आमदार लहामटेंवरील गुन्ह्याच्या निषेधार्थ अकोलेत मूक मोर्चा
आमदार लहामटेंवरील गुन्ह्याच्या निषेधार्थ अकोलेत मूक मोर्चा
राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांसह कार्यकर्त्यांचे तहसीलदारांना निवेदन
नायक वृत्तसेवा, अकोले
अकोले विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.किरण लहामटे यांच्यावर खडकी ग्रामपंचायतच्या शिपायाला मारहाण केल्याचा खोटा गुन्हा नोंदविल्याच्या निषेधार्थ तहसील कार्यालयावर सोमवारी (ता.21) मूक मोर्चा काढण्यात आला.
आमदार डॉ.किरण लहामटे हे लव्हाळी या आपल्या मूळ गावी जात असताना खडकी येथे रस्त्यावरून जात असताना आपल्या जवळून भरधाव वेगाने जाणार्या गाडीचालकाला ओरडून जाब विचारल्याचा राग अनावर झाल्याने आमदार लहामटे यांनी गाडी थांबवून पोटात लाथ मारल्याचा आरोप खडकी ग्रामपंचायतचा शिपाई रामदास लखा बांडे याने केला होता. त्यानंतर दुसर्या दिवशी राजूरला येवून पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. त्यानंतर पोलिसांनी लहामटे यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. त्यानिमित्ताने गेली दोन दिवस समाज माध्यमांतून रणकंदण माजले होते. लहामटे यांच्यावर खोटा आरोप करून त्यांची बदनामी करण्यात येत असून त्याचा बोलविता धनी वेगळाच असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यायापासून निघालेला हा मोर्चा छत्रपतींचा पुतळा ते देवठाण रस्ता, महात्मा फुले चौकातून कोल्हार-घोटी मार्गे तहसील कार्यालयावर आला. येथे तहसीलदार मुकेश कांबळे यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते संपत नाईकवाडी, संजय वाकचौरे, अरुण रुपवते, मारुती भांगरे, चंद्रभान नवले, सुरेश गडाख, पोपट दराडे, विजय देशमुख, संदीप शेणकर, स्वाती शेणकर, जालिंदर बोडके, ईश्वर वाकचौर, अण्णा ढगे, संतोष परते, तान्हाजी देशमुख, सचिन चौधरी, प्रकाश देशमुख, रामनाथ शिंदे, भाविक खरात, संकेत चौधरी, संकेत लांडे, आनंद देशमुख, अंकुश वैद्य, अमोल गोडसे, अमोल लांडे, तुषार राक्षे, अकीब शेख, सचिन पवार आदिंसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.