेअरमन संतोष करवा, व्हाईस चेअरमन प्रकाश कलंत्री आदी उपस्थित होते. सिमरन अत्रे, जय गाडे, गंधार पानसरे, चिदंबर धापटकर, प्रणव पगडाल, तन्मय राठी, ओम कोळपकर, धनंजय सोनवणे, आयुष पडतानी या विद्यार्थ्यांनी विविध विद्याशाखांमधील उच्च शिक्षणासाठी अमेरिका आणि इंग्लंड येथील नामांकित विद्यापीठांमध्ये प्रवेश घेतला आहे. त्यासाठी येणारा खर्च बराच मोठा असल्याने जरूरी प्रमाणे संगमनेर मर्चंट बँकेच्यावतीने त्यांना आर्थिक पाठबळ देण्यात आले आहे. के सर्व विद्यार्थी म्हणजे बुद्धिमत्तेच्या बळावर जागतिक स्तरावर आपल्या मातृभूमीचे नाव झळकविणारे ‘टॉप टेन’ विद्यार्थी ठरतील असा आत्मविश्वास मालपाणी यांनी व्यक्त करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाची सुरुवात श्रीसाईबाबांच्या प्रतिमेला जय मालपाणी व दिव्या मालपाणी यांच्या हस्ते माल्यार्पण करून करण्यात आली. सर्व विद्यार्थ्यांना सत्कारामध्ये भेटवस्तू म्हणून चेअरमन संतोष करवा यांच्यावतीने छानशा लॅपटॉप बॅग समवेत राजेश मालपाणी तर्फे ओपन सिक्रेट हे आत्मचरित्र आणि स्वर्गीय उद्योगपती ओंकारनाथजी मालपाणी यांनी त्यांना देश विदेशात शिकत असताना लिहिलेल्या पत्रांचे पत्रसंस्कार ही पुस्तके व सोबत एक प्रेरक पत्र देण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांना एकत्रितपणे भव्य चाळीस फुटांचा भव्य पुष्पहार घालून जंगी सत्कार करण्यात आला.

सर्व विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी उच्च शिक्षणासाठी मर्चंटने दिलेल्या अर्थसहाय्याबद्दल आपापल्या भाषणातून कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालक महेश डंग यांनी केले तर आभारप्रदर्शन मुख्य कार्यकारी अधिकारी विनय दुनाखे यांनी केले. जय मालपाणी व दिव्या मालपाणी यांचा परिचय संचालक सम्राट भंडारी यांनी करून दिला. कार्यक्रमाला बँकेचे संचालक सर्वश्री राजेंद्र वाकचौरे, मधुसूदन नावंदर, मुकेश कोठारी, रवींद्र पवार, श्याम भडांगे, कीर्ती करवा, डेप्युटी जनरल मॅनेजर विजय बजाज, असिस्टंट जनरल मॅनेजर विठ्ठल कुलकर्णी आदिंसह विद्यार्थांचे पालक व शहरातील मान्यवर प्रतिष्ठित उपस्थित होते. या आगळ्यावेगळ्या सत्कार व अनुभवातून दिशादेणार्या सोहळ्याचे व परदेशी जाणार्या विद्यार्थांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
