पिकअप चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा! खांडगाव फाटा अपघात; दोघांचा मृत्यू तर दोघे गंभीर जखमी


नायक वृत्तसेवा, संगमनेर
सोमवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास जुन्या पुणे-नाशिक महामार्गावरील खांडगाव फाटा येथे झालेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू तर दोघे गंभीर जखमी झाले होते. तीन वाहनांच्या या विचित्र अपघातानंतर धडक देणार्‍या पिकअप चालकाने जखमींना मदत करण्याऐवजी तेथून पळ काढला होता. स्थानिक नागरिक व पोलिसांनी अपघातग्रस्त वाहनांमधील जखमींना बाहेर काढून त्यांना उपचारार्थ दाखल केले. याप्रकरणी मंगळवारी उशिराने या अपघातास कारणीभूत ठरलेल्या वाहन चालकाविरोधात सदोष मनुष्यवधासह मोटार वाहन कायद्यातील तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची भीषण घटना सोमवारी (ता.9) जुन्या महामार्गावरील खांडगाव फाट्याजवळ घडली. रात्री दहा वाजण्याच्या सुमारास पुण्याहून संगमनेरच्या दिशेने भरधाव वेगाने येणार्‍या महिंद्रा पिकअप (एम.एच.17/सी.व्ही.0026) वाहनाने संगमनेरकडून येणार्‍या अ‍ॅटोरिक्षाला (क्र.एम.एच.12/टी.यू.3310) समोरुन जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की धडक झाल्यानंतर प्रवाशी रिक्षाचा अक्षरशः चुराडा उडाला. अपघातानंतर जखमींना मदत करण्याऐवजी वाहनचालकाने तेथून पळून जाताना रस्त्याने जाणार्‍या स्विफ्ट कारलाही (क्र.एम.एच.12/के.जे.1183) धडक दिल्याने त्या वाहनाचेही मोठे नुकसान झाले.

अपघातानंतर आसपासच्या नागरिकांनी पोलिसांना माहिती देत जखमी इसमांना अपघातग्रस्त वाहनातून बाहेर काढण्यास सुरुवात केली. या दरम्यान पोलिसही घटनास्थळी पोहोचल्याने त्यांनी रिक्षातील चौघाही प्रवाशांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरु होण्यापूर्वीच त्यातील आशाबाई बबन चोथे (वय 45, रा.सुखसागर, पुणे) व राजेंद्र उत्तम शेळके (वय 40, रा.शनिनगर, आंबेगाव) या दोघांचा मृत्यू झाला तर कल्याण लक्ष्मण चोथे व दत्ता पांडुरंग वर्‍हाडे या दोघांवर उपचार सुरु आहेत. याबाबत मंगळवारी (ता.10) सायंकाळी उशिराने जखमी कल्याण चोथे यांचा मुलगा राहुल याने दिलेल्या फिर्यादीवरुन संगमनेर शहर पोलिसांनी पिकअपवरील (एम.एच.17/सी.व्ही.0026) अज्ञात चालकाविरोधात सदोष मनुष्यवधाच्या कलम 304 (अ) सह 279, 337, 338, 427, मोटर वाहन कायद्याचे कलम 134 (अ), (ब), 177, 184 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास हेडकॉन्स्टेबल अमित महाजन यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. जखमी असलेल्या दोघांवरही उपचार सुरु असून मृत्यू झालेल्या दोघांवर त्यांच्या मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.

Visits: 143 Today: 1 Total: 1101817

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *