अवकाळीने केले आदिवासींच्या भात पिकांचे नुकसान

नायक वृत्तसेवा, अकोले
तालुक्यातील वारंधुशी, भंडारदरा आणि परिसरात झालेल्या सततच्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या भात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी या परिसरातील ग्रामस्थांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

या निवेदनात शेतकऱ्यांनी म्हटले आहे की, झालेल्या अवकाळी पावसाने भात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ५ मे पासून सुरू झालेला पाऊस आजपर्यंत सुरूच आहे. दि. २५ सप्टेंबर पासून झालेल्या अतिवृष्टीमुळे आदिवासी भागातील शेतकऱ्यांचे भातपिक पूर्णतः उध्वस्त झाले असून, अनेक शेतकऱ्यांच्या शेतात दाणे काळे पडले आहेत तर काही ठिकाणी लागवड केलेले भातच पावसामुळे नष्ट झाले आहे.वारंधुशी ते घाटघर, मुतखेल, चिचोंडी, वाकी, खिरविरे, पाडोशी, पाचनई ते अंबीत फोफसंडी, सह अकोले तालुक्यात या सर्व भागात शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे पंचनामे करून तातडीने नुकसान भरपाई मंजूर करण्यात यावी, वाया गेलेल्या भातपिकांसाठी, सोयाबीन,सह सर्व पिकांना मदत मिळावी तसेच शेतकऱ्यांचा पिकविमा तातडीने मंजूर करावा, अशी मागणी शेतकरी बांधवांनी केली आहे.या पार्श्वभूमीवर अनुसूचित जमाती उत्तर अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष डॉ. अनंत घाणे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी व ग्रामस्थांनी तहसीलदार, गटविकास अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांना निवेदन दिले आहे. शासनाने, प्रशासनाने संयुक्तपणे पंचनामे करून सहानुभूतीपूर्वक विचार करून शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी करण्यात आली.

शेतकरी वर्गात सध्या चिंता आणि नैराश्याचे वातावरण असून शासनाने तातडीने मदत न दिल्यास खरीप हंगामातील मोठ्या नुकसानीचा परिणाम पुढील काळात गंभीर होऊ शकतो. शेतकरी येणारी दिवाळी साजरी करू शकत नाहीत अशी भीती व्यक्त होत आहे.

Visits: 85 Today: 2 Total: 1108195
