उपनगरांसह मुख्य मार्गावर मोकाट जनावरांचा उपद्रव!

नायक वृत्तसेवा, संगमनेर
शहरातील मुख्य मार्गासह उपनगरातील रस्त्यांवर सध्या मोकाट जनावरांचा उपद्रव वाढला आहे. दिवस – रात्र ही जनावरे रस्त्यावर फिरत असल्याने वाहन चालकांसह पायी जाणारे पादचारी त्रस्त झाले असून मोकाट जनावरांच्या उपद्वापाने आरोग्य व स्वच्छतेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.त्यासाठी या समस्येवर पालिकेने कायमस्वरूपी तोडगा काढण्याची आवश्यकता आहे.

विशेषतः शहरातील मुख्य रस्त्यांपासून उपनगरांपर्यंत, तसेच जुन्या पुणे-नाशिक महामार्गावर या मोकाट जनावरांचा उपद्रव वाढला आहे. गाई, कुत्रे, डुक्कर, गाढव यांसारखी जनावरे रस्त्यांच्या मधोमध उभे राहत असल्याने पादचाऱ्यांबरोबरच वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. अनेकदा ही जनावरे अचानक वाहनांना आडवी आल्याने अपघात घडत असून यात अनेक जण जखमी झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. सकाळी आणि संध्याकाळच्या गर्दीच्या वेळेत ही जनावरे रस्त्यांवर बसतात किंवा चालत्या वाहनांसमोर अचानक धावत जातात. यामुळे दुचाकीवरील वाहनचालकांचा तोल जाऊन अपघात होण्याची शक्यता निर्माण होते. अनेक ठिकाणी गाईंचे व गाढवांचे कळप रस्त्यावर वावरतांना दिसतात. तर डुकरांची टोळी रस्त्याच्या कडेला पडलेल्या घाणीवर ताव मारताना दिसते. त्यातच कुत्र्यांचे टोळके ही त्यांच्यातील एकमेकांच्या जिरवा जिरवीत रस्त्यावर धाव घेत असल्याने रस्त्याने जाणाऱ्या पादचाऱ्यांना कुत्रे चावण्याची आणि दुचाकीस्वरांना दुचाकीवरून पडण्याची भीती वाटते.त्यामुळे वाहनचालकांसह नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.यामध्ये अनेक जण किरकोळ ते गंभीर जखमी झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

रोजच्या रस्त्यांवर होणाऱ्या या त्रासामुळे अपघातांची शक्यता वाढली असून यावर उपाययोजना करण्याची गरज आहे.
पूर्वी पालिकेने मोकाट जनावरांना पकडण्यासाठी मोहिम राबविली होती, परंतु काही दिवसांतच ती थंडावली. त्यामुळे मोकाट जनावरांचा त्रास पुन्हा वाढला आहे. शहरातील कचऱ्याच्या ढिगांवर अन्नाच्या शोधात ही जनावरे गर्दी करतात आणि नंतर तेथूनच रस्त्यावर येतात. त्यामुळे स्वच्छता आणि वाहतुकीचा प्रश्न दोन्हीही वाढले आहेत. आरोग्याचा धोका देखील वाढत आहे. कुत्र्यांच्या चावण्याच्या घटना तसेच डुक्करांच्या संचारामुळे दूषित वातावरण निर्माण होते. प्रशासनाने जनावरांना पकडण्यासाठी कार्यक्षम पथक नेमणे आवश्यक आहे. सध्या या समस्येवर तातडीने कारवाई होणे आवश्यक असून शहरातील रस्ते वाहनांसाठी आहेत, जनावरांसाठी नव्हेत. यासाठी पालिका प्रशासनाने शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी ठोस आणि सातत्यपूर्ण मोहीम हाती घ्यावी, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.

शहरातील जुना पुणे-नाशिक महामार्ग, बसस्थानक परिसर, तसेच उपनगरांकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यांवर ही जनावरे मोठ्या प्रमाणात दिसून येतात. दिवसाच्या कोणत्याही वेळी रस्त्यांच्या मधोमध गायींचे कळप किंवा गाढवांचे टोळके निवांत उभे राहिल्याचे आणि बसल्याचे दृश्य आता नेहमीचे झाले आहे. तर काही ठिकाणी डुकरांच्या झुंडी कचऱ्याच्या ढिगांवर खाद्य शोधत फिरतांना दिसतात. रात्रीच्या सुमारास यातील काही जनावरे बसस्थानक परिसरात मुक्कामाला येतात आणि सकाळ होण्यापूर्वी या परिसरातून नेहमीच्या कार्याला निघून जातात. त्यामुळे बसस्थानक परिसरात या जनावरांचे मलमूत्र इतके पडलेले असते व त्याची दुर्गंधी पसरते. त्यामुळे आरोग्याचाही प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे.

Visits: 47 Today: 1 Total: 1111194
