संघर्ष आणि आंदोलन आम्हाला नवीन नाही : आ.सत्यजित तांबे 

नायक वृत्तसेवा, संगमनेर 
जनतेच्या हक्कासाठी आपण कायम लढलो असून अगदी दिल्लीपर्यंत आमच्यावर केसेस आहेत. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर आपण तातडीने दोन्ही जलसंपदा मंत्र्यांशी बोलणार असून पंधरा दिवसात कामे पूर्ण करा मात्र कामाची अंमलबजावणी आजपासून सुरू करा, अशा सूचना देतांना संघर्ष आणि आंदोलन आम्हाला नवीन नाही असा इशारा आमदार सत्यजित तांबे यांनी दिला.
 घुलेवाडी येथील जलसंपदा विभागाच्या कार्यालयावर निळवंडे कालव्याच्या शेजारील रस्त्यांच्या दुरवस्था, लोखंडी पूल, याचबरोबर वितरिकांचे काम सुरू नसल्याने  तालुक्यातील शेतकऱ्यांचा आ. सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वात  मोर्चा काढण्यात आला होता, त्यावेळी आ.  तांबे बोलत होते. यावेळी  तालुकाध्यक्ष अजय फटांगरे, पांडुरंग  घुले, रामहरी कातोरे, संपत डोंगरे, दत्ता कोकणे, विष्णुपंत रहाटळ, विलास कवडे, सचिन दिघे, मारुती कवडे, सुमित पानसरे,रमेश नेहे, सनी ठोंबरे, अक्षय दिघे, संतोष नागरे, आनंद वर्पे, निर्मला राऊत, संतोष हासे, सुहास आहेर, किरण रोहम, प्रदीप हासे, प्रमोद पावसे, गोरख सोनवणे, हर्षल राहणे,बाळासाहेब गायकवाड यांच्यासह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आ. तांबे पुढे म्हणाले, दुष्काळी भागाला पाणी मिळावे याकरता माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी निळवंडे धरण व कालवे पूर्ण केले. लाभक्षेत्रातील वितरिकांच्या कामांसाठी एक हजार कोटी रुपयांचा निधी त्यांनी मंजूर करून घेतला. मात्र सध्या ही कामे काही विशिष्ट भागात सुरू असून संगमनेर तालुक्यात तातडीने कामे सुरू करावीत, याचबरोबर कालव्या शेजारच्या रस्ते दुरुस्तीसह शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न मार्गी लावावेत अशी मागणीही आमदार सत्यजित तांबे यांनी पाटबंधारे विभागाकडे केली.
आ. सत्यजित तांबे म्हणाले की, निळवंडे धरण व कालवे हे बाळासाहेब थोरात यांनी पूर्ण केले आहे. मागील सरकारच्या काळामध्ये वितरिकांसाठी माजी मंत्री थोरात व आपण पाठपुरावा करून १ हजार कोटी रुपयांचा निधी मिळवला. मात्र कामे कुठे सुरू आहेत माहित नाही.  तालुक्यात कालव्याच्या शेजारील रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झाली आहे. शासनाने केलेल्या पुलांवर पाणी साचत आहे, हा मोठा चिंतेचा विषय आहे. गरज असेल तेथेच अस्तरीकरण करा.  सुरू असलेले अस्तरीकरण करण्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे सुरू आहे. पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने रस्ते व पुल दुरुस्तीची पाहणी करावी. आवश्यक ठिकाणी मुरमाची व्यवस्था करावी. त्याचप्रमाणे प्रत्येक गावामध्ये जाऊन सर्व शेतकऱ्यांना कमांड मध्ये येणाऱ्या क्षेत्राची माहिती द्यावी. सर्वांना पाणी मिळाले पाहिजे. ही आमची प्रमुख मागणी आहे. याबाबत जलसंपदा विभाग काय उपाययोजना करणार याची तातडीने माहिती द्यावी असेही ते यावेळी म्हणाले. तसेच पाणीपट्टी वसुली करता सक्ती करू नये. कालव्याच्या हद्द निश्चित कराव्यात.जोपर्यंत पाण्याचे नियोजन व्यवस्थित होत नाही तोपर्यंत ग्रामपंचायतीने पाणीपट्टी न भरण्याचे ठराव करावेत आणि जलसंपदा विभागाने याबाबत सक्ती करू नये.
तालुक्यातील व निळवंडे लाभक्षेत्रातील प्रत्येक शेतकऱ्याला पाणी मिळावे याकरता  बाळासाहेब थोरात यांनी मध्यप्रदेश मधील माधवपूर येथे जाऊन स्काडा योजनेअंतर्गत सर्वांना पाणी मिळेल अशी योजना तयार केली. यामध्ये प्रत्येक आठ हेक्टरवर पाणी पोहोचवले जाणार आहे. याकरता तत्कालीन जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून एक हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला. मात्र या अंतर्गत १५० कोटी रुपये निधी खर्च झाला असून कामे कुठून सुरू आहेत हे माहीत नाही. अधिकाऱ्यांनी हेड टू टेल सर्वे करून तातडीने उपाययोजना कराव्यात. निळवंडेच्या पाण्यावर सर्वांचा हक्क आहे.पाणी वाटप करताना संगमनेरला न्याय मिळाला पाहिजे. अशी आग्रही मागणी करतांना नागरिकांच्या मागण्या तात्काळ पुढील पंधरा दिवसात मान्य कराव्यात अन्यथा मोठे आंदोलन छेडले जाईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. आणि याची  संपूर्ण जबाबदारी  पाटबंधारे विभागाची राहील असेही ते म्हणाले.
यावेळी संपत डोंगरे, आनंद वर्पे पांडुरंग  घुले, दत्ता कोकणे, रामहरी कातोरे, यांच्यासह विविध शेतकऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी प्रमोद बोंद्रे, संगम आहेर, अतुल कडलग, शुभम घुले, किसन खेमनर,नितीन सांगळे, आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते. कार्यकारी अभियंता प्रदीप हासे व अमोल कवडे यांनी निवेदन स्विकारले.
 निळवंडे कालव्यालगतच्या रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती करावी, त्याचप्रमाणे कालव्यामधून होणारी गळती थांबवावी. पीडीएन योजनेबाबत शेतकऱ्यांना सविस्तर माहिती द्यावी, किती लाभार्थी शेतकरी व किती सिंचनाखाली येईल याची माहिती द्यावी. कालव्यावरील काँक्रीट व लोखंडी पुलाचे काम तातडीने करावे. तसेच कालवा फुटणार नाही याची योग्य खबरदारी घेताना मोठ्या ओढ्या नाल्यांमध्ये ओहरफ्लोचे पाणी घेण्यासाठी ज्यादा एसकेप टाकावेत अशी मागणी त्यांनी केली आहे. या मागण्या पुढील पंधरा दिवसात पूर्ण कराव्यात अशा सूचना आ. सत्यजित तांबे यांनी पाटबंधारे विभागाला दिल्या आहेत.
Visits: 62 Today: 2 Total: 1107783

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *