महिलांना चाकूचा धाक दाखवून दागिन्यांसह रक्कम चोरली प्रवरानगर येथील घटना; परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण

नायक वृत्तसेवा, राहाता
तालुक्यातील प्रवरानगर (लोणी खुर्द) येथे घरातील महिलांना चाकूचा धाक दाखवून लाखो रुपयांचे दागिने व रोख रक्कम घेऊन चोरट्यांनी पोबारा केला. सदर घटना शुक्रवारी (ता.26) रात्री एक वाजेच्या सुमारास घडली आहे. यामुळे परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, प्रवरानगर (लोणी खुर्द) परिसरात महात्मा गांधी विद्यालयाच्या शिक्षकांची वसाहत आहे. यामागे राहत असणार्‍या घोगरे यांच्या घराच्या दरवाजाची अज्ञात चोरट्यांनी कडी उघडून आत प्रवेश केला. झोपेत असणार्‍या तीन महिलांना उठवून चाकूचा धाक दाखवत मारहाण केली. कपाटाची उचकापाचक करून काही दागिने व रोख रक्कम मिळविली. त्यानंतर महिलेच्या गळ्यात असणारे दोन-तीन तोळ्याचे गंठण, कानातील दागिने, दोन मोबाईल घेऊन चोरटे पसार झाले.

महिलांनी आरडाओरडा केल्यानंतर तेथील नागरिक जमा झाले; परंतु तोपर्यंत चोरटे पसार झाले होते. या घटनेची माहिती लोणी पोलिसांना मिळाल्यावर तपासाची सूत्रे फिरवली, मात्र उपयोग झाला नाही. शुक्रवारी सकाळीच श्वानपथकास पाचारण करण्यात आले. विशेष म्हणजे याच भागात काही अंतरावर राहणार्‍या दोन वेगवेगळ्या ठिकाणीही घरफोड्या करण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती मिळाली. परंतु, तेथे लोक जागे झाल्याने चोरटे पसार झाले. सध्या प्रवरा परिसरात काही गावांमध्ये भुरट्या चोर्‍यांच्या प्रमाणात वाढ झाली असून शेतात असणारे पाईप, इलेक्ट्रिक मोटार, एसटीपी अशा विविध अवजारांच्या चोर्‍यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे चोरट्यांचा लवकरात लवकर पोलिसांनी बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकर्‍यांमधून होऊ लागली आहे.

Visits: 198 Today: 1 Total: 1879146

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *