अवघ्या चार महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या विवाहितेची आत्महत्या! सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल करण्यासाठी नातेवाईकांनी मृतदेह नेला पोलीस ठाण्यात..

नायक वृत्तसेवा, घारगाव
सुखी संसाराची स्वप्नं रंगवत अवघ्या चारच महिन्यापूर्वी सासरी गेलेल्या 24 वर्षीय तरुणीने सासरच्या छळाला वैतागून आपल्या माहेरी विहिरीत उडी घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना तालुक्याच्या पठारभागातून समोर आली आहे. सपना सोमनाथ गेठे (वय 24) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव असून सोमवारी (ता.28) ती घरातून बेपत्ता झाली होती, आज सकाळी हिरेवाडीनजीकच्या एका विहिरीत तिचा मृतदेह आढळून आला. शवविच्छेदनानंतर तिच्या माहेरच्या मंडळींनी मयतेचा मृतदेह थेट घारगाव पोलीस ठाण्यात नेवून समनापूर येथील सासर असलेल्या मंडळींवर जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नसल्याची भूमिका घेतली, त्यामुळे काहीसा तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर घारगाव पोलिसांनी पती, सासरा, दीर व सासू अशा चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार पठारावरील साकूरनजीक असलेल्या हिरेवाडी येथील सावळेराम लहानू खेमनर यांची कन्या सपना हिचा विवाह गेल्या 9 मार्च, 2021 रोजी समनापूर येथील पांडुरंग गेठे यांचा मुलगा सोमनाथ याच्यासोबत मोठ्या थाटामाटात झाला. सुखी संसाराची स्वप्नं रंगवत ही तरुणी मोठ्या आनंदाने आपल्या जन्मदात्या वडिलांचे घर सोडून समनापूर येथील सासरी आली. लग्नानंतरचे चार दिवस आनंदात गेल्यानंतर गेठे कुटुंबाची लालसा समोर आली आणि अंगावरची हळद उतरण्याआधीच या नवविवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ सुरु झाला. सुरुवातीला तिने हे सगळं सहन केलं, मात्र अत्याचाराचा प्रकार वाढतच गेल्याने अखेर ती आपल्या माहेरी आली, मात्र डोक्यात काहीतरी विचार घेवूनच.

आपल्या लाडाच्या लेकीच्या संसारात सुरु झालेला हा प्रकार पाहून त्या दुर्दैवी पित्याच्या पायाखालची जमीनच सरकली. मात्र इतर नातेवाईकांनी होईल चांगलं काहीतरी अशी आशा दाखवल्याने त्या भरवशावर ते चांगले होईल अशी अपेक्षा करुन आपल्या लेकीला समजूत घालत होते. त्याच दरम्यान गेल्या सोमवारी (ता.28) सदर विवाहिता आपल्या घरातून बेपत्ता झाली. तिच्या नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला मात्र ती आढळली नाही. याबाबत ती हरवल्याची तक्रारही घारगाव पोलीस ठाण्यात दाखल झाली. तिचा सर्वत्र शोध सुरु असतानाच आज (ता.30) सकाळी तिचा मृतदेह हिरेवाडीतील एका विहिरीत आढळून आला. आपल्या लेकीचा असा करुण अंत पाहून तिच्या जन्मदात्यांनी एकच टाहो फोडला.

घारगाव पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह बाहेर काढल्यानंतर मयतेचे शवविच्छेदन करण्यात आले. तोवर तिच्या नातेवाईकांची मोठी गर्दी झाल्याने या घटनेतून संताप निर्माण झाला आणि शवविच्छेदनानंतर मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेण्याऐवजी थेट रुग्णवाहिकेतून घारगाव पोलीस ठाण्यात नेण्यात आला. यावेळी संतप्त नातेवाईकांनी जोपर्यंत मुलीचा पती, दीर व सासू-सासर्‍यांवर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली जात नाही तोपर्यंत मृतदेह येथून हलविणार नाही अशी भूमिका घेतली.

त्यावर पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी तुमच्या तक्रारीनुसार पती सोमनाथ पांडुरंग गेठे, सासरा पांडुरंग किसन गेठे, दीर बाळू पांडुरंग गेठे व सासू सुमनबाई पांडुरंग गेठे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यास तयार असल्याचे सांगितले. त्यानंतर जमलेल्या इतर मंडळींनी मयतेच्या नातेवाईकांची समजूत काढली. आणि पोलिसांनी वरील चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. या वृत्ताने पठारासह संपूर्ण तालुक्यात संताप निर्माण झाला असून अवघ्या चार महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या तरुणीने इतक्या टोकाचे पाऊल उचलल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

Visits: 175 Today: 1 Total: 1917960

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *