‘एक हात मदतीचा’ उपक्रमात दानशूर पुढे सरसावले!

नायक वृत्तसेवा, अहिल्यानगर
राज्याचा मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मदाय रुग्णालय मदत कक्षाच्यावतीने पूरग्रस्तांसाठी ‘एक हात मदतीचा’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमात जिल्ह्यातील दोन सामाजिक संस्थांनी पुढाकार घेत जिल्हा प्रशासनाकडे १ लाख ५७ हजार १० रुपयांचा धनादेश मदत म्हणून सुपूर्द केला.

माळीवाडा पंचमंडळ देवस्थान व धार्मिक ट्रस्ट श्री विशाल गणपती मंदिर, माळीवाडा, अहिल्यानगर यांच्यावतीने अध्यक्ष अभय आगरकर व विश्वस्त मंडळाने पूरग्रस्त महाराष्ट्रासाठी ‘एक हात मदतीचा’ या अंतर्गत एक लक्ष रुपयांचा धनादेश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्याकडे सुपूर्द केला. भारतीय राज्य पेन्शनर्स महासंघ शाखा, अहिल्यानगर यांच्यावतीने अध्यक्ष सर्वोत्तम क्षीरसागर व सहकाऱ्यांनी रुपये सत्तावन्न हजार इतक्या रकमेचा धनादेश अपर जिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांच्याकडे सुपूर्द केला.नागरिकांनी वस्तुरूपात किंवा धनादेश स्वरूपात मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, अहिल्यानगर येथे जमा करावी, असे समाजसेवा अधीक्षक अजय काळे यांनी सांगितले.आपण दिलेला प्रत्येक रुपया, प्रत्येक वस्तू पूरग्रस्त कुटुंबांसाठी जीवनदायी ठरेल. संकटाच्या काळात हात देणं हीच खरी सेवा आहे असे आवाहन त्यांनी केले.

पूरग्रस्तांना सध्या निवारा, अन्नधान्य, कपडे, स्वच्छतेची साधने व औषधांची तातडीची आवश्यकता आहे. तंबू, चादरी, तांदूळ, डाळी, तेल, दूध पावडर, पिण्याचे पाणी, साबण, सॅनिटरी नॅपकिन्स, मास्क, औषधे, ओआरएस, पशुखाद्य, टॉर्च, ताडपत्री, सोलर लॅम्प या वस्तूंची मोठ्या प्रमाणात गरज भासत आहे.

Visits: 70 Today: 4 Total: 1100099
