शिवसेनेच्या माजी जिल्हाप्रमुखांची संगमनेरात ‘बिन बादल बरसात’! गाठीभेटी आणि स्वप्नांची खैरात; निवडणुकीची मात्र कोणतीही चिन्हे नाहीत..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
आयोगाकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर होवूनही वेगवेगळ्या कारणांनी राज्यातील 92 नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणूका गेल्या दीड वर्षांपासून खोळंबल्या आहेत. सध्या ओबीसी आरक्षणासह आघाडी सरकारच्या नव्याने प्रभाग रचनेवरुन हा विषय सर्वोच्च न्यायालयात अडकला आहे. त्यातून त्याची सुटका होण्याचे अद्याप कोणतेही ठळक संकेत नसताना आणि त्या कारणाने विद्यमान आणि इच्छुक उमेदवारांनी अज्ञातवास पत्करलेला असताना शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख जयवंत पवार यांनी मात्र शहराच्या विविध भागांत फिरुन साखर पेरायला सुरुवात केली आहे. शहराच्या वेगवेगळ्या प्रभागात त्यांच्या वाढलेल्या राजकीय बैठका आणि त्यातून नागरिकांना दाखवले जाणारे समृद्ध शहराचे स्वप्नं यामुळे जिल्हाप्रमुखांची संगमनेरात ‘बिन बादल बरसात’ सुरु असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. त्यातून सध्यातरी अडगळीत असलेल्या पालिका निवडणुकांनाही नव्याने हवा मिळू लागल्याने ‘पवार’ यांच्या भेटीगाठी शहरात ‘लक्ष्यवेधी’ ठरु लागल्या आहेत.

27 डिसेंबर 2021 रोजी संगमनेर नगरपरिषदेच्या सन 2016 ते 2021 या कालावधीतील सदस्यांची मुदत संपुष्टात आली. तेव्हापासून पालिकेवर प्रशासकांचे राज्य आहे. या दरम्यान त्याचवर्षी सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षण रद्द केल्याने त्यावेळी निवडणुका घेण्याचे टाळण्यात आले. मे 2022 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाबाबत सरकारने दाखल केलेल्या अहवालाची चिरफाड करीत आरक्षणाशिवाय निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याचे आदेशही बजावल्याने ऑगस्ट 2022 मध्ये संगमनेर नगरपरिषदेसह मुदत संपलेल्या राज्यातील 92 नगरपरिषदांच्या निवडणुकांचा कार्यक्रमही जाहीर करण्यात आला होता.

मात्र तत्पूर्वीच जुलैमध्ये राज्यात सत्तांतर घडून शिंदे शिवसेनेसह भाजपाचे सरकार आल्याने त्यांनी आघाडी सरकारच्या नूतन प्रभाग रचनेचा निर्णय रद्द करुन जुन्या प्रभागांनुसारच निवडणुका घेण्याचे ठरविल्याने हा विषयही थेट सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आणि निवडणूक कार्यक्रम जाहीर होवूनही गेल्या दहा महिन्यांत त्यावर कोणतीही कारवाई अथवा निर्णय होवू शकला नाही. निवडणुकांचा निर्णय सर्वोच्च न्यायालयात असल्याने गेल्या वर्षी मे-जूनमध्ये ‘सक्रीय’ झालेले विद्यमान आणि इच्छुक उमेदवारही हिरमुसले आणि अंधारात किती खर्च करायचा या विचाराने मतदारांपासून दूर गेले, जे आजही दूरच आहेत. मात्र शिवसेनेचे (ठाकरे गट) माजी जिल्हाप्रमुख जयवंत पवार मात्र त्याला अपवाद ठरले आहेत.

सोमवंशीय क्षत्रिय समाजाचे अध्यक्ष असलेल्या जयवंत पवार यांनी समाजाच्या वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या मालमत्ता ‘मोकळ्या’ करुन त्याजागी मंगल कार्यालय व व्यापारी संकुल, विठ्ठल मंदिर व व्यापारी संकुल उभारले. त्यातून या समाजाचे वैभव आणि समृद्धीही वाढवली. क्षत्रिय समाजासोबतच त्यांचा शहरातील अन्य समाजाच्या कार्यक्रमातही नेहमी सहभाग राहिल्याने निवडणुका लांबल्यानंतरही ‘पवार’ मात्र सतत चर्चेतच राहिले. त्यात आता त्यांनी आणखी भर घालण्यास सुरुवात केली असून शहराच्या विविध भागात फिरुन लोकांच्या भेटीगाठी सुरु केल्या आहेत. संगमनेरकर ‘मनोपली’ राजकारणाला वैतागले असून सध्या तोंड दाबून बुक्क्यांचा मार सुरु असल्याचे ‘ते’ लोकांना सांगत आहे. त्यामुळे त्यांच्या या राजकीय बैठकांतून सध्यातरी अडगळीत असलेल्या ‘पालिका निवडणूक’ विषयाला नव्याने हवा मिळाली असून चर्चांचे गुर्हाळ पुन्हा सुरु होवू पाहत आहे.

सामान्यांच्या भेटीगाठी घेताना जयवंत पवार क्षत्रिय समाजासाठी केलेल्या कामांचे दाखले देत असून ज्ञानमाता विद्यालय, नगर रस्ता, कुरण रोड अशा शहराच्या अविकसित भागात व्यापारी संकुले उभारण्याचे स्वप्नंही ते लोकांना दाखवत आहेत. आपली शहराच्या नगराध्यक्षपदी निवड झाल्यास आपण शास्ती माफी, शहराच्या वेगवेगळ्या भागात प्रसाधनगृहे, मोकळ्या जागांवर वाहनतळ, स्वच्छता यासह बोकाळलेल्या ठेकेदारांवर नियंत्रण ठेवण्याचे आणि त्यांच्याकडून अधिकची ‘क्वॉलिटी’ कामे करवून घेण्याची चर्चा घडवून ‘ते’ पाच वर्षात संगमनेरचा विकास पुण्या-मुंबईसारखा करण्याची खैरातही वाटीत आहेत. पालिकेतील सध्याचा मनमानी कारभार आणि वाढलेला भ्रष्टाचार या विषयावर माणसं त्यांच्याकडे आकर्षित होत असून ‘पवारां’मध्ये तसं करण्याची ‘पॉवर’ असल्याचा विश्वासही अनेकजण बोलून दाखवित आहेत.

मागील काही दिवसांपासून पवार ‘पिता-पुत्रां’कडून सुरु असलेला ‘जनसंवाद’ पाहता पवार कुटुंबाकडून शहरात साखर पेरणी सुरु असून यंदा कोणत्याही परिस्थितीत ‘नगराध्यक्षपद’ लढवण्याचा चंगच त्यांनी बांधला आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून राज्यातील निवडणुकांबाबत कोणताही निर्णय येईल असे चित्र अद्यापही दूरदूरपर्यंत दिसत नसताना आणि त्यातच येणारा संपूर्ण महिना सर्वोच्च न्यायालयाला ‘उन्हाळी’सुट्टीही असताना पवारांकडून सुरु असलेल्या राजकीय भेटीगाठींनी न्यायाधीश अकबर अली आणि त्यांची पत्नी झरीन यांच्या अपत्यासाठीच्या संघर्षावर आधारित ‘बिन बादल बरसात’ या 1975 साली प्रदर्शित झालेला पाकिस्तानी चित्रपटही चर्चेत आला आहे.

‘यंदा नाही तर पुन्हा नाही..’ असे म्हणतं शिवसेनेचे (ठाकरेगट) माजी जिल्हाप्रमुख जयवंत पवार यांनी नगराध्यक्षपदासाठी साखर पेरणी सुरु केल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या काही दिवसांतील राज्यातील राजकीय घडामोडी पाहता येणार्या काळातील निवडणूका भाजप-शिंदे गट विरुद्ध महाविकास आघाडी असे रंगणार असल्याचे दिसत असताना आणि संगमनेरची जागा आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या काँग्रेसकडे परंपरेने असताना पवार यांची ‘इच्छा’ नेमकी कोणत्या पक्षातून निवडणूक लढविण्याची आहे असाही प्रश्न निर्माण झाला आहे.

