अकोलेतील फुलशेतीला आयाम देणारा कार्व्हर सोमनाथ नवले! उंचखडक येथे फुलविला शेवंतीचा मळा; मिळतेय लाखोंचे उत्पन्न
महेश पगारे, अकोले
भारत देश सण-उत्सव, परंपरा साजरा करणारा देश म्हणून जगप्रसिद्ध आहे. नुकताच गणेश उत्सव व त्यापाठोपाठ नवरात्री उत्सव अत्यंत आनंददायी वातावरणात साजरा झाला आणि आता देशातील सर्वात मोठा आनंद उत्सव म्हणजेच दीपावली सण येत आहे. या सर्वच सणांमध्ये मोठ्या प्रमाणावर फुलांची मागणी असते. याचाच अभ्यास करून अकोले तालुक्यातील प्रगतिशील शेतकरी सोमनाथ नवले यांनी उंचखडक येथील आपल्या दोन एकर शेतावर शेवंतीची शेती फुलवली आहे. यातून त्यांना लाखो रुपयांचे उत्पन्न मिळत आहे.
अकोले तालुका तसा निसर्ग आणि पर्यावरण संपन्न तालुका म्हणून ओळखला जातो. तालुक्यातून वाहणार्या मुळा, प्रवरा, मुठा व आढळा या नद्यांमुळे तालुक्याला उत्तम सौंदर्य व सुबत्ता प्राप्त झालेली आहे. या तीनही खोर्यातील शेतकरी समृद्ध आणि शेतीनिष्ठ आहेत. प्रवरातिरी वसलेले उंचखडक हे बागायत गाव आहे. शेतीच्या बाबतीत प्रगतिशील मानले जाणारे हे बागायत गाव आहे. याच गावातील प्रगतिशील शेतकरी फुल शेतीतज्ज्ञ सोमनाथ नानासाहेब नवले हे गेली पाच वर्षांपासून उत्तम पद्धतीने फुल शेती पिकवत आहेत. पारंपारिक शेतीला फाटा देत फुलशेतीकडे वळले आहेत. फुलशेतीमधील त्यांनी केलेले विविध प्रयोग या भागातील शेतकर्यांसाठी मार्गदर्शक ठरत आहेत. झेंडू, शेवंती, बिजली, गलांडा या फुलांचे त्यांनी यशस्वीपणे उत्पादन घेऊन दाखवले आहे.
चालू हंगामात त्यांनी आपल्या शेतामध्ये शेवंती या फूल पिकाची दोन एकरावर लागवड केलेली आहे. सफेद आणि पिवळा रंग असलेली शेवंती त्यांनी डिसेंबर 2021 मध्ये शंका व्हाईट व ऐश्वर्या यल्लो हे वाण त्यांनी लावले. गादी वाफ्यावर ठिबक सिंचन व मल्चिंग पेपरचा वापर करून लागवड केली. ठिबकमधून समतोल खतांचा वापर व योग्य निगा राखत त्यांनी बाग डौलात उभी केली. आत्तापर्यंत त्यांना दसर्यापर्यंत सुमारे सव्वासात लाख रुपये उत्पन्न झाले आहे; अजून तीन ते साडेतीन लाख रुपये दिवाळीच्या हंगामामध्ये होणे अपेक्षित आहे. खर्च वजा जाता त्यांना सात ते आठ लाख रुपये निव्वळ उत्पन्न मिळणे अपेक्षित आहे. अत्यंत सचोटीने आणि प्रयोगशील पद्धतीने गेली पाच वर्षे ते फुल शेती पिकवत आहेत. पारंपरिक पिकांच्या मागे न लागता शेतीमध्ये योग्य तंत्रज्ञान वापरून फुलशेती यशस्वीपणे करून दाखवली आहे. बाजारभाव कमी झाल्यानंतर कधीकधी फुले तोट्यात विकावी लागतात अशी परिस्थिती ओढावल्यास फुलांपासून अगरबत्ती बनविण्याचे त्यांचे नियोजन आहे. त्यासाठी शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना देखील ते करणार आहेत.