शेवगाव येथील उद्योजक सातपुते हत्येप्रकरणी पत्नी पोलिसांच्या जाळ्यात न्यायालयाकडून 28 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी; पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू

नायक वृत्तसेवा, शेवगाव
शेवगाव येथील उद्योजक रामचंद्र उर्फ रामजी सातपुते यांची हत्या त्यांच्या पत्नीनेच केल्याचे पुरावे अखेर पोलिसांना सापडले आहेत. त्यामुळे तब्बल सात वर्षांनंतर सातपुते यांची पत्नी शांताबाई सातपुते हिला अटक करण्यात आली आहे. ती सध्या पोलीस कोठडीत असून, तिची चौकशी केली जात आहे. त्यातून खुनाचे नेमके कारण आणि अधिक तपशील पुढे येऊ शकेल.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेवगावमधील शास्त्रीनगर येथील रामचंद्र उर्फ रामजी साहेबराव सातपुते 8 सप्टेंबर, 2013 रोजी रात्री दीडच्या सुमारास दोन गोळ्या लागून गंभीर जखमी झाले होते. नंतर त्यांचा मृत्यू झाला. ही घटना नेमके कशी घडली, याबद्दल त्यावेळी काहीच ठोस माहिती मिळत नव्हती. अनेक शक्यता व्यक्त होत असल्या तरी तसे ठोस पुरावे पोलिसांच्या हाती लागत नव्हते. कोणी तक्रारही देत नव्हते, किंवा संशयही व्यक्त करीत नव्हते. त्यामुळे शेवगाव पोलीस ठाण्यात अकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली.

मध्यरात्री हा गोळीबार कसा झाला याबद्दल तपास सुरू असताना कोणी तरी गोळ्या झाडून खून केल्याचा परिस्थितीजन्य पुरावा आढळून आला. त्यामुळे 30 डिसेंबर, 2017 मध्ये शेवगाव पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक सुरेश सपकाळे यांनी स्वत: फिर्यादी होऊन खुनाचा गुन्हा दाखल केला. यामध्ये सातपुते यांच्या पत्नी शांताबाईवर संशय घेण्यात आला होता.
गुन्ह्याचे किचकट स्वरूप लक्षात घेऊन तत्कालीन पोलीस अधीक्षकांनी या गुन्ह्याचा तपास पोलीस उपअधीक्षकांकडे सोपविला. त्यानंतर शेवगावचे पोलीस उपअधीक्षक सुदर्शन मुंढे यांनी या गुन्ह्याचा बारकाईने तपास सुरू केला. गुन्ह्यात वापरण्यात आलेले शस्त्र औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयाच्या न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविले. मुंबई येथील बॅलेस्टिक एक्सपर्टकडून अभिप्राय घेतला. यातून शांताबाई हिच्याविरूद्ध पोलिसांना ठोस पुरावे मिळाले. मात्र, या सर्व तपासात मोठा कालावधी गेला. अखेर 23 डिसेंबर, 2020 रोजी आरोपी शांताबाईला पतीच्या खुनाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली. पतीवर दोन गोळ्या झाडून खून केल्याचा तिच्यावर आरोप आहे. तिला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने 28 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. आता पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक सुदर्शन मुंढे, नितीन दराडे, संजय बडे, रोहिणी घरवाढवे यांचे पथक तपास करीत आहे. शांताबाईने नेमक्या कोणत्या कारणासाठी हत्या केली, तिला आणखी कोणी मदत केली का, याचा तपास पोलीस करीत आहेत.

Visits: 132 Today: 2 Total: 1098266

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *