नाशिक-पुणे महामार्गाचा दुचाकींच्या पार्किंगसाठी वापर!

सह्याद्री महाविद्यालयाजवळील प्रकार; पोलिसांचे दुर्लक्ष

नायक वृत्तसेवा, संगमनेर 
शहरातून जाणाऱ्या जुन्या नाशिक – पुणे महामार्गावर  सह्याद्री महाविद्यालयासमोर विद्यार्थ्यांच्या दुचाकी वाहनांचे रस्त्यावरच पार्किंग होत असल्याने वाहतुकीचा खोळंबा होत असून, नागरिक व वाहनचालक त्रस्त झाले आहेत. महाविद्यालय प्रशासनाने वाहनांच्या  पार्किंगची स्वतंत्र सोय न केल्याने विद्यार्थी थेट रस्त्यावरच गाड्या उभ्या करतात, परिणामी सकाळी आणि दुपारी महाविद्यालय भरण्याच्या आणि सुटण्याच्या वेळेला या महामार्गावर वाहतूक कोंडी नित्याची झाली असून वाहतूक पोलिसांचे या गंभीर बाबीकडे सपशेल दुर्लक्ष होत असल्याने स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
संगमनेर येथील सह्याद्री महाविद्यालयात शहर आणि तालुक्यातील हजारो विद्यार्थी दररोज शिक्षण घेण्यासाठी जात येत असतात. पूर्वी बहुतेक विद्यार्थी हे एसटी बसने यायचे आणि जायचे, मात्र कोरोना काळात एसटी बस सेवा अनेक गावात विस्कळीत झाली, ती अद्यापही पूर्वपदावर आलेली नाही. परिणामी पालकांनी आपापल्या पाल्यांना महाविद्यालयीन शिक्षणासाठी दुचाकी घेऊन दिलेल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे यात अनेक अल्पवयीन विद्यार्थी आहेत. ज्यांच्याकडे दुचाकी चालवण्याचे लायसन्स देखील नाहीत. आणि विशेष म्हणजे वाहतुकीचे नियम देखील यातील अनेक विद्यार्थ्यांना माहीत नाही. त्यामुळे सकाळी महाविद्यालय सुरू होण्याची वेळ आणि दुपारी सुटण्याची वेळ या दोन्ही सत्रात सह्याद्री महाविद्यालयासमोरून जाणारा जुना नाशिक-पुणे हा रस्ता अक्षरशः दुचाकींच्या रांगा आणि विद्यार्थ्यांच्या गर्दीने ठासून भरलेला दिसतो. त्यामुळे इतर वाहनचालकांना रस्ता अरुंद झाल्याने त्रास सहन करावा लागत आहे. महाविद्यालय परिसरात येथील शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांच्या वाहनांना पार्किंग उपलब्ध आहे. मात्र तेथे विद्यार्थ्यांच्या दुचाकी पार्क करण्यासाठी पार्किंगची व्यवस्था महाविद्यालय प्रशासनाने न केल्याने विद्यार्थ्यांना आपली दुचाकी  उभी करण्यासाठी रस्ताच एकमेव पर्याय उरला आहे. त्यामुळे वाहतूक विस्कळीत होत असून काही वेळा या ठिकाणी किरकोळ अपघातांच्या घटनाही घडल्या आहेत. स्थानिक नागरिकांनी अनेकदा ही बाब संबंधितांच्या निदर्शनास आणून दिली असली, तरी अद्याप त्यावर ठोस उपाययोजना झालेली नाही.
पार्किंगची समस्या फक्त सह्याद्री महाविद्यालयापुरतीच नव्हे, तर शहरातील मेनरोड, बाजारपेठ, नेहरू चौक, तेली खुंट, अशोक चौक, तहसील कार्यालय परिसर, नवीन नगर रोड, तीन बत्ती चौक, शिवाजी पुतळा आणि शहराच्या इतर भागातही पार्किंग व्यवस्थेचा अगदी बट्ट्याबोळ झाला आहे. या सर्व ठिकाणी विविध दुकाने आहेत. या दुकानांमध्ये विविध खरेदीसाठी शहर, तालुक्याच्या ग्रामीण भागातूनच नव्हे तर शेजारच्या तालुक्यातून अनेक जण येत असतात. काही व्यापाऱ्यांनी आपल्या ग्राहकांची पार्किंगची गैरसोय दूर केली असली तरी बहुतेक व्यापाऱ्यांनी मात्र   आपल्या दुकानांमध्ये येणाऱ्या ग्राहकांसाठी पार्किंगची कोणतीही सोय केलेली नाही. त्यामुळे ग्राहक रस्त्यावरच वाहने उभी करतात. परिणामी या रस्त्यावरून जाणाऱ्यांना हकनाक त्रास सहन करावा लागतो आहे. यातून अनेकदा  भांडणे आणि मारामाऱ्या झाल्याच्या घटनाही लोकांच्या विस्मरणात गेलेल्या नाहीत. अशातच आता पंधरा दिवसावर
दिवाळी आली आहे. सणासुदीच्या या काळात शहरातील सर्वच रस्त्यांवर गर्दी वाढते. त्यात रस्त्यावरच उभी केलेली दुचाकी आणि चारचाकी वाहने वाहतुकीच्या अडथळा निर्माण करतात.  त्याचबरोबर शहरातील अनेक रुग्णालयांना देखील पार्किंग व्यवस्था नसल्याने तेथेही दुचाकी आणि चार चाकी वाहने रस्त्यावर उभी असल्याचे चित्र सर्रास पाहायला मिळते.या पार्श्वभूमीवर प्रशासनाने  उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.
दरम्यान शहरातील नागरिकांच्या सुरक्षित आणि सुलभ पादचारी मार्गांसाठी बांधण्यात आलेले फुटपाथ आता व्यावसायिकांच्या ताब्यात गेले आहेत. विविध ठिकाणी छोटे-मोठे व्यवसायिक, विक्रेते आणि दुकानवाले यांनी फुटपाथवर आपली दुकाने थाटल्याने पादचाऱ्यांना फुटपाथ सोडून रस्त्यावरून चालण्याची वेळ येत आहे.
जुना पुणे-नाशिक हा मुख्य रस्ता शाळांच्या परिसरात ही समस्या अधिक तीव्र असून, सकाळ-संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यावेळी वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असल्याने अपघाताचा धोका देखील वाढला आहे. पालिका प्रशासनाकडून अधूनमधून अतिक्रमणविरोधी मोहिमा राबविल्या जात असल्या तरी काही दिवसांतच हे व्यापारी पुन्हा त्याच ठिकाणी परत येतात. त्यामुळे या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
दिवाळीचा सण जवळ येत असल्याने येत्या काही दिवसांत शहरातील वाहतुकीचा ताण वाढणार आहे. रस्त्यावर उभी केलेली वाहने या काळात वाहतुकीस गंभीर अडथळा ठरू शकतात.  प्रशासनाने अगोदरच योग्य नियोजन करून महाविद्यालये आणि व्यापाऱ्यांना पार्किंग व्यवस्था करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी त्रस्त नागरिकांनी केली असून चुकीच्या पार्किंगविरोधात विशेष मोहीम हाती घेण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले आहे.
वाढत्या लोकसंख्येसोबतच रस्त्यांवरील वाहनांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. मात्र, पार्किंगसाठी आवश्यक जागा आणि नियोजनाचा गंभीर अभाव आहे. महाविद्यालये, व्यापारी संकुले आणि स्थानिक प्रशासन या तिन्ही घटकांनी समन्वयाने काम केल्याशिवाय ही समस्या सुटणार नाही.
Visits: 68 Today: 3 Total: 1424990

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *