संगमनेर शहरातून विवाहितेचे अपहरण! भरदिवसा घडली घटना; पोलिसांकडून माग काढण्याचा प्रयत्न..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर शहरात यापूर्वी कधीही न घडलेला प्रकार आज सकाळी समोर आला असून एका 30 वर्षीय विवाहित महिलेला भररस्त्यातून उचलून नेल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. अपहृत पीडितेने आपल्या पतीला फोन केल्यानंतर हा प्रकार समोर आला, मात्र तेव्हापासून पीडितेचा मोबाईलही बंद असल्याने या प्रकरणाचे गुढ वाढले आहे. घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनीही आपली तीन स्वतंत्र पथके वेगवेगळ्या दिशांना रवाना केली असून वृत्त लिहेपर्यंत अपहृत महिलेचा कोणताही थांगपत्ता लागलेला नव्हता. या घटनेने संगमनेरात प्रचंड खळबळ उडाली असून सोनसाखळ्या लांबवण्याच्या नियमित प्रकारात आता थेट महिलेलाच उचलून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


याबाबत समजलेल्या माहितीनुसार सदरचा प्रकार आज (ता.1) सकाळी आठच्या सुमारास म्हाळुंगीच्या काठाने स्वामी समर्थ मंदिरापासून जाजू पेट्रोलपंपाकडे येणार्‍या रस्त्यावर घडल्याची चर्चा आहे. पालिकेच्यावतीने या रस्त्याच्या साफसफाईचे काम करणार्‍या रीना राहुल जेधे (वय 30, रा.जेधे कॉलनी) या सकाळी रस्त्यावर सफाई करीत असताना आलेल्या चारचाकी वाहनातील काहींनी त्यांना बळजबरीने वाहनात बसवून पळवून नेल्याचे बोलले जात आहे.


या घटनेनंतर घाबरलेल्या विवाहितेने आपल्याजवळील फोनचा वापर करीत घडल्या प्रकाराबाबत पतीला सांगण्याचाही प्रयत्न केला. मात्र त्यांच्यातील संभाषण पूर्ण होण्यापूर्वीच अपहरणकर्त्यांनी त्यांच्या हातातील मोबाईल हिसकावून घेत तो तात्काळ बंद केल्याने नेमके काय व कसे घडले याबाबत घटनेनंतर सहा तास उलटूनही स्पष्टता नाही. सदरील महिलेचे अपहरण करण्यामागील उद्देश काय? हे देखील अजून अंधारात असल्याने पोलीस मृगजळाचा पाठलाग करीत असल्याचेही दिसून येत आहे.


धक्कादायक म्हणजे पालिकेच्यावतीने विसर्जन मिरवणुकीच्या मार्गासह शहरातील प्रमुख रस्त्यावर मोठा गाजावाजा करीत जवळपास 39 सीसीटीव्ही कॅमेरे बसवले गेले होते. त्यासाठी लाखों रुपयांचा खर्चही केला गेला होता. मात्र अवघ्या दोन वर्षातच त्यातील जवळजवळ सर्वच कॅमेरे सध्या मृतावस्थेत असून त्याचा कोणताही उपयोग या अपहरण प्रकरणात झालेला नाही. त्यामुळे पोलीस आता खासगी सीसीटीव्हीद्वारा अपहरणकर्त्यांचा शोध घेत असल्याचेही समोर आले आहे.


संगमनेर शहरात गेल्याकाही वर्षात महिलांच्या गळ्यातील, बसस्थानकावर पर्समधील सोनसाखळ्या व अलंकार लांबवण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. त्याविरोधात मोठा रोष व्यक्त होवूनही शहर पोलीस सोनसाखळी चोरीचे प्रकार थांबवण्यात अपयशी ठरलेले असताना आता थेट भररस्त्यातून विवाहित महिलेलाच उचलून नेण्याचा प्रकार घडल्याने संगमनेरात कायद्याचे राज्य आहे की नाही? अशी शंका उपस्थित झाली असून शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलेल्या या प्रकरणाचा लवकरात लवकर छडा लावण्याची मागणी होत आहे. वृत्त लिहेपर्यंत अपहरण प्रकरणाबाबत पोलिसांकडेही कोणतीच ठोस माहिती नव्हती हे विशेष.

Visits: 94 Today: 2 Total: 1110173

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *