नौटंकी सोडा, नुकसानग्रस्तांना भरीव मदत करा : किसान सभा

नायक वृत्तसेवा, अकोले
राज्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाचा दौरा करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्री बुधवारी महाराष्ट्र दौऱ्यावर होते. कुणी ट्रॅक्टरवर चढून पाहणी करत होते, तर कोणी होडीत बसून फोटो काढत सोशल मीडियावर टाकत होते. मंत्र्यांनी अशाप्रकारे नौटंकी करण्यापेक्षा नुकसानग्रस्तांना भरीव मदत करावी अशी मागणी किसान सभेने केली आहे.

किसान सभेने म्हटले आहे की, मंत्र्यांनी नुकसानीच्या पाहणीची नौटंकी करण्यापेक्षा त्यांनी मंत्रालयात बसावं. त्यांचा ३० मे २०२५ चा शासन आदेश, ज्याच्यामध्ये कोरडवाहू शेतीसाठी केवळ ८,५०० रुपये, बागायती जमिनीसाठी फक्त १७,००० रुपये तर बहुवर्षीय पिकांसाठी केवळ २२,५०० रुपये मदतीची तरतूद आहे.लाखो रुपयांच्या गायी वाहून गेल्या तर त्याला भरपाई म्हणून दुधाळ जनावरामागे केवळ ३७,५०० रुपये इतक्या तुटपूज्या मदतीची तरतूद आहे, तो शासन आदेश पहिला बदला.

ही अभूतपूर्व नुकसानीची परिस्थिती आहे, त्यामुळे अभूतपूर्व मदत शेतकऱ्याला करण्यासाठी निर्णय घ्या. प्रति एकर शेतकऱ्याला किमान ५० हजार रुपये तातडीची मदत व ज्या शेतमजुराचे श्रम नुकसान झालेले आहे, त्याला किमान २५ हजार रुपयाची तातडीची मदत करण्याचा निर्णय मंत्रालयात बसून घ्या. निर्णय न घेता अशाप्रकारे फिरणं ही केवळ नौटंकी ठरेल.ही नौटंकी थांबवा आणि नुकसानग्रस्तांना खरी खुरी मदत करा, असे आवाहन किसान सभेच्या वतीने करण्यात आले आहे.

Visits: 60 Today: 1 Total: 1114193
